kolhapuri peoples support dysp suraj gurav | Sarkarnama

नेत्यांनी घेरलेल्या 'दबंग' DySP ला 'कोल्हापुरी' बळ!

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 12 डिसेंबर 2018

सध्या पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख तीन दिवस रजेवर आहेत.

कोल्हापूर : महापौर-उपमहापौर निवडीवेळी माजी मंत्री आमदार हसन मुश्रीफ यांना महापालिकेच्या प्रवेशद्वारावर अडविण्यात आले. पोलिस उपअधीक्षक सुरज गुरव यांनी 'मी नोकरी करतोय राजकरण करत नाही', असे खणखणीत आवाजात सांगून आमदार मुश्रीफ यांना डिवचले. याचे पडसाद आज तिसऱ्या दिवशीही शहरात दिसून आले. 

काल नुतन महापौर सरीता मोरे आणि उपमहापौर भूपाल शेटे यांच्या शिष्टमंडळाने गुरव यांना निलंबित करा, अशी मागणी अपर पोलिस अधीक्षक तिरुपती काकडे यांच्याकडे केली आहे. सध्या पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख तीन दिवस रजेवर आहेत. त्यामुळे काकडे यांनी निवेदन स्वीकारून चर्चा करण्याव्यतिरिक्त त्याचे पुढे काहीच झाले नाही. याउलट आज शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखांचे शिष्टमंडळ काकडे यांना भेटले. कोणत्याही परस्थितीत अधिकाऱ्यांचे खच्चीकरण करू नका म्हणून त्यांनी निवेदन दिले. 

आमदार मुश्रीफ यांनी हक्कभंगाचा प्रस्ताव आणणार असल्याचे पत्रकार परिषद घेवून जाहीर केले आहे. मात्र या उलट गुरव हे आपले दैनंदिनी कर्तव्य बजावत आहेत. सरकारी कार्यालयातील अधिकारी, कार्यकर्ते, तरुण त्यांना भेटून त्यांचे अभिनंदन करीत आहेत. ढाण्या वाघ म्हणून त्याची चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे. तर माजी मंत्री आणि ज्येष्ठ आमदारांच्या विरोधात बोलणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांच्या कर्तव्यावरही प्रश्‍न चिन्ह निर्माण केले आहे. आमदारांच्या विरोधात बोलण्याचे धाडस एका पोलिस अधिकाऱ्याने केल्यामुळे त्यांच्या पाठीशी जनता राहत असल्याचे चित्र आज दिसत आहे.  

संबंधित लेख