लक्ष्मण जगतापांना बारणे भेटले; नीलमताईंनीही समजावले....पण भाऊंनी अद्याप पत्ते खुले नाही केले!!

लक्ष्मण जगतापांना बारणे भेटले; नीलमताईंनीही समजावले....पण भाऊंनी अद्याप पत्ते खुले नाही केले!!

पिंपरी: शिवसेनेच्या उपनेत्या, आमदार, प्रवक्त्या डॉ नीलम गोऱ्हे यांच्या शिष्टाईमुळे पिंपरी चिंचवडमधील शिवसेना खासदार श्रीरंगअप्पा बारणे आणि आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांचे दहा वर्षे जुने वैर संपुष्टात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

हे वैर संपले आणि भाऊंनी युतीधर्म मनापासून निभावला, तर शिवसेनेसाठी ती `गुड न्यूज` ठरेल.  दुसरीकडे या मनोमिलनाने, आघाडीचे (राष्ट्रवादी) पहिलीच निवडणूक लढविणारे नवखे उमेदवार पार्थ पवार यांची वाट बिकट होणार आहे. आपण युतीधर्म पाळत बारणे यांचे काम करणार असल्याची अधिकृत घोषणा जगताप यांनी केलेली नाही. 

पिंपरी- चिंचवडमध्ये गुरूवार हा मोठ्या राजकीय घडामोडींचा वार ठरला. राजकीय वैमनस्य असलेल्या अप्पा आणि भाऊंची भेट झाली. नंतर दुपारी भाऊ आणि डॉ गोऱ्हे यांची ती झाली. पहिल्या भेटीत अप्पा हे भाऊंच्या घरी गेले तर दुसऱ्या भेटीत भाऊ हे गोऱ्हेंच्या पुणे निवासस्थानी पोहोचल्या. दोन्ही भेटींबाबत गुप्तता पाळली गेली. भेटीनंतर तपशील देणे दोन्ही बाजूंनी आवर्जून टाळले.

डॉ. गोऱ्हे आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट हे मावळसाठी युतीचे समन्वयक आहेत. त्यामुळे डॉ गोऱ्हे यांनी पहिल्या समन्वय बैठकीकडे पाठ फिरवलेल्या जगतापांना फोन करून भेटायला बोलावले. त्यानुसार आज ही भेट झाली. भाऊंचे शाल,पुष्पगुच्छ देऊन ताईंनी स्वागत केले. नंतर त्यांंच्यात अनौपचारिक चर्चा तासभर झाली. त्यात पहिल्या भेटीतील गैरहजेरीवरही चर्चा झाल्याचे समजले.

यावेळी पुण्यातील शिवसेनेचे प्रशांत बधेही उपस्थित होते. नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी वैर मिटवून मनोमिलन करा, असे  भाऊंना यावेळी सांगण्यात आल्याचे समजते.

पिंपरी चिंचवडचे कारभारी असलेल्या भाऊंची शहरातच नाही, तर मावळातही ताकद आहे. युतीचे पाच आमदार आहेत उलट राष्ट्रवादीचा एकच आमदार असून त्यांचा उमेदवारही नवखा आहे. त्यामुळे जगताप हे कोणाच्या बाजूने उतरणार यावर येथील लढतीचे चित्र ठरणार आहे. या दोन भेटिनंतरही अद्याप जगताप यांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com