Latur Maratha Reservation : suiside attempt foiled | Sarkarnama

मराठा आरक्षण : लातुरात पाण्याच्या टाकीवर आत्महत्येचा प्रयत्न

हरी तुगावकर
गुरुवार, 2 ऑगस्ट 2018

महापालिकेच्या पाण्याच्या टाकीवर जावून गुरुवारी (ता. २) दोन तरुणांनी रॉकेल अंगावर ओतून घेवून आत्महत्येचा प्रयत्न केला. पोलिसांनी वेळीच त्यांना ताब्यात घेतल्याने पुढील अनर्थ टळला.

लातूर :   येथील औसा रस्त्यावरील सदभावनानगरमधील महापालिकेच्या पाण्याच्या टाकीवर जावून गुरुवारी (ता. २) दोन तरुणांनी रॉकेल अंगावर ओतून घेवून आत्महत्येचा प्रयत्न केला. पोलिसांनी वेळीच त्यांना ताब्यात घेतल्याने पुढील अनर्थ टळला. मराठा समाजाला आरक्षण मिळावे अशी मागणी हे तरुण करीत होते.

गेल्या काही दिवसापासून मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी आंदोलने सुरु आहेत. गुरुवारी शहरात एकीकडे आमदारांच्या घऱासमोर मराठा क्रांती मोर्चाचे ठिय्या आंदोलन सुरु होते. तर दुसरीकडे  औसा रस्त्यावरील सदभावनानगर भागात असलेल्या महापालिकेच्या पाण्याच्या टाकीवर बालाजी गवळी व मिलिंद सरवदे हे तरुण रॉकेलचा डब्बा, भगवा झेंडा व मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे असा फलक घेवून चढले.

 पाण्याच्या टाकीवर जावून त्यांनी घोषणा द्यायला सुरवात केली. याची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलिस ठाण्याचे अधिकारी व पोलिस घटनास्थळी पोहचले. या तरुणांनी अंगावर रॉकेलही ओतून घेतले होते. या दोन्ही तरुणांची समजूत काढून त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आल्याची माहिती शिवाजीनगर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक नानासाहेब लाकाळ यांनी दिली.
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख