Last four days for Nanded Election | Sarkarnama

नांदेड निवडणुकीचा प्रचार शिगेला....उरले चार दिवस

अभय कुळकजाईकर
शनिवार, 7 ऑक्टोबर 2017

नांदेड : नांदेड महापालिका निवडणुकीचा प्रचार आता शिगेला पोहचला असून गेल्या तीन दिवसापासून प्रभागाप्रभागात जाहीर सभा, कॉर्नर बैठका, प्रचारफेऱ्यांचा जोर वाढला आहे. दरम्यान, विविध पक्षांची नेतेमंडळी देखील नांदेडात दाखल झाली असून त्यांच्या प्रचारसभांचेही आयोजन करण्यात आले आहे.

नांदेड : नांदेड महापालिका निवडणुकीचा प्रचार आता शिगेला पोहचला असून गेल्या तीन दिवसापासून प्रभागाप्रभागात जाहीर सभा, कॉर्नर बैठका, प्रचारफेऱ्यांचा जोर वाढला आहे. दरम्यान, विविध पक्षांची नेतेमंडळी देखील नांदेडात दाखल झाली असून त्यांच्या प्रचारसभांचेही आयोजन करण्यात आले आहे.

दरम्यान, या निवडणुकीसाठी काँग्रेसने संकल्पनामा, भाजपाने नवसंकल्पनामा तर शिवसेनेने अभिवचननामा प्रसिद्ध केला आहे. नांदेड महापालिका निवडणुकीसाठी येत्या ता. ११ आक्टोबर रोजी मतदान होत असून आता शेवटच्या टप्प्यात नेतेमंडळींच्या जोरदार सभांचा धडाका सुरू आहे. सध्याच्या परिस्थितीत काँग्रेस विरूद्ध भाजप असा जोरदार सामना सुरू असून शिवसेना, राष्ट्रवादी आणि एमआयएम पक्षांसह इतरही पक्ष रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे ८१ जागांसाठी २० प्रभागात चौरंगी, पंचरंगी सामने रंगले आहेत.

आरोप - प्रत्यारोपांच्या फैरीसोबत नांदेडचा विकास आम्हीच करणार, असा दावा सर्वच पक्षाच्या नेत्यांनी केला आहे. महापालिकेच्या निवडणुकीचा प्रचार सोमवारी (ता. नऊ) सायंकाळी पाच वाजता संपणार आहे. उमेदवारांकडे प्रचारासाठी अवघे चार दिवस उरले आहेत. त्यामुळे उमेदवारांनी प्रचाराचा जोर लावला असून प्रचार शिगेला पोचला आहे.
प्रथमच बहुसदस्यीय पद्धतीने निवडणूक होत आहे. त्यामुळे प्रभाग मोठा झाला असून मतदार संख्या वाढली आहे. मतदारांपर्यंत पोचण्यात उमेदवारांच्या नाकीनऊ येत आहे. यंदा काँग्रेस, भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी प्रमुख पक्ष स्वतंत्र निवडणूक लढवत आहेत. सर्वंच पक्षांकडून आपली बाजू मतदारांसमोर मांडण्याचा प्रयत्न केला जात आहे. मतदारांवर आश्वासनांची खैरात केली जात आहे. विविध नेत्यांच्या सभा घेऊन मतदारांपर्यंत आपली भूमिका पोचविली जात आहे.

मतदानाला चार दिवस शिल्लक असल्याने उमेदवारांचा प्रचारा जोरात सुरू आहे. 'डोअर टू डोअर', पदयात्रा, मतदारांच्या प्रत्यक्ष भेटी-गाठी, प्रचार फेऱ्या, रॅली काढली जात आहे. उमेदवारांकडून प्रचाराचे वेगवेगळे फंडे लढवले जात आहेत. एलईडी स्क्रिन असलेला प्रचार रथा मतदार संघात फिरविले जात आहे. प्रभागातील शेवटच्या मतदारापर्यंत पोचण्याचे उमेदवारांचे प्रयत्न सुरू आहेत. चौका-चौकात निवडणुकीची चर्चा सुरू झाली आहे. कार्यकर्ते, पदाधिकारी आपलाच उमेदवार निवडून येणार असल्याचे सांगत आहेत. प्रभागात उमेदवारांबरोबर आता कार्यकर्त्यांचे जथ्थे दिसू लागले आहेत

भाजपचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे, सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले,  कामगारमंत्री संभाजी पाटील निलंगेकर, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, आमदार सुजितसिंह ठाकूर आदींनी प्रभागाप्रभागात सभा घेतल्या आहेत. आता इतर मंत्रीही येणार असून प्रत्येक प्रभागात दोन मंत्री राहणार आहेत. सोमवारी (ता. नऊ) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा होणार आहे.

काँग्रेसतर्फेही माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण नांदेडात तळ ठोकून असून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री नसीमखान, रमेश बागवे, आमदार शरद रणपिसे, उपसभापती माणिकराव ठाकरे आदींच्या उपस्थितीत सभा झाल्या आहेत. शिवसेनेतर्फे पर्यावरणमंत्री रामदास कदम, पालकमंत्री अर्जुन खोतकर, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, खासदार चंद्रकांत खैरे आदींच्या उपस्थितीत सभा झाल्या आहेत. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे रविवारी (ता. आठ) नांदेडला येत असून त्या दृष्टीने नियोजन करण्यात येत आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख