कॉंग्रेसची गळती थांबली, आता शिवसेना, राष्ट्रवादीतून आऊटगोईंग

कॉंग्रेसची गळती थांबली, आता शिवसेना, राष्ट्रवादीतून आऊटगोईंग

लातूर ः जिल्हा परिषदेच्या निवडणुकीनंतर भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्यांची वाढती संख्या रोखण्यात कॉंग्रेस नेतृत्वाला तूर्तास तरी काही प्रमाणात यश आले आहे. कॉंग्रेसची गळती थांबली तरी भाजपमधील इनकमिंग काही केल्या थांबत नाहीये. आता शिवसेना व राष्ट्रवादीच्या दोन नगरसेवकांनी आपापल्या पक्षाचा राजीनामा दिला आहे. पैकी शिवसेनेचे नगरसेवक व इतर पदाधिकारी भाजपवासी झाले आहेत, तर राष्ट्रवादीचा नगरसेवक देखील लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा शहरात सुरू आहे. 

सध्या महापालिका निवडणुकीचे वारे जोरात असून, राजकीय कार्यकर्ते सोयीचे प्रभाग आणि निवडणुकीची गणिते लक्षात घेऊन या पक्षातून त्या पक्षात उडी मारत आहेत. यात कॉंग्रेसचे आजी-माजी महापौर, उपमहापौर, नगरसेवक आघाडीवर होते.

सुरुवातीलाच कॉंग्रेसला जोरदार झटका बसल्यानंतर आमदार अमित देशमुख यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. त्यानंतर अमित देशमुख यांनी पक्षांतर करणारे लातूरमध्ये दिसणार नाहीत, असे वक्तव्य करून कार्यकर्त्यांना सूचक इशारा दिला. तसेच प्रत्येकाशी संपर्क साधून ढासळणारी गढी सावरण्याचे प्रयत्न केले. त्यात सध्या तरी त्यांना यश मिळाल्याचे दिसते. 
घड्याळ बंद, बाणही हुकला 
कॉंग्रेसला खिंडार बुजवण्यात यश आले असले तरी भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्यांची संख्या कमी झालेली नाही. शिवसेनेचे नगरसेवक तथा महानगरप्रमुख रवी सुडे, शहर संघटक धनराज साठे व शहरप्रमुख प्रमोद गुडे यांनी धनुष्य खाली ठेवून भाजपमध्ये प्रवेश केल्याने एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे शिवसेनेच्या नेत्यांना अंधारात ठेवून हा प्रवेश झाला. त्यामुळे दुसऱ्या दिवशी या तिघांची पक्षातून हकालपट्टी केल्याचे पत्रक काढत शिवसेनेने वरातीमागून घोडे हाकलल्याची चर्चा रंगली आहे.

शिवसेनेला गळती लागते न लागते तोच राष्ट्रवादीच्या घड्याळाचा सेल देखील वीक झाल्याचे दिसते. राष्ट्रवादीचे नगरसेवक शैलेश स्वामी यांनी देखील पक्षाचा राजीनामा देत भाजपत प्रवेश करण्याची तयारी केली आहे. जिल्हा परिषदे प्रमाणेच आगामी महापालिका निवडणुकीत सत्तांतराचे जोरदार वारे वाहत असल्याने कॉंग्रेस व राष्ट्रवादीतून भाजपत जाणाऱ्यांची संख्या येत्या काही दिवसांमध्ये आणखी वाढण्याची शक्‍यता असून, या रांगेत माजी आमदारांचा पुत्र देखील असल्याची चर्चा आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com