kshirsagra brothers imp role in beed loksabha | Sarkarnama

नाराज क्षीरसागर बंधू बीडमध्ये निर्णायक भुमिका बजावणार

दत्ता देशमुख  
शुक्रवार, 15 मार्च 2019

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार जिल्ह्यात असताना व्यासपीठावर नसलेले पक्षाचे विधीमंडळातील उपनेते आमदार जयदत्त क्षीरसागर लोकसभा आचारसंहिता लागण्याच्या आदल्या दिवशी मात्र भाजपच्या व्यासपीठावर होते. व्हिडीओ कॉन्फरन्सवर केलेल्या भाषणात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही त्यांचा उल्लेख केला हे विशेष. 

बीड : आमदार जयदत्त क्षीरसागर व बंधू नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर या दोघांना पक्षापासून दुर ढकलण्याचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांचे डावपेच यशस्वी होत असले तरी त्यांची आगामी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेससाठी डोकेदुखीही ठरू शकते. सध्या सर्व प्रक्रियांपासून अलिप्त असलेले क्षीरसागर काय भूमिका घेणार याकडे जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. 

दिवंगत केशरकाकू क्षीरसागर यांचा राजकीय वारसा पुढे त्यांचे थोरले चिरंजीव जयदत्त क्षीरसागर यांच्याकडे आला. जयदत्त क्षीरसागर यांनीही पंचायत समिती सभापतीपदापासून विविध खात्यांचे मंत्रीपदे सांभाळली. केशरकाकूंसारखेच जयदत्त क्षीरसागरांनाही यापूर्वीही पक्षांतर्गत विरोधांचा सामना करावा लागलेला आहे. मात्र, मागच्या दोन - अडीच वर्षांपासून त्यांच्या घरातील काका - पुतण्या वादामुळे त्यांच्या पक्षांतर्गत विरोधकांना मोठी संधीच भेटली. पुतणे संदीप क्षीरसागर यांना बळ देत जयदत्त क्षीरसागर यांना पक्षापासून दुर करण्याचे विविध डावपेच खेळले गेले. 

जयदत्त व भारतभूषण क्षीरसागर यांनीही विकास कामांच्या निमित्ताने भाजपशी सलगी वाढवून राष्ट्रवादीच्या कुरघोड्यांच्या खेळीला उत्तर दिले. मात्र, लोकसभा निवडणुक तोंडावर असताना शरद पवार यांच्या जिल्ह्यातील सभेला अनुपस्थित असेलेले क्षीरसागर आचारसंहितेच्या आदल्या दिवशी पुन्हा गेवराईत भाजपच्या व्यासपीठावर होते. त्यामुळे जयदत्त क्षीरसागर व बंधू भारतभूषण क्षीरसागर हे पूर्णत: राष्ट्रवादीपासून दुरावल्याचे चित्र आहे. मात्र, आता ते या निवडणुकीत काय भूमिका घेणार हे औत्सुक्याचे आहे. यापूर्वी या कुरघोड्यांना राष्ट्रवादीच्या हातातोंडाशी आलेली जिल्हा परिषदेची सत्ता भाजपच्या ताब्यात देण्यात मोलाची भूमिका बजावून आणि स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघातील राष्ट्रवादीचे गणित चुकवून प्रत्युत्तर दिले होते. आताही त्यांनी अशीच वेगळी भूमिका घेतली तर त्याचा मोठा फटका राष्ट्रवादीला बसू शकतो. आजही जयदत्त क्षीरसागरांना मानणारे आष्टीपासून परळीतपर्यंत समर्थक आहेत. डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांचा बीड शहरात चांगला होल्ड आहे. त्यामुळे या दोघांची भूमिकेकडे त्यांच्या समर्थकांसह राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून आहे. 

संबंधित लेख