Latur Municipal commissioner transffered in 4 months | Sarkarnama

लातूर महापालिका : भाजप नगरसेवकांशी जमले नाही ,आयुक्त  हंगेची चार महिन्यात बदली

सरकारनामा ब्युरो 
बुधवार, 7 मार्च 2018

श्री. दिवेगावकर  यांनी  स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातून एम . ए . मराठी केले आहे . लातूरच्या केशवराज विद्यालयात त्यांचे शिक्षण झालेले आहे . 

लातूर  :  चार महिन्यांपूर्वी येथील महापालिका आयुक्तपदाचा अच्युत हंगे यांनी पदभार स्वीकारला होता; मात्र सत्ताधारी भाजपच्या नगरसेवकांसोबत त्यांचे जमले नाही. परिणामी त्यांची तेथून बदली करण्यात आली. त्यांच्या जागी लातूरचे भूमिपुत्र असलेले कौस्तुभ दिवेगावकर यांची आयुक्त म्हणून येथे बदली केली गेली.

विशेष म्हणजे श्री. दिवेगावकर यांची मंगळवारी (ता. 6) दुपारी पुणे येथे बदली झाली होती. ती तातडीने रद्द करून सायंकाळी लातूरचे आयुक्त म्हणून त्यांची बदली करण्यात आली आहे. श्री. हंगे यांना अद्यापही नियुक्ती देण्यात आलेले नाही.

श्री. हंगे यांनी पिंपरी चिंचवडसारख्या मोठ्या महापालिकेत काम केले होते. पण येथे भाजप नगरसेवकांशी त्यांचे जमले नाही. काही दिवसांपूर्वी झालेली सर्वसाधारण सभा ही अवैध आहे, असे त्यांनी सभागृहातच सांगितल्याने महापौर सुरेश पवार तोंडघशी पडले होते. यात कॉंग्रेस नगरसेवकांनी आयुक्तांची बाजू धरत सभाच होऊ दिली नव्हती. या प्रकारानंतर भाजपचे नगरसेवक नाराज होते. त्यात कामेही होत नसल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या.

शहरातील वीज, पाण्याच्या प्रश्‍नांकडे दुर्लक्ष होत असल्याच्या तक्रारी नगरसेवकांनी पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्याकडे केल्या. त्यामुळे त्यांच्या बदलीची चर्चा सुरू होती.मंगळवारी पालकमंत्री निलंगेकर यांनी मुंबई मंत्रालयात महापौर सुरेश पवार, उपमहापौर देविदास काळे, सभागृहनेते ऍड. शैलेश गोजमगुंडे आदींची बैठक घेतली. यात श्री. हंगे यांच्याबद्दल तक्रारी करण्यात आल्या. 

 राज्यातील काही आयएएस अधिकाऱ्यांच्या शासनाने बदल्या केल्या आहेत.  यात कौस्तुभ दिवेगावकर यांची पुणे येथे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त म्हणून बदली करण्यात आली होती. नंतर सायंकाळी मात्र श्री. दिवेगावकर यांची लातूरचे महापालिका आयुक्त म्हणून बदली करण्यात आली आहे.

श्री. दिवेगावकर यांच्यारूपाने लातूर महापालिकेला पहिल्यांदाच भूमिपुत्र प्रमुख अधिकारी मिळाला आहे. श्री. दिवेगावकर यापूर्वी जळगांव जिल्हा परिषदेचे  मुख्य कार्यकारी अधिकारी होते .  त्यापूर्वी त्यांनी केंद्रीय वन आणि पर्यावरण खात्यात असिस्टंट सेक्रेटरी म्हणून काम केलेले आहे . त्यांनी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातून एम . ए . मराठी केले आहे . लातूरच्या केशवराज विद्यालयात त्यांचे शिक्षण झालेले आहे . 

संबंधित लेख