'बीडच्या खासदारा'चा वारसा पुढारलेले वाळवेकर कसा काय लक्षात ठेवतील?

वाळव्याचा एक माणूस बीडला जाऊन खासदार होतो आणि पाथर्डी गावची चावडी गेस्ट हाऊस समजून राहतो.
'बीडच्या खासदारा'चा वारसा पुढारलेले वाळवेकर कसा काय लक्षात ठेवतील?

क्रांतिसिंह नाना पाटील बीडचे खासदार होते तेव्हा ते एकदा केज तालुक्यातील होळ गावी गेले होते. ते पोचले तेव्हा रात्र झाली होती. मग ते विश्वनाथ शिंदे या कार्यकर्त्याच्या घरी गेले. 

त्यांना म्हणाले 'मी मुक्काम करणार आहे'. 

शिंदे म्हणाले 'ठीक आहे अण्णा.'
त्यावर अण्णा म्हणाले, 'मी तुझ्या घरी राहणार नाही. मंदिरात मुक्काम करेन, फक्त मला दोन भाकरी, थोडं कालवण आणि एक तवली पाणी दे.' 

मग अण्णांनी मंदिरात मुक्काम केला आणि ते सकाळी लवकर उठून निघून गेले. 

हा प्रसंग आठ्वण्याचे कारण क्रांतिसिंह नाना पाटील ज्या वाळवा तालुक्यातील होते त्याच वाळवा तालुक्यात परवा एका मंत्रीमहोदयांच्या खास माणसाने शासकीय गेस्ट हाऊसमध्ये धिंगाणा घालत काच फोडून टाकण्याची आणि तिथल्या कर्मचाऱ्यांना दमदाटी केल्याची घटना घडली. 

ज्या वाळवा तालुक्यातील क्रांतिसिंह नाना पाटील यांनी बीड जिल्हयात जाऊन आपल्या साधेपणाचा आदर्श देशासमोर ठेवला त्याच वाळवा तालुक्यात सत्तेच्या माध्यमातून आलेली अरेरावी किती वाढली आहे, हे दिसून येत आहे. सत्तेत असल्यानंतर  आम्ही काहीही करू शकतो, असा समज झालेली ही माणसं तालुक्याचा उज्ज्वल वारसा विसरली आहेत. आपण काय करतोय याचं भानही या लोकांना राहिलेलं नाही. 

जेव्हा नाना पाटील बीडचे खासदार झाले तेव्हा ते पाथर्डी गावच्या चावडीत मुक्काम करू लागले. एक खासदार
चावडीत मुक्काम करून लोकांची गाऱ्हाणी ऐकतो, ती सोडवतो. ही गोष्ट लोकांना आणि नेत्यांना तेव्हा विशेष वाटत
नव्हती.  नाना पाटलांनाही आपण काही वेगळं करतोय असं वाटतं नव्हतं. आज शासकीय गेस्ट हाऊसवर हवी तशी खोली
मिळाली नाही म्हणून तिथल्या कर्मचाऱ्यांवर चिडणाऱ्या मान्यवर महोदयांना काही वर्षांपूर्वी चावडीत राहणारे खासदार
आपल्या राज्यात होते, ही गोष्ट माहिती असण्याची गरज आहे.

परवाचा प्रकार हाच अंहकारातून घडलेला आहे. 'आमचे कोणीही काही करू शकत नाही', हा माज यामागे आहे.

वाळव्याचा एक माणूस बीडला जाऊन खासदार होतो आणि पाथर्डी गावची चावडी गेस्ट हाऊस समजून राहतो. तिथले एक मित्रइकबाल पेंटर व आसपासचे लोक त्यांना जेवण देतात. याकाळात नाना पाटील स्वतःची कपडे स्वतः धुतात. जेवढं
काही साधं राहता येईल तेवढं साधं राहतात. या गोष्टी चित्रपटाचा विषय वाटाव्यात, अशा आहेत आणि या पटकथा नाहीततर सत्यकथा आहेत. 

क्रांतिसिंह नाना पाटील यांचा वारसा चालवणारे नागनाथअण्णा नायकवडी आयुष्यभर घरी गेले नाहीत तर साखरशाळेत राहिले. तिथंच साधं आयुष्य जगले पण घरी जाऊन आराम करावा असं त्याना वाटलं नाही. वाळवा तालुक्यातील ढवळी गावचे एन. डी. पाटील सहकारमंत्री असताना एका निवडणुकीची आचारसंहिता लागल्याचे समजताच त्यांनी शासकीय गाडी सोडून दिली होती. खाजगी जीप मागवून पुढचा प्रवास केल्याची आठवण कुमार जाधव सांगतात. वाळवा तालुक्यातील नेतेमंडळीचा हा साधेपणाचा आदर्श आहे पण दुर्दैव एवढंच त्यांच्याच तालुक्यात हा वारसा हरवला आहे.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com