krishna suger factory | Sarkarnama

कृष्णा कारखान्याचे माजी संचालक कचाट्यात

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 18 एप्रिल 2017

अविनाश मोहिते हे मूळचे रेठरे येथील असून 2011 ते 2015 या कालावधीत ते यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष होते. सध्या ते राष्ट्रवादी कॉंग्रेस राज्य सरचिटणीस या पदावर आहेत. त्यांना या प्रकरणात दोन महिन्यांपूर्वी अटक झाली होती. सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहेत.

सातारा : तोडणी वाहतूकदारांच्या बनावट कर्जप्रकरणी शिवनगर येथील यशवंतराव मोहिते कृष्णा साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष, उपाध्यक्षांपाठोपाठ आठ संचालकांना अटक झाली आहे. उर्वरित 14 माजी संचालक टार्गेटवर आहेत. ऊस वाहतूक करणाऱ्या 784 वाहनधारकांनी न घेतलेल्या कर्जापोटी प्रत्येकी सात लाख रुपये प्रमाणे 58 कोटी रुपयांची परतफेड करावी, अशी नोटीस बॅंक ऑफ इंडियाची आहे. या प्रकरणात बॅंकेचे काही अधिकाऱ्यांचाही हात असल्याने त्यांनाही अटक होण्याची भीती आहे.

कऱ्हाड तालुक्‍यातील रेठरे बुद्रूक येथील कृष्णा सहकारी साखर कारखान्याची सत्ता मागील पंचवार्षिकमध्ये अविनाश मोहिते यांच्याकडे होती. 2014-15 मधील कारखान्याच्या गळीत हंगामासाठी ऊस वाहतूक करणाऱ्या 784 वाहनधारकांना न घेतलेल्या कर्जापोटी प्रत्येकी सात लाख रुपये प्रमाणे 58 कोटी रुपयांची परतफेड करावी, अशा नोटिसा बॅंक ऑफ इंडियाकडून पाठविण्यात आल्या होत्या. त्यापैकी यशवंत पाटील (रा. तांबवे, ता. वाळवा, जि. सांगली) यांनाही नोटीस बजाविण्यात आली होती. त्यांनी कारखान्याकडे 2013-14 मध्ये तोडणी वाहतूक करारासाठी वाहनांची आरसीबुक, टीसी, रेशनकार्ड, मतदान ओळखपत्र, पॅनकार्ड अशी कागदपत्रांची झेरॉक्‍स दिल्या होत्या. पण करारानुसार ठरलेली उचल न दिल्याने वाहतुकीसाठी वाहनेच लावली नाहीत. तरीही शेतकऱ्यांच्या नावे सात लाख रुपयांचे कर्ज उचलले गेल्याचे बॅंकेच्या नोटिशीनंतर श्री. पाटील यांना समजली. दरम्यान, कर्ज वसुलीच्या नोटिसा मिळाल्याने शेतकरी हवालदिल झाले. या शेतकऱ्यांनी तत्कालीन अध्यक्ष अविनाश मोहिते, उपाध्यक्ष सुरेश पाटील, सचिव उत्तमराव पाटील, तत्कालीन अधिकारी व बॅंक ऑफ इंडियाच्या अधिकाऱ्यांनी संगनमताने खोट्या सह्या करून शेतकऱ्यांच्या नावे कर्ज घेतल्याची तक्रार कऱ्हाड पोलिसात दिली.

त्यानुसार पोलिसांनी अटक सत्र सुरू केले. सुरवातीला कृष्णा कारखान्याचे अध्यक्ष अविनाश मोहिते व उपाध्यक्ष सुरेश पाटील यांना दोन महिन्यापूर्वीच अटक झाली होती. त्यानंतर तब्बल दोन महिन्यानंतर पोलिसांनी अचानक उर्वरित माजी संचालकांना अटक केली. यामध्ये संभाजीराव जगताप, सर्जेराव लोकरे, अशोक जगताप, उदयसिंह शिंदे, बाळासाहेब निकम, चंद्रकांत भुसारी, महेंद्र मोहिते, वसंत पाटील या आठ माजी संचालकांचा समावेश आहे. यातील चंद्रकांत भुसारी, उदय शिंदे व महेंद्र मोहिते यांना तीन दिवस पोलिस कोठडी न्यायालयाने सुनावली होती. पोलिस निरीक्षक प्रमोद जाधव, सहायक पोलिस निरीक्षक कांबळे यांच्या पथकाने कारवाई केली.
 

संबंधित लेख