लातूरसाठी तीन नव्या रेल्वेगाड्यांची घोषणा

 लातूरसाठी तीन नव्या रेल्वेगाड्यांची घोषणा

लातूर : मुंबई-लातूर रेल्वे बिदरपर्यंत वाढविल्याने सुरू झालेला लातूर विरुद्ध उदगीर संघर्ष निवळावा यासाठी सुरू केलेल्या प्रयत्नांना यश मिळताना दिसत आहे.

लातूर-मुंबई एक्‍स्प्रेस परळी मार्गे सुरू करा अशी मागणी राष्ट्रवादीचे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांची भेट घेऊन केली. त्यानंतर काही तास उलटत नाही तोच लातूरचे पालकमंत्री व राज्याचे कामगार व कौशल्यमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी देखील दिल्लीला धाव घेऊन सुरेश प्रभूंना साकडे घातले.

लातूर-मुंबईचा विस्तार कायम ठेवत प्रभू यांनी 1 जुलैपासून बिदर-मुंबई ही आठवड्यातून तीन दिवस धावणारी रेल्वे नियमित, तर बंगळूर-बिदर रेल्वे लातूरपर्यत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. या शिवाय लातूररोड ते गुलबर्गा या नवीन लोहमार्गाचे सर्वेक्षण पूर्ण करून लातूर ते गुलबर्गा नवीन रेल्वेला येत्या डिसेंबरमध्ये रेल्वेमंत्री सुरेश प्रभू स्वतः हिरवा झेंडा दाखवणार आहेत. 

लातूर-मुंबई रेल्वेच्या बिदर विस्ताराला विरोध करू नका असे आवाहन लातूरकरांना करण्यासाठी आलेले बिदरचे खासदार भगवंत खुब्बा यांना लातूरकरांच्या नाराजीचा सामना करावा लागला. निदर्शने करणाऱ्या काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याने पुढील संघर्ष टळला.

इकडे बिदरचे खासदार लातुरात तर पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर लातूरची रेल्वे रुळावर आणण्याचे प्रयत्न करत होते. महाराष्ट्र व कर्नाटक या दोन राज्यांसह एकाच जिल्ह्यातील लातूर-उदगीर संघर्ष टाळण्यासाठी या दोन्ही नेत्यांनी घेतलेल्या पुढाकाराला काही प्रमाणात यश आले असले तरी यात कर्नाटकने बाजी मारली असेच म्हणावे लागेल.

संभाजी पाटील निलंगेकर यांनी लातूर-मुंबई एक्‍स्प्रेसचा बिदरपर्यंत केलेला विस्तार लातूरकरांवर अन्याय करणारा असल्याचे मत रेल्वेमंत्र्यांपुढे मांडले पण हा विषय अधिक न ताणता प्रभू यांनी बिदर-बंगळूर रेल्वे लातूरपर्यंत तर, बिदर-मुंबई एक्‍स्प्रेसला नियमित करण्याचा तात्काळ निर्णय घेतला. तर पाच महिन्यांनी लातूररोड-गुलबर्गा नवी रेल्वे सुरु करण्याचे आश्‍वासन दिले. त्यामुळे लातूरकरांचे पूर्ण समाधान होणार नसले तरी काही अंशी हा प्रश्‍न सोडवण्यात 
यश आले असेच म्हणावे लागेल. 
नव्या रेल्वे मिळाल्याचा आनंद 
लातूरची अस्मिता हीच माझी अस्मिता आहे, त्यामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीतून योग्य मार्ग काढणे आवश्‍यक होते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत बैठक रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांची भेट घेऊन हा प्रश्‍न सोडवण्याचा प्रयत्न केला असे श्री. निलंगेकर यांनी सांगितले.

लातूरला नव्या रेल्वे मिळाल्या असून त्यामुळे महाराष्ट्र दक्षिण भारतातील धार्मिक स्थळांना जोडला जाणार असल्याचेही ते म्हणाले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com