kumar ketkar's alligation on modi-shah | Sarkarnama

नरेंद्र मोदी, अमित शाहांना जन्मठेप होऊ शकते : कुमार केतकर

अमोल कविटकर
बुधवार, 5 डिसेंबर 2018

अमित शाह यांनी गुजरातचे तत्कालीन गृहमंत्री हरेन पांड्या यांच्या हत्येचा कट रचला आणि पूर्णत्वास नेला.

पुणे : गुजरातचे तत्कालीन गृहमंत्री हरेन पांड्या यांच्या हत्येसंदर्भात छापून आलेल्या गोष्टींचे पुरावे त्यांचे (मोदी) सरकार गेल्यावर बाहेर यायला लागले तर नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांना जन्मठेपेपर्यंतची शिक्षा होऊ शकते, इतके गंभीर आरोप त्यांच्यावर आहेत", असे वक्तव्य काँग्रेसचे खासदार कुमार केतकर यांनी केले आहे. 

पुणे शहर काँग्रेसच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या 'सेवा-कर्तव्य-त्याग' सप्ताहाची सुरुवात करण्यात आली, त्यावेळी केतकर बोलत होते. 

केतकर म्हणाले, ''अमित शाह यांनी गुजरातचे तत्कालीन गृहमंत्री हरेन पांड्या यांच्या हत्येचा कट रचला आणि पूर्णत्वास नेला. ज्या माणसाला सुपारी देऊन ही हत्या केली, त्याही माणसाची नंतर हत्या झाली. ज्या माणसाच्या मदतीने मदतीने, सुपारी देऊन ही हत्या करण्यात आली. त्या माणसाच्या बायकोला बलात्कार करुन ठार मारण्यात आले. ज्या माणसाच्या निमित्ताने (प्रजापती) ही हत्या झाली, त्यालाही ठार मारण्यात आले. हा खटला ज्या-ज्या न्यायाधीशांसमोर उभा राहीला, त्या-त्या न्यायाधीशांच्या बदल्या केल्या गेल्या आणि जेव्हा जस्टीस लोया हे या दबावाला बळी पडले नाहीत, त्यावेळी लोया यांची हत्या करण्यात आली. याचे कारण म्हणजे अमित शाह यांना निर्दोष सोडायचे होते. हे सगळं छापून आले असून माझ्या मनातील काही नाही".

''व्यापक कटाचा भाग म्हणून नरेंद्र मोदी सत्तेत आले आहेत. जर आगामी लोकसभा निवडणुकीचा निकाल मोदींच्या विरुद्ध लागला तर ते सहजगत्या सत्तेचे हस्तांतरण करतील, याची खात्री वाटत नाही. २००२ मध्ये गुजरातमध्ये दंगल होणे आणि २००१ मध्ये मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होणे, या योगायोगाच्या गोष्टी नाहीत. नितीन गडकरी यांचे भाजप अध्यक्षपद जाणे आणि राजनाथ सिंग यांचे अध्यक्षपदी येणे, याही योगायोगाच्या गोष्टी नाहीत. या घटना जशा कटकारस्थानाने घडल्या तशाच पुढील घटनाही घडू शकतील", असेही केतकर म्हटले. 

संबंधित लेख