Late Vinayrao Patil's grandson Vishwas enters politics | Sarkarnama

दिवंगत विनायकराव पाटील यांच्या नातवाची राजकारणात एन्ट्री 

जगदीश पानसरे 
गुरुवार, 13 सप्टेंबर 2018

कॉंग्रेसचे माजी सहकार मंत्री तथा प्रदेशाध्यक्ष दिवंगत विनायकराव पाटील यांचे नातू विश्‍वास पाटील यांची राजकारणात एन्ट्री झाली आहे.

वैजापूरः कॉंग्रेसचे माजी सहकार मंत्री तथा प्रदेशाध्यक्ष दिवंगत विनायकराव पाटील यांचे नातू विश्‍वास पाटील यांची राजकारणात एन्ट्री झाली आहे. वैजापूर तालुक्‍यात 1962 ते 68 दरम्यान विविध सिंचन प्रकल्प उभारत हा भाग सुजलाम सुफलाम करण्यात विनायक पाटील यांची दुरदृष्टी आणि सिहांचा वाटा होता. 

मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या माध्यमातून त्यांनी शैक्षणिक संस्थांचे जाळे निर्माण केले, पण त्याच मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या संचालक पदावरून विनायकराव पाटील यांचे नातू विश्‍वास पाटील यांना नुकतेच दूर करण्यात आले आहे . त्यामुळे आगामी विधानसभा निवडणूक आपण लढवणार असल्याचे जाहीर करत त्यांनी राजकारणात उडी घेतली आहे. 

औरंगाबाद जिल्ह्यातील राजकीय इतिहासात वैजापूर तालुक्‍याचे वेगळेच महत्व आहे. माजी सहकार मंत्री व कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष पद भूषवलेले दिवंगत विनायक पाटील हे मोठे प्रस्थ होते. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष, माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार नेहमीच आपल्या भाषणात विनायक पाटील यांचा उल्लेख आर्वजून करतात. एवढेच नाही तर आपल्या राजकीय कारकीर्दीत विनायक पाटील आणि मराठवाड्याचे मोठे स्थान असल्याचेही त्यांनी अनेकवेळा सांगितले आहे. 

14 सप्टेंबर 1958 मध्ये मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या माध्यमातून विनायक पाटलांनी शैक्षणिक संस्थेचे  जाळे निर्माण केले. 1962 मध्ये त्यांच्या खांद्यावर कॉंग्रेस पक्षाची धुरा देण्यात आली. पक्षाचे काम करत असतांनाच 1967 मध्ये त्यांनी वैजापूर मधून विधानसभा निवडणूक लढवली आणि ते आमदार झाले. त्यांच्यावर सहकार विभागाची जबाबदारी टाकण्यात आली होती. वैजापूर सारख्या दुष्काळी भागात नांदूर-मधमेश्‍वर, मन्याड, शिवना टाकळी तसेच पालखेड डाव्या कालव्याच्या माध्यमातून सिंचन व पाण्याचा प्रश्‍न सोडवण्यात देखील विनायक पाटील यांची भूमिका मोलाची ठरली होती. 

आज घडीला  वैजापूर येथील विनायकराव पाटील महाविद्यालयाच्या माध्यमातून त्यांचे नातू विश्‍वास पाटील शैक्षणिक संस्थांचा कारभार हाकत आहेत. मात्र मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाची मुर्हूतमेढ ज्या विनायकराव पाटलांनी रोवली त्यांच्याचे नातू विश्‍वास पाटील यांची नुकतीच मंडळाच्या संचालक पदावरून उचलबांगडी करण्यात आली. हा अपमान सहन न झाल्यामुळे राजकारणात उतरून आगामी विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय विश्‍वास पाटील यांनी जाहीर केला आहे. 

विश्‍वास पाटील यांच्या राजकारण प्रवेशामुळे तालुक्‍यातील राजकारणाला कलटणी मिळण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे. आता विनायक पाटील थेट विधानसभा निवडणूक लढविताना की पंच्यात समिती जिल्हा परिषदेच्या मार्गाने जात हे पाहणे महत्वाचे ठरेल . विश्वास पाटील विधानसभा निवडणूक लढविणार असतील तर त्यांना कोणत्या पक्षाचे ग्रीन सिग्नल आहे हे त्यांनी अद्याप स्पष्ट केलेले नाही . कॉंग्रेसकडून लढणार की अन्य राजकीय पक्षांचा पर्याय त्यांच्या समोर आहे हे अद्याप त्यांनी स्पष्ट केलेले नाही. 

आगामी निवडणुकीत राष्ट्रवादीसोबत आघाडी करण्याचे कॉंग्रेसचे प्रयत्न सुरू आहेत.काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस यांची   आघाडी झाली तर पुन्हा  वैजापूर मतदारसंघ राष्ट्रवादीकडे जाणार हे निश्चित आहे .  विद्यमान आमदार व मराठा आरक्षणासाठी राजीनामा दिलेले भाऊसाहेब पाटील चिकटगांवकर यांनाच राष्ट्रवादीकडून पुन्हा उमेदवारी मिळणार हे जवळपास निश्‍चित आहे. 

संबंधित लेख