Latur Politics Nilangekar - Deshmukh unite for railway coach factory | Sarkarnama

निलंगेकरांच्या रेल्वे बोगी  कारखान्याला अमित देशमुखांचा हिरवा कंदील

विकास गाढवे
सोमवार, 12 मार्च 2018

नियोजित कारखान्याचे भूमिपूजन ३१ मार्च रोजी रेल्वेमंत्री पियुष गोयल व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार असल्याची माहिती पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर  यांनी  दिली .

लातूर : लातूर जिल्ह्याच्या राजकारणात भाजपचे नेते आणि पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर आणि काँग्रेसचे आमदार अमित देशमुख यांच्यातील राजकीय संघर्ष सध्या शिगेला पोहोचलेला असताना विकासाच्या मुद्द्यावर मात्र परस्परांना सहकार्य करण्याची भूमिका या दोन नेत्यांनी घेतल्याने  राजकीय वर्तुळात सकारात्मक चर्चा आहे .

 सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या पुढाकाराने मंजूर झालेल्या  रेल्वेबोगी निर्मिती कारखान्याकडे  (रेल्वे कोच फॅक्टरी) जाण्यासाठी चांगला रस्ता उपलब्ध नव्हता .  या कारखान्याकडे जाण्यासाठी रेल्वेमार्ग टाकावा लागणार आहे . लातूरच्या विकासाला चालना देणाऱ्या  या प्रकल्पासाठी  आमदार अमित देशमुख व दिलीपराव देशमुख यांनी मदतीची तयारी दर्शविली आहे . दिलीपराव देशमुख    मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे चेयरमन आहेत . या दोघांनीही कारखान्याच्या आवारातून  या कारखान्यासाठी रस्ता देण्यास संमती दिली आहे .  

मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या मागील बाजूस होणाऱ्या रेल्वेबोगी कारखान्याचा अप्रोच मार्ग मांजरा कारखाना परिसरातून जाणार आहे. या रेल्वेमार्गासाठी संबंधित यंत्रणेने रविवारी (ता. ११) सर्वेक्षणही केल्याने रेल्वेबोगी कारखान्याच्या निमित्ताने विकासाच्या राजकारणाचा नवा अध्यायही घडून येणार आहे.    

मेट्रो रेल्वे तसेच रेल्वे डब्यांची (बोगी) निर्मिती करणारा देशातील तिसरा कारखाना केंद्र सरकारने येथे मंजूर केला आहे. सुरवातीला हा कारखाना टेंभी (ता. औसा) येथे होणार असल्याच्या वावड्या उठल्या. त्या शांत होऊन हा कारखाना विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या मागील बाजूस अतिरिक्त एमआयडीसीतील विशेष आर्थिक क्षेत्रासाठी (सेझ) राखून ठेवलेल्या 139 हेक्टर जमिनीवर उभारण्याचे निश्चित झाले आहे.

 या जागेत नियोजित कारखान्याचे भूमिपूजन ३१ मार्च रोजी रेल्वेमंत्री पियुष गोयल व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार असल्याची माहिती पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर  यांनी  दिली. या पार्श्वभूमीवर नियोजित रेल्वे कारखान्यासाठी अस्तित्वात असलेल्या लातूर - मुंबई रेल्वेमार्गापासून नवा अॅप्रोच रेल्वेमार्ग तयार करण्यासाठी चाचपणी सुरू होती.

अॅप्रोच रेल्वेमार्गाच्या विविध पर्यायानंतर मांजरा कारखान्याच्या मागील बाजूने व जवाहर नवोदय विद्यालयासमोरून लातूर - मुंबई रेल्वेमार्गापर्यंत हा अॅप्रोच मार्ग सोयीचा होणार असल्याचे सर्वेक्षणात दिसून आले. मात्र, हा मार्ग मांजरा कारखाना परिसरातूनच जात असल्याने प्रशासकीय यंत्रणेसमोर पेच निर्माण झाला.

मांजरा कारखाना कॉंग्रेसच्या ताब्यात असल्याने व रेल्वे कारखान्यासाठी भाजपकडून पुढाकार होत असल्याने कॉंग्रेसकडून आडकाठी होईल का? अशी शंका पुढे आली. मात्र, जिल्ह्याच्या विकासासाठी नेहमी सकारात्मक भूमिका घेणाऱ्या कॉंग्रेसच्या नेत्यांनी या अॅप्रोच रेल्वेमार्गासाठी एका क्षणात होकार दिल्याचे सांगण्यात येत आहे.

संबंधित लेख