latur politics | Sarkarnama

लातुरात महापौर, उपमहापौर  निवडीच्या हालचालीस वेग 

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 12 मे 2017

लातूर महापालिकेच्या निवडणुकीनंतर महापौर व उपमहापौरांच्या निवडीसाठी ता.22 मे रोजी नूतन सदस्यांची बैठक होणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली आवश्‍यकतेनुसार हात वर करून मतदान होणार आहे. त्यामुळे काठावरचे बहुमत मिळविलेल्या भाजपमध्ये राजकीय हालचालींना वेग आला आहे. 

लातूर : महापालिकेच्या निवडणुकीनंतर महापौर व उपमहापौरांच्या निवडीसाठी ता.22 मे रोजी नूतन सदस्यांची बैठक होणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली आवश्‍यकतेनुसार हात वर करून मतदान होणार आहे. त्यामुळे काठावरचे बहुमत मिळविलेल्या भाजपमध्ये राजकीय हालचालींना वेग आला आहे. 

विभागीय आयुक्तांनी जिल्हाधिकाऱ्यांची पीठासीन अधिकारी म्हणून निवड केली असून, त्यांच्या अध्यक्षतेखाली ता. 22 मेरोजी नूतन सदस्यांची बैठक होणार आहे. यात महापौर व उपमहापौरांची निवड केली जाईल. या पदांसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासंदर्भात स्वतंत्र कार्यक्रम जाहीर होणार असून, ता. 22 रोजी फक्त उमेदवारी अर्ज मागे घेणे व हात वर करून मतदान घेण्याची प्रक्रिया राबविली जाणार आहे. त्यामुळे भाजपमध्ये महापौर व उपमहापौरपद मिळविण्यासाठी हालचालींना वेग आला आहे. शहराचे प्रथम नागरिक तथा महापौरपद मिळणे प्रतिष्ठेचे आहे. महापौरपद सर्वसाधारण गटासाठी असल्याने पक्षांतर्गत चुरस वाढली. 

शुभ- अशुभ दिवसाची जादू! 
विद्यमान पदाधिकाऱ्यांची मुदत ता. 20 रोजी संपत असल्याने नव्या पदाधिकाऱ्यांचे पदग्रहण ता. 21 रोजी अपेक्षित होते. त्यासाठी ता. 19 किंवा 20 मे रोजी महापौर व उपमहापौरांची निवड अपेक्षित होती. मात्र, विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर यांनी ता. 22 रोजी नूतन सदस्यांची बैठक बोलावली. पंचांगानुसार कृष्ण पक्षातील ता. 21 रोजी दुपारी पाचपर्यंतचा काळ प्रतिकूल तर, ता. 22 रोजीचा दिवस शुभ म्हणून नोंदला आहे. कदाचित यामुळेच विभागीय आयुक्तांनी ता. 22 रोजी बैठकीचा मुहूर्त शोधला असेल. मात्र, ता. 21 मे हा दिवस जुन्या किंवा नव्या महापौराशिवाय महापालिका चालणार आहे.

संबंधित लेख