kunal raut, bhoyar and nikose in youth congress fray | Sarkarnama

कुणाल राऊत, अनुराग भोयर, नेहा निकोसे युवकांपर्यंत पोचणार?

सुरेश भुसारी
सोमवार, 27 ऑगस्ट 2018

नागपूर : पुढील महिन्यात होणाऱ्या महाराष्ट्र युवक कॉंग्रेसच्या निवडणुकीसाठी विदर्भातील कॉंग्रेसच्या नेत्यांची दुसरी पिढी सरसावली आहे. कॉंग्रेसचे संघटन मजबूत करण्यासाठी युवक कॉंग्रेसची निवडणूक लढविण्याची भाषा करणारे युवक नेते किती सरस ठरतील, हे येणाऱ्या काही दिवसात स्पष्ट होणार आहे.

युवक कॉंग्रेसची निवडणुकीत दरवर्षी नेत्यांचे मुले-मुली बाजी मारत असल्याने यावर्षी कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी ही निवडणूक डिजिटल करण्याचा निर्णय घेतला आहे. युवक कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांना ऑनलाईन अर्ज नोंदणी करावयाची होती. यासाठी युवक कॉंग्रेसच्या संकेतस्थळावर नोंदणी करावयाची होती.

प्रत्येक मतदाराला पाच पदांसाठी मतदान करावयाचे आहे. यात महाराष्ट्र प्रदेश युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश युवक कॉंग्रेस सरचिटणीस या पदांचा प्रामुख्याने समावेश आहे. विशेष म्हणजे या निवडणुकीत कोणताही उमेदवार पराभूत होणार नाही. एखाद्या पदासाठी निवडणूक लढविल्यानंतर यश मिळाले नाही तरी त्याला उपाध्यक्षपद, सचिव, संघटन सचिव असे पद संघटनेत मिळणार आहे. या अभिनव संकल्पनेवर ही निवडणूक होणार आहे.
 
विदर्भातून कॉंग्रेस नेत्यांच्या मुलांसह इतरांनीही या निवडणुकीत सहभाग घेतला आहे. यात माजी मंत्री नितीन राऊत यांचे सुपुत्र कुणाल राऊत, माजी मंत्री व विधानसभेतील कॉंग्रेस उपनेते विजय वडेट्टीवार यांच्या कन्या शिवानी वडेट्टीवार, नागपूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुरेश भोयर यांचे पुत्र अनुराग भोयर, कॉंग्रेसचे युवक नेते राकेश निकोसे यांच्या पत्नी नेहा निकोसे, महाराष्ट्र सेवादलाचे मुख्य संघटक कृष्णकुमार पांडे यांचे सुपुत्र धीरज पांडे यांनी निवडणूक रिंगणात उडी घेतली आहे.

कुणाल राऊत महाराष्ट्र प्रदेश युवक कॉंग्रेसच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढवित आहे. अनुराग भोयर रामटेक लोकसभा युवक कॉंग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक लढवित आहे. नेहा निकोसे नागपूर लोकसभा सरचिटणीस पदाची निवडणूक लढवित आहे. शिवानी वडेट्टीवार यांनीही या निवडणुकीत सहभाग घेतला आहे. बहुतेकजण शिक्षण घेत आहेत. अनुराग भोयर हे एमबीए करीत आहेत. शिवानी वडेट्टीवार एलएलबी अंतिम वर्षाला आहेत. कुणाल राऊत यांचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी गेल्या लोकसभा, विधानसभा व महापालिका निवडणुकांच्या प्रचारांमध्ये प्रत्यक्ष सहभाग घेतला होता.

या नेतेपुत्रांच्या व्यतीरिक्तही नागपुरातून अनेकांनी अर्ज दाखल केले आहे. यात कुणाल पुरी, आकाश गुज्जर, तौसिफ खान, वसीम खान, कविता यादव यांचाही समावेश आहे. या निवडणुकीबद्दल बोलताना कुणाल राऊत म्हणाले, राहुल गांधी यांच्या निर्देशाप्रमुख युवकांना कॉंग्रेस पक्षासोबत जोडण्यासाठी प्रयत्न करणार आहे. वडीलांच्या आग्रहाने निवडणुकीत उतरलो नाही. परंतु वडिलांचा सल्ला मात्र घेतो, असेही कुणाल यांनी सांगितले.

अनुराग भोयर म्हणाला, मला राजकारणात रस आहे. कॉंग्रेस पक्षाची ध्येय धोरणे मला आवडतात, त्यामुळे यानिवडणुकीत भाग घेत आहे. ही निवडणूक डिजिटल होणार असल्याने वडील नेता आहे, म्हणून कोणताही फायदा होणार नाही. नागपूर ग्रामीण भागात जवळपास १० हजार युवक मतदार आहेत. त्यांच्यापर्यंत पोहोचणे त्यांना आपली उमेदवारी समजावून सांगण्याचे मोठे आव्हान असल्याचे अनुराग भोयरने सरकारनामाशी बोलताना सांगितले. 
 
संबंधित लेख