krantising nana patil | Sarkarnama

...आणि राजकीय संदेश देणारे ते कुस्त्यांचं मैदान यावेळी भरलेच नाही

संपत मोरे
रविवार, 9 सप्टेंबर 2018

 क्रांतिसिंह नाना पाटील तिथल्या स्टेजवर जायचे. शड्डू ठोकूनच "भारतमाता की जय' म्हणत भाषणाला सुरुवात व्हायची. या भाषणातून कधी गावातील इंग्रजांना फितूर असलेल्या खबऱ्यांचा तर कधी पकडायला आलेल्या पोलिसांचा मार्मिक शैलीत समाचार घेतला जात असे.

पुणे : स्वातंत्र्यपूर्व काळात सांगली जिल्ह्यातील देवराष्ट्रे गावात श्रावण महिना संपण्याचा सुमारास एक कुस्त्याच हमखास मैदान भरायचं. या मैदानच वेगळेपण असं या मैदानात इंग्रजांच्या विरोधात लढणारे, इंग्रजांनी ज्यांच्यावर मोठ्या रकमेचं बक्षीस लावलं आहे, ज्यांच्यावर पकड वॉरंट आहे, पोलीस ज्यांना पकडण्यासाठी शोधत आहेत ते क्रांतिसिंह नाना पाटील यायचे. 

मैदान भरलं, पैलवानाच्या खडाखडी सुरु झाल्या की मध्येच एकच गदारोळ उठायचा. त्या दिशेनं एक पैलवान गडी येत असलेला दिसायचा. त्याची चाल रुबाबात असायची. चेहऱ्यावर स्मित आणि आत्मविश्वासाने पावलं टाकत तो माणूस यायचा. त्याच्या पाठीमागे तसेच चारसहा गडी असायचे. तो माणूस म्हणजेच क्रांतिसिंह नाना पाटील. तो आल्यावर त्याला पकडायला आलेल्या पोलिसांची तारांबळ उडायची पण त्या माणसाला भेटण्यासाठी एवढी गर्दी व्हायची की पोलिसाना तिथवर पोहोचताही यायचं नाही. 

मग क्रांतिसिंह नाना पाटील तिथल्या स्टेजवर जायचे. शड्डू ठोकूनच "भारतमाता की जय' म्हणत भाषणाला सुरुवात व्हायची. या भाषणातून कधी गावातील इंग्रजांना फितूर असलेल्या खबऱ्यांचा तर कधी पकडायला आलेल्या पोलिसांचा मार्मिक शैलीत समाचार घेतला जात असे. क्रांतिसिंह नाना म्हणत " आता ह्यो फौजदार इंग्लडंवरन आलेला न्हाय. हितलाच हाय. पण नोकरी करतुया गोऱ्या साहेबाची. उद्या त्यो मेला तर त्याला खांदा द्याला गोरा साहेब येणार न्हाय. जसा त्यो आपल्या खांद्यावरन जाणार तस आपूनबी मेल्यावर त्येच्या खांद्यावरन जाणार. त्याच सुतक आपल्याला आपलं सुतक त्याला. पण त्येला कळतंय कुठं ? लागलाय येडा बेडया घेऊन माझ्यामागं. ' त्यांचा हा संवाद जनतेला भिडायचा. लोक खळखळून हसायचे. पोलिसही त्यात सहभागी व्हायचे. 

या कुस्ती मैदानाला दुरदुरून लोक यायची. नाना पाटील याना बघायला. त्यांचं भाषण ऐकायला. वर्षभर भूमिगत असलेला हा माणूस श्रावण महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात देवराष्ट्र कुस्ती मैदानाला येतच होता. वर्षभर माणसं या दिवसाची वाट बघत बसलेली असायची. अगदी घरातील लहान पोरालाही "तुला नाना पाटलाचं भाषण ऐकायला नेतो "असं आश्वासन दिल जायचं. एकदा ऐकलेलं भाषण वर्षभर लक्षात रहायचं. ते भाषण नसायचं. तो इंग्रजी राजवटीच्या विरोधात संदेश असायचा. हा राजकीय संदेश द्यायचं कुस्ती मैदान हे माध्यम असायचं. या संदेश घेऊन लोक जायची आणि आपआपल्या गावात प्रतिसरकारच्या लोकांना मदत करायची. मग अगदी भूमिगत असलेल्या लोकांना भाकरी पोहोच करण्यापासून ते त्यांना सुरक्षित लपवून ठेवण्यापर्यंत लोक प्रतिसरकारच्या मागं उभं राहायची. 

याच कुस्ती मैदानात क्रांतिसिंह नाना पाटील यांना पहिल्यांदा पाहिलं आणि त्यांच्या प्रेमात पडून स्वातंत्र्यचळवळीत सहभागी झाल्याची' आठवण क्रांतिसिंहांचे एक प्रमुख सहकारी जी डी बापू लाड नेहमी सांगायचे. याचाच अर्थ हे मैदान राजकीय संदेश देण्याचं एक व्यासपीठ बनलेलं होतं.याच मैदानातून प्रतिसरकारची राजकीय चळवळ गतिमान व्हायची. या मैदानात नानांच भाषण झालं की काही सहकारी एकदम उठायचे आणि घोषणा द्यायला सुरुवात करायचे. मग सगळी लोक उठायची. लोक उठली की नाना तिथून निघून जात.अस दरवर्षी घडत होत. लोक नानांचे भाषण ऐकायला तर पोलीस त्याना पकडायला यायचे पण या मैदानात कधीही ते पोलिसांच्या हाती लागले नाहीत. 

गेल्या अनेक वर्षांपासून देवराष्ट्र गावात हे कुस्ती मैदान भरलं जायचं. या मैदानाचं नावही क्रांतिसिंह नाना पाटील कुस्ती मैदान असं केलेलं. कुस्ती निवेदक शंकर पुजारी दरवर्षी या मैदानाचं निवेदन करताना इतिहास सांगून लोकांना भूतकाळात घेऊन जायचे. गेल्या वर्षी या मैदानात मोठ्या कुस्त्या झाल्या होत्या पण यावर्षी प्रतिसरकारला 75 वर्षं झाली त्याच वर्षी हे मैदान भरलं नाही. ज्या कुस्ती मैदानातील नाना पाटील यांच्या भाषणांनी ब्रिटिशांच्या विरोधी चळवळीला बळ मिळाले होते ते मैदान यावर्षी भरलेच नाही ! 
 

संबंधित लेख