शरद पवारसाहेबांचे ऐकायला मी दुधखुळा नाही : लक्ष्मण माने 

शरद पवारसाहेबांचे ऐकायला मी दुधखुळा नाही : लक्ष्मण माने 

सातारा : वंचित बहुजन आघाडीत तुम्ही राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांच्या सांगण्यावरूनच गेला आहात काय ? या प्रश्‍नावर वंचित बहुजन आघाडीचे नेते लक्ष्मण माने संतप्त झाले. ते म्हणाले, मी काय दुधखुळा नाही. मी लिहिणारा माणूस आहे. माझ्याकडे निर्णय क्षमता आहे. त्यामुळे पवारसाहेबांनी सांगावे आणि मी ऐकावे, असे होत नाही. गेली 40 वर्षे त्यांचे आणि माझे संबंध आहेत. पण तेच माझे एकुण निर्णय घेत असतात, असे स्पष्टीकरण त्यांनी जोडले. 

सर्व वंचितांची मोट बांधून भाजप व शिवसेनेला सत्तेतून हटविण्यासाठी कॉंग्रेस व राष्ट्रवादीसोबत बोलण्याची वंचित बहुजन आघाडीची तयारी आहे. त्यासाठी दोन्ही कॉंग्रेसने तीन ते चार वेळा हारलेल्या अशा 12 जागा आघाडीला सोडाव्या लागतील. ही आघाडी करताना मात्र, "एमआयएम'शी मैत्री आम्ही तोडणार नाही, असेही माने यांनी सांगितले. 

समाजातील वंचित घटकांना एकत्र करून आम्ही प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आगामी निवडणुक लढणार असून सत्ताही स्थापन करणार आहोत, असे भाकित वर्तवून माने म्हणाले, कॉंग्रेससोबत आमची बैठक झाली. यामध्ये कॉंग्रेसच्या सर्व प्रमुख नेत्यांशी आघाडीबाबत बोलूनच निर्णय घ्यावा लागेल, असे राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले आहे. तसेच एमआयएमशी मैत्रीही सोडावी लागले, असेही सांगितले आहे. पण आम्ही एमआयएमशी मैत्री सोडणार नाही. 

ते जातीयवादी आहेत, असे कॉंग्रेसचे नेते मंडळी म्हणत असले तरी जातीयवादी कोण नाही, हे त्यांनी सांगावे. आम्ही आघाडीसाठी 12 जागांची मागणी करत आहोत. या बारा जागा आजपर्यंत दोन्ही कॉंग्रेस तीन ते चार वेळा हारलेल्या आहेत, अशा जागा द्याव्यात. दोन्ही कॉंग्रेसला वंचित बहुजन आघाडीची दारे निवडणुकीचे अर्ज दाखल होईपर्यंत खुली असतील.

पण आमचा निवडणुकीपूरता वापर होणार असेल तर आम्ही कदापी आघाडी करणार नाही. अद्याप राष्ट्रवादीने आम्हाला प्रस्ताव दिलेले नाही. अजित पवार यांनी आम्हाला चर्चेला बोलवावे. भाजपने 22 राज्यातील सत्तेत कुठेही मुस्लिम, ख्रिश्‍चन समाजाला प्रतिनिधीत्व दिलेले नाही. त्यामुळे आम्ही त्यांच्या सोबत कधीहीच जाणार नाही असेही माने म्हणाले. 

आरक्षणाच्या मुद्‌द्‌यावरून कॉंग्रेस, राष्ट्रवादी, भाजप आणि शिवसेना या चारही पक्षांनी धनगर, वंजारी, विमुक्त व भटक्‍या समाजासह मराठा समाजालाही फसविले आहे. त्यांनी सगळ्यांना वाटाणे लावले आहेत. महाराष्ट्र क्रांती संघटनेला आम्ही सोबत घेणार आहोत, कारण ते वंचित मराठा समाजाचे प्रतिनिधीत्व करणारा पक्ष आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com