कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी महिला सरपंचाने मंगळसूत्र ठेवले गहाण 

कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी महिला सरपंचाने मंगळसूत्र ठेवले गहाण 

नाशिक : ताटावर बसण्याआधी आपला कर्मचारी जेवला का? याची काळजी अन्‌ विचारणा करणारे नेते इतिहासजमा झाले. मात्र, जिव्हाळ्याची ही भावना, चांगुलपणा संपलेला नाही याची जाणीव करुन देणारी घटना येथे घडली. एकलहरे ग्रामपंचायतीकडे पैसे नसल्याने दिवाळीत कर्मचाऱ्यांचे वेतन रखडले. या कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड व्हावी, दारात पणती पेटावी म्हणुन सरपंच मोहिनी जाधव यांनी चक्क मंगळसूत्र गहाण ठेवले. संसार असो वा गावगाडा महिला त्यागासाठी मागे नाहीत याचे उदाहरण त्यांनी घालून दिले. 

एकलहरे (नाशिक) ग्रामपंचायतीस महाराष्ट्र राज्य वीजनिर्मिती कारखान्याची कलम 125 नुसार ठोक अंशदानरूपी घरपट्टी दर वर्षी एप्रिलच्या अखेरपर्यंत जमा होत असे. महाराष्ट्र शासनाने कलम 125 रद्द करून कलम 124 नुसार रेडिरेकनरच्या दराने घरपट्टी वसूल करण्याचे आदेश दिल्यानंतर त्यानुसार आर्थिकदृष्ट्या वीजनिर्मिती कंपनीला घरपट्टीची आकारणी करून बिल बजाविण्यात आले. वारंवार पाठपुरावा करूनसुद्धा घरपट्टीतून सूट मिळावी, हे कारण पुढे करून वीजनिर्मिती प्रशासनाकडून टाळाटाळ केली. 

त्यामुळे ग्रामपंचायतीच्या तिजोरीत खडखडाट होता. उत्पन्नाचे अतिरिक्त साधन नसल्याने कर्मचाऱ्यांचे वेतन थकले. कारभार चालवणेसुद्धा अवघड झाले. दिवाळीसारखा सण असल्याने ज्या कर्मचाऱ्यांच्या भरवशावर ग्रामपंचायतीचा कारभार चालतो, त्यांची व त्यांच्या कुटुंबाची दिवाळी चांगली व्हावी, या उद्देशाने सरपंच मोहिनी जाधव यांनी मंगळसूत्रासह दागिने बॅंकेत गहाण ठेवत 75 हजार रुपये कर्ज घेतले. त्यातून कर्मचाऱ्यांचे वेतन करुन त्यांची दिवाळी गोड केली. या निर्णयासंदर्भात त्यांचे सासरे दिलीप जाधव, पती संदीप यांनाही कल्पना दिली. 

(कै) यशवंतराव चव्हाण जेवणाच्या ताटावर बसताना कर्मचारी, गेटवरचा रखवालदार जेवला ना? याची विचारणा करीत. त्याची खात्री झाल्यावरच स्वतः जेवण करीत. सौ. जाधव यांचे पद लहान. त्या सामान्य गृहिणी. मात्र, त्यांनीही असाच काहीसा आदर्श मनाशी बाळगला असावा. कुटुंबासाठी किंवा शौचालयासाठी महिलेने दागिने गहाण किंवा विकल्याचे आपण वाचले किंवा दूरचित्रवाणीच्या अनेक वाहिन्यांवर बघितले. हे उदाहरण मात्र आगळेच म्हणावे लागेल. 

ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी आदेश देऊनसुद्धा वीज निर्मितीने कर देण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे रात्रंदिवस काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची दिवाळी अंधारात होऊ नये, यासाठी मी मंगळसूत्र गहाण टाकण्याचा निर्णय घेतला. 
- मोहिनी जाधव, सरपंच, ग्रामपंचायत, एकलहरे 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com