सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यावर बंदी येईल का ? आमदार जगताप यांचा लक्षवेधी प्रश्‍न

सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यावर बंदी येईल का ? आमदार जगताप यांचा लक्षवेधी प्रश्‍न

पिंपरी : सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्याविरुद्ध कारवाईचे पुण्यातील लोण राज्यभर जाण्याची शक्‍यता आहे. कारण थूंकण्याच्या सवयीतून संसर्गजन्य रोग प्रसारण्याचा धोका असल्याने त्यावर बंदी आणण्याची मागणी सत्ताधारी आमदारांनीच केली आहे. उद्यापासून सुरू होणाऱ्या राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात चिंचवडचे आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांनी यासंदर्भात तारांकीत प्रश्‍न विचारला आहे. 

सार्वजनिक ठिकाणी थुंकले, तर ते त्याच माणसाला साफ करून वर त्याला दंड आकारण्यास पुणे महापालिका हद्दीत गेल्या काही दिवसांपासून सुरवात झाली आहे.त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. ती होण्यापूर्वीच जगताप यांनी अधिवेशनासाठी त्यावर तारांकीत प्रश्‍न दिला होता. सार्वजनिक ठिकाणी थुंकल्याने रोगराई पसरण्याची शक्‍यता असल्याने त्यावर सरकार काय करीत आहे अशी विचारणा याव्दारे करण्यात आली आहे. तसेच हा प्रार्दुभाव रोखण्यासाठी सरकार त्यावर बंदीची मागणीही त्यांनी केली आहे. जर, हा प्रश्‍न पटलावर आला,तर किमान पुण्यासारखी दंडात्मक कारवाई राज्यभर सुरू होण्याची शक्‍यता आहे. 

सरकारी कार्यालयाचे कोपरे, जिने, बसथांबे, रेल्वे स्थानके येथील पिचकाऱ्यांची रंगरंगोटी थांबणार आहे.यासह सरकारी रुग्णालयात रुग्ण व त्यातही कर्करोग आणि किडनीरुग्णांच्या होणाऱ्या हेळसांडीच्या राज्यव्यापी प्रश्‍नाकडेही भाऊंनी लक्ष वेधले आहे. या रुग्णांच्या वाढत्या संख्येबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली आहे.एमआयडीसीतील रसायन आणि राखमिश्रीत पाणी पिंपरी-चिंचवडमधून वाहणाऱ्या व वारकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत पवित्र समजल्या जाणाऱ्या इंद्रायणी नदीत सोडण्यात येत असल्यामुळे तिची गटारगंगा झाल्याबद्दलही प्रश्‍न विचारण्यात आला आहे. पुणे-मुंबई एक्‍स्प्रेस वे वरील समस्या, त्यातही तेथे वेग मर्यादेचे होणारे उल्लंघन आणि त्यामुळे होणारे अपघात याकडेही त्यांनी लक्ष वेधले आहे. त्याचबरोबर सौरउर्जेचा अधिक वापर करण्यास प्रवृत्त करण्याबद्दल सरकारच्या योजना काय असे एकूण चार तारांकित प्रश्‍न जगताप यांनी विचारले आहेत. 

खेड,आंबेगाव,जुन्नर आणि मावळ या डोंगराळ व मोठी आदिवासी वस्ती असलेल्या तालुक्‍यातील 17 आदिवासी शाळांतील दुरवस्थेवर लक्ष्मणभाऊ यांनी लक्षवेधी दिली आहे. या शाळांत मूलभूत सुविधाही पुरविल्या जात नसल्याचे आढळून आले आहे.तसेच तेथे पौष्टिक आहारही दिला जात नसल्याकडे त्यांनी आदीवासीमंत्र्यांचे लक्ष वेधले आहे. राज्य महामार्गांच्या दुरवस्था आणि निवृत्तिवेतनापासून वंचित असलेले राज्य वीज कंपनी कर्मचारी अशा इतर दोनप्रश्‍नांसह तीन लक्षवेधीही जगताप यांनी दिलेल्या आहेत. 


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com