kumar ketkar speech in sangamner | Sarkarnama

पुढील पाच वर्षांत देशात हाहाकार पसरण्याची भीती!

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 7 नोव्हेंबर 2018

देश धोक्‍याचे वळण घेत आहे.

संगमनेर (नगर) : "गुजरातमध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांचा सर्वाधिक उंचीचा पुतळा उभारल्यानंतर, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्याच उंचीचा श्रीरामांचा पुतळा उभारण्याची घोषणा केली आहे. मात्र, ही पुतळ्यांची स्पर्धा बेरोजगारांची फौज कमी करू शकेल का?'' असा सवाल ज्येष्ठ पत्रकार व खासदार कुमार केतकर यांनी केला. 

कॉ. दत्ता देशमुख यांच्या स्मृतिदिनानिमित्त येथे झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. आमदार बाळासाहेब थोरात अध्यक्षस्थानी होते.

केतकर म्हणाले, "देशात पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुकांच्या निमित्ताने विध्वंसाला सुरवात होण्याच्या शक्‍यतेने देश धोक्‍याचे वळण घेत आहे. ही गंभीर बाब प्रत्येकाने समजून न घेतल्यास, पुढील पाच वर्षांत देशात हाहाकार पसरण्याची भीती आहे. राम मंदिराच्या नावाने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने सुरू केलेली चळवळ हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. आपण कोणत्या काळातून जात आहोत याचे गांभीर्य जनतेला समजलेले नाही. सर्वोच्च न्यायालयाने शबरीमला मंदिरात महिलांना प्रवेश दिला असला, तरी भाजपने मात्र महिलांना प्रवेशबंदीचा पुरस्कार केला आहे. भाजपची ही भूमिका पुढील पाच वर्षांत हिंदू राष्ट्र आणण्याची असल्याचे स्पष्ट होते. आगामी निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर राम मंदिराच्या नावाने हिंदूंचा पाठिंबा मिळविण्याचा संघाचा उद्देश आहे. देशात हिंदू राष्ट्र आणण्याचा हा प्रयत्न देशाचे तुकडे करणारा आहे.'' 

धर्माच्या नावाखाली जनतेत भावनांचा खेळ सुरू आहे. या माध्यमातून भावनिक उद्रेक निर्माण करण्याचे हे षड्‌यंत्र असून, त्याला बळी पडून आगामी निवडणुकीत भाजपला मतदान न करण्याचे आवाहन भारतीय कम्युनिस्ट पार्टीचे राष्ट्रीय सचिव भालचंद्र कानगो यांनी केले. आमदार डॉ. सुधीर तांबे, डॉ. माधव चव्हाण, मिलिंद रानडे, कॉ. दत्ता देशमुख प्रतिष्ठानचे अध्यक्ष मोहन देशमुख आदी उपस्थित होते. 

संबंधित लेख