"कुकडी'च्या संघर्षपर्वाची अखेर 

घरची आर्थिक स्थिती बऱ्यापैकी असतानाही जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते कुंडलिकराव जगताप तथा तात्या नोकरी किंवा फक्त शेतीत रमले नाहीत. काहीतरी वेगळे करुन समाजाला ऊर्जितावस्था आणण्यासाठी तात्यांमधील कार्यकर्ता सतत सजग राहिला.
"कुकडी'च्या संघर्षपर्वाची अखेर 

नगर : घरची आर्थिक स्थिती बऱ्यापैकी असतानाही जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते कुंडलिकराव जगताप तथा तात्या नोकरी किंवा फक्त शेतीत रमले नाहीत. काहीतरी वेगळे करुन समाजाला ऊर्जितावस्था आणण्यासाठी तात्यांमधील कार्यकर्ता सतत सजग राहिला. 

महाविद्यालयीन काळात शिक्षणासाठी बाहेरगावी असलेल्या मुलांचे डबे एसटी बसमधून नेण्यासाठी त्यांनी आंदोलन केले. तेव्हापासून तात्यांच्या रुपाने संघर्षपर्वाला सुरुवात झाली. 

कुकडी सहकारी साखर कारखाना तब्बल दोन तपं संघर्ष करुन त्यांनी केवळ सुरु केला नाही. तो अत्यंत उत्तम पद्धतीने चालविलाही. सहकाराला शिक्षणासह इतर विविध संस्थांची जोड दिली. जिल्ह्यातही त्यांनी एकाकी संघर्ष केला.

"टीका'कारांना व "काड्या' करणाऱ्यांना या ध्येयवेड्या माणसाने कामाच्या माध्यमातून केवळ तोंडच दिले नाही, तर ते खऱ्या अर्थाने "श्रीगोंद्याचे विकासदूत' ठरले. कोणताही राजकीय वारसा नसताना तात्यांनी आपल्या "डेअरिंग'च्या व कुशाग्र बुद्धीच्या बळावर श्रीगोंद्याच्याच नव्हे तर जिल्ह्याच्या सहकार, शिक्षण व राजकारणात वेगळा ठसा उमटविला. त्यांच्या अचानक "एक्‍झिट'मुळे या सर्व क्षेत्रांमध्ये केवळ पोकळीच निर्माण झाली नाही, तर "कुकडी'च्या एका संघर्षपर्वाची अखेर झाली.
 
श्रीगोंदे तालुक्‍यातील पिंपळगाव पिसा येथील रामराव व सावित्रीबाई यांच्या कुटुंबात 14 मे 1948 रोजी तात्यांचा जन्म झाला. कुटुंब मोठे, आर्थिक स्थिती जेमतेम होती. थोड्याशा शेतीवरच या मोठ्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालायचा. आजोबा व पणजोबांचा करारी बाणा तात्यांमध्येही अवतरला. वडील रामराव यांनी गावच्या सरपंचपदाच्या कारकीर्दीत अनेक योजना गावात आणल्या. शाळेसाठी स्वखर्चाने शाळा खोल्या बांधल्या. सर्वधर्मीयांना बरोबर घेवून त्यांनी "गावगाडा' ओढला. त्यामुळेच गावाने तात्यांच्या वडिलांना दिलेली "दादा' ही उपाधी सत्कारणी लागली. 

वडिलांप्रमाणेच आई सावित्रीबाई यांच्या विचारांचा तात्यांच्या मनावर मोठा पगडा. पाटीलकी असतानाही तात्यांना बालवयात दोन पायली धान्य उसने आणण्यासाठी दुसऱ्याच्या दारात चकरा माराव्या लागायच्या. हुलग्याचे कढण, "मिलो'ची भाकरी खाऊन कसेबसे बालपण तरले. परंतु तशाही स्थितीत तात्यांनी जिद्द सोडली नाही. महाविद्यालयीन शिक्षणाच्या काळात कॉम्रेड बापूसाहेब भापकर व हिराबाई भापकर यांच्या विचारांचा पगडा त्यांच्यावर पडला. त्यातूनच तात्यांची संपूर्ण जिल्हा व राज्यानेही पाहिलेली लढाऊ वृत्ती बळावली व बहरलीही.
 
गरीबी अनुभवल्याने तात्यांची जनतेच्या अश्रुंशी नाळ जुळली. चळवळ्या वृत्तीमुळे नोकरीची संधी मिळुनही तात्यांनी नाकारली. घरी खायला अन्न नसतानाही त्यांनी राजकारणात उडी मारली. तत्कालीन ज्येष्ठ नेते बापूसाहेब भापकरांच्या सहवासात आल्यानंतर तात्यांमधील वक्तृत्व व नेतृत्वगुण बहरु लागले. 

मोर्चे व आंदोलनांमध्ये ते सहभागी होवू लागले. सन 1971 मध्ये लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने नगरच्या गांधी मैदानात झालेल्या विरोधी पक्षाच्या जाहीर सभेत तात्यांची तोफ धडाडली. त्यांचे भाषण ऐकल्यानंतर दिवंगत नेते शंकरराव काळे व अण्णासाहेब शिंदे यांनी त्यांना कॉंग्रेसमध्ये काम करण्याची गळ घातली. भिडस्त स्वभावाच्या तात्यांना या दोन नेत्यांच्या आवाहनाने कॉंग्रेसच्या जवळ आणले. तात्या कॉंग्रेसमेध्य सक्रिय झाले. तिसाव्या वर्षी त्यांना जिल्हा परिषदेत स्वीकृत सदस्यपदी नेमण्यात आले.
 
