लातूर महापालिकेत भाजप नगरसेवकांची बंडाळी? पालिकेच्या सभांना दांडी

भाजपमधील अतंर्गत लाथाळ्यांचे चित्र पुन्हा आज (ता. 18) झालेल्या सर्वसाधारण सभेतही दिसून आले. सत्ताधारी भाजपच्या 39 पैकी तब्बल 32 नगरसेवकांनी या सभेवर बहिष्कार टाकत महापौर सुरेश पवार यांच्याही विरोधात बंड पुकारल्याचे दिसून आले.
लातूर महापालिकेत भाजप नगरसेवकांची बंडाळी? पालिकेच्या सभांना दांडी

लातूर : लातूर महापालिकेत स्थायी समिती सभापतीच्या पाठोपाठ महापौरांच्या विरोधात भाजपच्याच नगरसेवकांनी अविश्‍वास दाखवत बंडाचा झेंडा फडकवला आहे. त्यामुळे महापालिकेत भाजपचा इस्कोट झाल्याची चर्चा सुरू झाली आहे. भाजपमधील लाथाळ्यांमुळे विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसला मात्र आनंदाच्या उकळ्या फुटतांना दिसत आहेत. भाजप नगरसेवकांच्या बंडाळी मागची नेमकी कारणे काय याकडे आता पक्षनेतृत्वाने गांभीर्याने पाहण्याची गरज निर्माण झाली आहे. 

काँग्रेसच्या कारभाराला कंटाळून लातूरकरांनी गेल्या निवडणुकीत भाजपकडे सत्ता दिली. राज्यात व केंद्रात सत्तेत असलेल्याचा फायदा लातूरच्या विकासासाठी करता येईल ही आशा मात्र आता फोल ठरतांना दिसत आहे. दीड वर्षात शहराचा अपेक्षित विकास तर झाला नाहीच, पण भाजपमधील अंतर्गत मतभेदच चव्हाट्यावर आले. 

लातूर भाजपमध्ये नेते अधिक झाल्याने नगरसेवकांमध्ये एकजूट निर्माण करून पक्षाची बांधणी करण्यात जिल्ह्यातील नेतृत्वाला अपयश आल्याचे बोलले जाते. परिणाम स्थायी समिती सभापती पाठोपाठ भाजप महापौरांच्या विरोधात त्यांच्याच पक्षातील 32 नगरसेवकांनी बंड पुकारल्याचे चित्र मंगळवारी स्थायी समिती बैठकीत दिसले. सत्ताधारी पक्षाचेच चार नगरसेवक गैरहजर राहिल्याने सभापती शैलेश गोजमगुंडे यांच्यावर सभा रद्द करण्याची नामुष्की ओढावली. मंगळवारची स्थायी समिती सभा रद्द झाली. 150 कोटीच्या निविदा संदर्भातील ही सभा होती. 

सर्वसाधारण सभेलाही नगरसेवकांची दांडी
भाजपमधील अतंर्गत लाथाळ्यांचे चित्र पुन्हा आज (ता. 18) झालेल्या सर्वसाधारण सभेतही दिसून आले. सत्ताधारी भाजपच्या 39 पैकी तब्बल 32 नगरसेवकांनी या सभेवर बहिष्कार टाकत महापौर सुरेश पवार यांच्याही विरोधात बंड पुकारल्याचे दिसून आले. आम्हाला विश्‍वासात घेतले जात नाही असा भाजप नगरसेवकांचा त्यांच्यावर आरोप असल्याचे कळते. महापौरांनी मात्र सभा अपरिहार्य कारणामुळे रद्द करत असल्याचे सांगत पक्षात सगळे अलबेल असल्याचे भासवण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. 

गेल्या वर्षी महापौरपदी सुरेश पवार यांची निवड झाल्यापासूनच भाजप नगरसेवकांचा एक मोठा गट नाराज असल्याचे बोलले जाते. काही दिवसापूर्वी स्थायी समितीच्या सभापतीपदी अॅड. शैलेश गोजमगुंडे यांची झालेली निवड देखील अनेक नगरसेवकांना खटकली होती. 

सभापती पदी नव्या सदस्याला संधी दिली जावी अशी भाजप नगरसेवकांची मागणी होती. पण त्याकडे दुर्लक्ष करत गोजमगुंडे यांना या पदावर बसवण्यात आले होते. त्याचे पडसाद आता उमटायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे 'अर्थहीन' सभा होवू लागल्याने नगरसेवकांमध्ये कमालीची अस्वस्थता आहे. आता भाजपच्या बहुतांश नगरसेवकांनी फडकावलेल्या बंडाच्या निशाणावर पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर कोणता उपाय शोधतात याकडे लातूरकरांचे लक्ष लागले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com