kshirsagar celebrates dhas`s victory | Sarkarnama

धनंजय मुंडेंना धक्का दिला अन् धस यांच्या विजयांचा गुलाल क्षीरसागरांनी खेळला!

दत्ता देशमुख
मंगळवार, 12 जून 2018

क्षीरसागर हे बीड जिल्ह्यातील प्रमुख राजकीय घराणे आहे. मात्र, त्यांच्या घरातील भाऊबंदकीचा फायदा घेऊन धनंजय मुंडे त्यांचे राजकीय खच्चीकरण करत असल्याची क्षीरसागरांचा आरोप आहे. नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांचे जिल्हाध्यक्षपद घालविण्यातही हात असल्याचा आरोप आहे. याचा वचपा त्यांनी सुरेश धस यांना मदत करून काढला

बीड  लातूर-बीड-उस्मानाबाद विधान परिषद निवडणुकीत  भाजपचे सुरेश धस विजयी झाले आणि राष्ट्रवादीचे नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांना आनंद झाला. त्यांनी पालिकेत धस यांचा सत्कार करून गुलालाची उधळण करत आनंद व्यक्त केला. त्याला कारणही तसेच असून आतापर्यंत धनंजय मुंडे यांनी केलेला राजकीय अपमान आणि या निवडणुकीत मुंडे यांना बसलेला धक्का यामुळे क्षीरसागर अधिकच आनंदी झाले आहेत.

धस यांचा विजय म्हणजे दृष्ट प्रवृत्तींच्यावर वृत्तीवर मिळवलेला विजय आहे, अशी प्रतिक्रिया डाॅ. भारतभूषण क्षीरसागर यांनी व्यक्त करत आपला रोख व्यक्त केला. धस यांचा विजय होणे त्यांच्यासाठी किती महत्त्वाचे होते, हे त्यांच्या प्रतिक्रियेवरून दिसते. 

क्षीरसागर हे बीड जिल्ह्यातील प्रमुख राजकीय घराणे आहे. काँग्रेस विचाराचे हे घराणे राष्ट्रवादी स्थापनेनंतर शरद पवारांच्या सोबत आहे. राष्ट्रवादीतून तीन वेळा आमदार राहिलेल्या जयदत्त क्षीरसागर यांनी विविध खात्यांचे मंत्रिपदही भूषविलेले आहे. जेष्ठ नेते छगन भुजबळ यांचे कट्टर समर्थक अशी ओळख असलेले जयदत्त क्षीरसागर भुजबळानंतर पक्षातील दुसऱ्या क्रमांकाचे ओबीसी नेते म्हणून ओळखले जात. मात्र, धनंजय मुंडे यांची पक्षात चालती वाढली आणि त्यांनी क्षीरसागर यांचे खच्चीकरण करण्याचे प्रयत्न सुरू केले.

जिल्ह्यात अजित पवार आणि सुनील तटकरे आदी नेत्यांच्या कार्यक्रमापासूनही क्षीरसागरांनी दूर ठेवले जाऊ लागले. तर, बीड पालिकेवर मागच्या 30 वर्षांपासून वर्चस्व असलेल्या त्यांचे बंधू नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांचे जिल्हाध्यक्षपदही अचानक काढून घेतले. या दोन्ही भावंडांविरोधात बंड पुकरणाऱ्या पुतणे संदीप क्षीरसागर यांनाही मुंडे यांच्याकडून राजकीय बळ मिळत  आहे. त्यामुळे मुंडेंना खिंडीत गाठण्याची संधी शोधत होते. तसेच जिल्हा परिषदेची सत्ता भाजपच्या ताब्यात देण्यात खारीचा वाटाही या भावंडांनी उचललेला आहे. मात्र, पक्षाने याची दखल घेतली नाही.

त्यामुळे राज्यभर चर्चा होणाऱ्या लातूर - उस्मानाबाद - बीड स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत "हात" दाखवायचाच असा इरादा या क्षीरसागर बंधूंनी आखला. मागच्या 40 वर्षांपासून राजकारणात असल्याने त्यांचे लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यातही राजकीय मित्र आहेतच. मग, निवडणुकीत त्यांनी त्यांच्या  बीड पालिकेतील समर्थक नगरसेवकांसह वडवणी, माजलगाव, केज येथील नगरसेवकांचे मतदान धसांच्या पारड्यात टाकलेच. शिवाय उस्मानाबाद जिल्ह्यातूनही काही रसद या बंधूंनी धसांना मिळवून दिली.

सोमवारी निकाल लागताच क्षीरसागर समर्थकांच्या आनंदला पारावार नव्हता. सोशल मीडियातून ते विजयाचा आनंद व्यक्त करत असतानाच क्षीरसागरांच्या निमंत्रणावरून सायंकाळी विजयी उमेदवार सुरेश धस यांचा ताफा नगरपालिकेत पोचला. नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांच्यासह त्यांचे पुत्र डॉ. योगेश क्षीरसागर यांनी धसांचे अभिनंदन तर केलेच शिवाय विजयाचा गुलालही खेळला.

संबंधित लेख