लातूर लोकसभाः भाजपच्या  डॉ.सुनील गायकवाड यांना काँग्रेसमध्ये जोड लागणार का ? 

आरक्षित असलेल्या या मतदारसंघातून उमेदवारी मिळावी यासाठी भाजपचे विद्यमान खासदार डॉ.सुनील गायकवाड, व जिल्हा परिषद सदस्य सुधाकर शृंगारे यांच्यात रस्सीखेच होण्याची शक्‍यता आहे. तर कॉंग्रेसला मात्र पुन्हा उमेदवारासाठी शोध मोहिम राबवावी लागणार असे दिसते.
Latur-loksabha
Latur-loksabha

लातूर :  लोकसभा निवडणुकीला दीड वर्षाचा अवकाश असला तरी जिल्ह्यात कॉंग्रेस, भाजपसह इतर राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे.

मागास वर्गासाठी आरक्षित असलेल्या या मतदारसंघातून उमेदवारी मिळावी यासाठी भाजपचे विद्यमान खासदार डॉ.सुनील गायकवाड, व जिल्हा परिषद सदस्य सुधाकर शृंगारे यांच्यात रस्सीखेच होण्याची शक्‍यता आहे. तर कॉंग्रेसला मात्र पुन्हा उमेदवारासाठी शोध मोहिम राबवावी लागणार असे दिसते.

दिवंगत विलासराव देशमुख, माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर, माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर अशा मातब्बर नेत्यामुळे लातूर जिल्हा सुरुवातीपासूनच कॉंग्रेसचा गड राहिला.

शिवराज पाटील चाकूरकर हे सलग सात वेळा या मतदारसंघातून विजयी झाले होते. 2004 मध्ये भाजपच्या रुपाताई पाटील निलंगेकर यांनी सासरे माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचा पराभव करत पहिल्यांदा जिल्ह्यात भाजपला विजय मिळवून दिला होता. त्यांनतर 2014 च्या मोदी लाटेत डॉ. सुनील गायकवाड निवडून आले.

2014 च्या निवडणूकीत भाजपला जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात यश मिळाले. ही उर्जा घेऊनच पुढे येणाऱ्या सगळ्या निवडणूकीत कॉंग्रेसचा पराभव करत जिल्हा कॉंग्रेसमुक्त करण्याचा विडा भाजपने उचलला होता.

राज्याचे कामगार व कौशल्य विकासमंत्री व मुख्यमंत्र्याचे विश्‍वासू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांच्यावर ही जबाबदारी पक्षनेतृत्वाने सोपवली होती. त्या सोबतच जिल्ह्याचे पालक मंत्रीपदही त्यांना बहाल करण्यात आले होते.

मुख्यमंत्र्यांनी दाखवलेला हा विश्‍वास संभाजी पाटील निलंगेकर यांनी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकीत दणदणीत यश मिळवून सार्थ ठरवला. जिल्हा परिषद, पंचायत समिती, महापालिका, नगरपालिका निवडणुकीत भाजपने जोरदार मुसंडी मारत झिरो टू हिरोपर्यंतची मजल गाठली.


कॉंग्रेसच्या सत्तेला सुरूंग लावत सुरू झालेली ही घोडदौड आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूकीत सुरुच ठेवण्याचा भाजपचा प्रयत्न आहे.

लातूर लोकसभा मतदारसंघात लातूर शहर, ग्रामीण, निलंगा, अहमदपूर, उदगीर आणि औसा हे सहा विधानसभा मतदारसंघ येतात. यापैकी निलंगा संभाजी पाटील निलंगेकर आणि उदगीर मध्ये भाजपचे सुधीर भालेराव हे दोन आमदार आहेत.

अहमदपूरचे आमदार विनायक पाटील यांनी देखील भाजपमध्ये प्रवेश केल्याने सहापैकी तीन विधानसभा मतदारसंघ सध्या भाजपकडे आहेत. तर उर्वरित लातूर शहर अमित देशमुख, लातूर ग्रामीण ऍड. त्र्यंबक भिसे व औसा विधानसभा मतदारसंघात बसवराज पाटील हे कॉंग्रेसचे प्रतिनिधित्व करतात.