पिंपळगाव पिसा परिसरातील शेतकऱ्यांना ठोस उत्पादन देणारा कोणताही प्रकल्प नव्हता. या भागातील शेतकऱ्यांची साखर कारखाना सुरु करण्याची मागणी होती. तात्यांचेही विचारचक्र फिरत होते. आपल्या भागातील शेतकऱ्यांना स्वाभिमानाने जगता यावे, यासाठी या परिसराती कुकडी सहकारी साखर कारखाना उभारण्याचा चंग तात्यांनी बांधला. 

सन 1985 मध्ये नियोजित कुकडी सहकारी साखर कारखान्याचा प्रस्ताव राज्य व केंद्राकडे पाठविला. अनेक अडचणींचा सामना करीत पाच वर्षे संघर्ष केला. त्यानंतर 1990 मध्ये या नियोजित कारखान्याचे बॅंकेत खाते उघडण्यास परवानगी मिळाली. सन 1996 मध्ये कारखान्याला परवानगी मिळाली. तब्बल 16 वर्षांच्या अखंड प्रयत्नानंतर 2002 मध्ये "कुकडी'चा बॉयलर पेटला. या काळात तात्यांनी कारखान्यांसाठी अनेकांचे उंबरे झिजविले, कित्येत राजकीय तडजोडी स्वीकारल्या. या कारखान्याच्या व्यवस्थापनावर त्यांनी बारीक लक्ष ठेवले. परिणामी "कुकडी'चा आज राज्यातील अव्वल दर्जाच्या कारखान्यामध्ये समावेश झाला आहे. 

सहकाराच्या जोडीला सामाजिक व शैक्षणिक संस्थांची उभारणी तात्यांनी केली. दरम्यानच्या काळात राजकारणातही त्यांच्या कामाची दखल घेतली गेली. श्रीगोंदे पंचायत समितीचे सभापती, जिल्हा परिषद सदस्य आदी पदांवरही त्यांनी काम केले. या दोन्ही ठिकाणी त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटविला. राज्य सहकारी साखर संघाचे संचालक म्हणून काम करताना तात्यांनी शेतकरी हिताचे अनेक निर्णय घेण्यास भाग पाडले. 

"कुकडी'चे पाणी विसापूर धरणात सोडण्यासाठी आंदोलने केली. आशिया खंडात अग्रेसर असलेल्या नगर जिल्हा सहकारी बॅंकेतही त्यांनी संचालक म्हणून काम केले. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासह विलासराव देशमुख व इतर विविध नेत्यांशी तात्यांचे स्नेहाचे संबंध राहिले. 

श्रीगोंदे तालुक्‍याचे आमदार होण्याचे तात्यांचे स्वप्न होते. विधानसभेची 1980 ची निवडणूक त्यांनी लढविली. परंतु नशिबाने त्यांना साथ दिली नाही. प्रस्थापितांशी तात्यांनी कधीच तडजोड केली नाही. या मंडळींच्या विरोधातील तात्यांचा संघर्ष अखेरपर्यंत चालूच होता.
 
स्वतःचे आमदारकीचे स्वप्न तात्यांना स्वस्थ बसू देत नव्हते. मुलगा राहुल यांच्या रुपाने ते पूर्ण करण्याचा चंग त्यांनी बांधला. राहुल यांच्यातही वडिलांचे गुण हुबेहुब अवतरलेले. त्यामुळेच राहुल वयाच्या अवघ्या 21 व्या वर्षी "कुकडी'चे अध्यक्ष, 24 व्या वर्षी जिल्हा परिषद सदस्य झाले. 

गेल्या विधानसभा निवडणुकीत तात्यांचे आमदारकीचे स्वप्न वास्तवात उतरण्याचे योग जुळून आले. राहुल यांना राष्ट्रवादी कॉंग्रेसने उमेदवारी दिली. तात्यांनी सर्व नेते एकत्र केले. कॉंग्रेसचाही पाठिंबा मिळण्याची "अभिनव' घटना घडली अन्‌ राहुल आमदार झाले. त्यामुळे स्वप्न पूर्ण झाल्याचे तात्यांना मोठे समाधान होते.

राजकारणात व "कुकडी'च्या कामातही राहुल व त्यांच्या सहकाऱ्यांवर तात्यांचा नेहमी अंकुश असायचा. त्यामुळे राहुल व त्यांच्या सहकाऱ्यांना तात्यांच्या अनुभवाची शिदोरी बरेच काही शिकवून जायची. आता मात्र हा योग कधीच येणार नाही, या नुसत्या कल्पनेने राहुल बेचैन होणे स्वाभाविक आहे. पत्नी अनुराधा यांनी दिलेल्या साथीला तोड नाही, असे तात्या वारंवार सांगायचे. मुली अश्‍विनी, मनीषा, जयश्री व सुजाता यांनी समजावून घेतल्याने व मुलगा राहुल याने आपल्या विचारांचा "झेंडा' फडकविल्याने आपण जगातील समाधानी असल्याचे तात्या आवर्जून सांगायचे. रेडिओलॉजिस्ट असलेल्या स्नुषा डॉ. प्रणोती यांच्या माध्यमातून श्रीगोंद्यात अद्ययावत वैद्यकीय संकुल उभारण्याचे तात्यांचे स्वप्न होते. तात्यांचे हे स्वप्न पूर्ण करण्याची जबादारी आता आमदार राहुल व डॉ. प्रणोती यांच्यावर आहे. तात्यांच्या विचारांच्या दिशेने मार्गक्रमण करणे हीच तात्यांना आदरांजली ठरेल. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com