रेल्वेच्या मुद्यावर खासदार गायकवाड यांची कोंडी

 रेल्वेच्या मुद्यावर खासदार गायकवाड यांची कोंडी

लातूर : लातूर-मुंबई-लातूर रेल्वेचा कर्नाटकातल्या बिदरपर्यंत विस्तार केल्याने लातूरकर प्रचंड संतापले आहेत. कर्नाटकने हक्काची रेल्वे पळवल्याचा आरोप करत लोक रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत. लातूरच्या जनतेमध्ये या निर्णयामुळे संताप आहे, तर उदगीरकरांची या निर्णयामुळे सोय झाल्यामुळे त्यांनी जल्लोष केला आहे. या मुद्यावर नेमकी लातूरकरांची बाजू घ्यायची की उदगीरकरांची या कात्रीत खासदार डॉ. सुनील गायकवाड सापडले आहेत.

उदगीरच्या बाजूने बोलावे तर लातूरचे लोक नाराज होतात, लातूरकरांचे समर्थन करावे तर उदगीरकर नाराज होतात. लातूर-मुंबई रेल्वे बिदरपर्यंत नेल्यामुळे खासदार गायकवाडांच्या विरोधात लातूरमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे. यावर गायकवाड यांनी सोशल मिडियावर एक व्हिडिओ व्हायरल करत मी लातूरकरांच्या सोबत असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे आता उदगीरचे मतदार खप्पा झाल्याची चर्चा आहे. कुणा एकाची बाजू घेता येत नसल्याने खासदार गायकवाडांची पुरती गोची झाल्याचे दिसून आले आहे. 

कर्नाटकात लवकरच विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. या पार्श्‍वभूमीवर आणि बिदरकरांची मागणी लक्षात घेऊन बिदरचे भाजप खासदार भगवंत खुब्बा यांनी केंद्रातील आपले वजन वापरून लातूर-मुंबई-लातूर ही एक्‍स्प्रेस गाडी बिदरपर्यंत वाढवून घेतली. लातूर-मुंबई एक्‍स्प्रेसला लातूरमधूनच 120 टक्के एवढा प्रतिसाद असतांना ही रेल्वे बिदरपर्यंत का नेण्यात आली असा सवाल लातूरकर उपस्थित करत आहेत. लातूर लोकसभा मतदारसंघातीलच उदगीरच्या जनतेला मात्र या विस्तारामुळे थेट मुंबईला जाण्याची सोय झाली आहे. त्यामुळे या निर्णयाचे त्यांनी स्वागत केले.

आता एकाच मतदारसंघातील काही लोक खूष तर काही नाराज असल्याने नेमकी काय भूमिका घ्यावी असा पेच खासदार गायकवाड यांना पडला होता. त्यातच सोशल मिडियावर गायकवाड यांच्यांवर टिका करणाऱ्या पोस्ट पडायला लागल्याने ते अस्वस्थ झाले होते. मनाची होणारी घालमेल आणि कोंडी फोडण्यासाठी अखेर गायकवाड यांनी देखील सोशल मिडियाचा आधार घेतला आणि मी लातूरकरांच्या सोबत असल्याचा व्हिडिओ जारी केला. याचाच दुसरा अर्थ ते उदगीरकरांच्या विरोधात असल्याचा काढला जात आहे. त्यामुळे लातूरकरांच्या तर कधी उदगीरकरांच्या पाठीशी मी असल्याचे गोलमोल उत्तर देत खासदार गायकवाड तापलेले वातावरण शांत होण्याची वाट पाहत आहेत. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com