खासदार गायकवाड पुन्हा चर्चेत

2014 मध्ये अडीच लाख मतांनी निवडूण आलेले भाजप खासदार डॉ. सुनील गायकवाड यांच्याकडे आगामी लोकसभा निवडणूकीचे उमेदवार म्हणून बघितले जाते. पण गेल्या साडेतीन वर्षातील खासदार गायकवाड यांच्या कार्यपध्दतीवर पक्षातील पदाधिकाऱ्यांची त्यांच्यावर असलेली नाराजी त्यांना अडचणीची ठरू शकते.

लातूर यशवंतपूर रेल्वे आणण्याचे श्रेय कुणाचे यावरू पालकमंत्री निलंगेकर यांच्याशी गायकवाड यांचा वाद जिल्ह्यात चांगलाच गाजला. यावरून त्यांच्यातील मतभेदाची चर्चा देखील राजकीय वर्तुळात रंगली होती. पण हा वाद जास्त चिघळू न देता रेल्वेच्या उदघाटन प्रसंगी दोघांनी एकमेकांना पेढा भरवत 'हम साथ साथ है' असे भासवण्याचा प्रयत्न केला. पण या दोघांमधील धुसफूस अद्याप कायम असल्याचे बोलले जाते.

त्यामुळे डॉ. गायकवाड यांना उमेदवारी मिळू नये यासाठी भाजपमधील एक गट सक्रीय असल्याचे कळते. खासदार गायकवाड यांना पर्याय म्हणून आता या नाराज गटाने जिल्हा परिषद सदस्य सुधाकर शृंगारे यांचे नाव लोकसभेचा उमेदवार म्हणून पुढे केले आहे. शृंगारे हे कंत्राटदार असून आर्थिकदृष्ट्याही सक्षम आहेत. शिवाय पालकमंत्री निलंगेकर यांच्याशी असलेली जवळीक देखील त्यांना उमेदवारी पदरात पाडून घेण्यासाठी कामी येऊ शकते असा अंदाज आहे.

तर दुसरीकडे लोकसभेची उमेदवारी मिळवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जे निकष लावले आहेत त्यात आपण पुढे असल्याचा दावा करत लोकसभेची उमेदवारी आपल्यालाच मिळणार असा विश्‍वास विद्यमान खासदार गायकवाड व्यक्त करतांना दिसतात.

कॉंग्रेस उमेदवाराच्या शोधात

मागास वर्गासाठी राखीव असेल्या लातूर मतदारसंघात कॉंग्रेसला याही वेळी उमेदवार शोधावा लागणार अशी परिस्थिती आहे. माजी केंद्रीयमंत्री शिवराज पाटील चाकूरकर, माजी मुख्यमंत्री डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर, माजीमंत्री आमदार दिलीपराव देशमुख, माजी राज्यमंत्री आमदार अमित देशमुख अशी नेत्यांची फौज कॉंग्रेसकडे आहे. परंतु मतदारसंघ राखीव असल्याने कॉंग्रेसवर उमेदवार शोधण्याची वेळ आली आहे. यापुर्वी देखील 2009 मध्ये कोल्हापूरच्या जयवंतराव आवळे यांना लातूरात आयात करण्यात आले होते.

मागील काही महिन्यापासून शिवराज पाटील चाकूरकर यांचे लातूर दौरे अचनाक वाढले आहेत. त्यामुळे लोकसभा उमेदवार निवडीत त्यांची भूमिका महत्वाची असणार अशी चर्चा आहे. तर दुसरीकडे अमित देशमुख सांगतिल तोच उमेदवार असेल अस त्यांचे समर्थक ठामपणे सांगताना दिसतात. सध्या तरी कॉंग्रेसकडून संभाव्य उमेदवार म्हणून कुणाचेही नाव पुढे येतांना दिसत नाहीये.

आगामी लोकसभा, विधानसभा निवडणूकीसाठी कॉंग्रेस-राष्ट्रवादीमध्ये आघाडी होण्याची शक्‍यता आहे. आघाडीत लातूर मतदारसंघ कॉंग्रेसच्या वाट्याला असल्याने राष्ट्रवादीत सध्या तरी या संदर्भात कुठल्याच हालचाली नाहीत.

हीच स्थिती शिवसेनेची देखील आहे. या दोन्ही पक्षांना स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकीत जिल्ह्यात फारसे यश मिळालेले नाही. शिवसेनेने स्वबळाचा नारा दिला असला तरी लोकसभेचा संभाव्य उमेदवार कोण याचे उत्तर सध्या तरी शिवसेनेकडे नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com