कोल्हापूर ZP शहीद मानेंचा आणखी किती दिवस अपमान करणार? 

जिल्हा परिषदेने शासनाकडे पाठविलेल्या दोन्ही पत्रातून कर्मचारी, अधिकारी निष्काळजी आहेत, हे दिसून येते. पहिल्या पत्रातील चूक लक्षात आणून देऊनही त्यांनी दुसऱ्या पत्रात चूक केली. शाळेस शहीद सावन माने यांचे नाव न दिल्यास जिल्हा परिषदेच्या दारात उपोषणास बसणार आहे.- शिवाजीराव परूळेकर, अध्यक्ष, माजी सैनिक कल्याण समिती
कोल्हापूर ZP शहीद मानेंचा आणखी किती दिवस अपमान करणार? 

कोल्हापूर : देशासाठी बलिदान देणारे शहीद जवान सावन माने यांच्या कुटुंबीयांची राज्यकर्त्यांनी दिलेल्या आश्‍वासनाच्या पूर्ततेसाठी फरफट सुरू आहे. विशेष म्हणजे जिल्हा परिषदेने प्राथमिक शाळेला "शहीद सावनकुमार बाळकू माने' असे नाव देण्याचा ठराव केला; मात्र शासनाकडे मार्गदर्शन मागताना पत्रातच चुका केल्या.

एका पत्रात जिल्हा परिषदेच्या अखत्यारीतील मालमत्तेस भविष्यात कोणत्याही मान्यवरांचे नाव देण्यास मनाई करण्याबाबत असा उल्लेख करून मार्गदर्शन मागविले; तर सुधारित दुसऱ्या पत्रात शहीद सावन यांच्या नावाऐवजी शहीद बाळकू माने असा उल्लेख केल्याने जि.प.च्या गलथान कारभारातील घोळ उघड झाला आहे. 

जम्मू-काश्‍मीरमध्ये नियंत्रणरेषेवर 22 जूनला हल्ला चढवून भारतात घुसण्याचा पाकिस्तानी लष्कराचा प्रयत्न गोगवे (ता. शाहूवाडी) येथील जवान सावन माने यांनी हाणून पाडला. छातीचा कोट करून ते लढले आणि त्यांनी शत्रूला आत घुसू दिले नाही, यावेळी त्यांना वीरमरण आले.

शहीद माने यांच्या कुटुंबाला सैनिकांचा वारसा आहे. वडील सैन्य दलात होते. भाऊही सैन्य दलात कार्यरत आहेत. शहीद सावन माने यांचे देशप्रेम अभिमानास्पद, आदर्शवत आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह अनेकांनी गोगवेला भेट देऊन शहीद सावन माने यांच्या कुटुंबीयांचे सात्वन केले. त्याचवेळी माने कुटुंबीयाना जमीन देण्याचे, व्यायामशाळा, सभागृह बांधण्याचे आश्‍वासन दिले. पण त्याची पूर्तताच झालेली नाही. जि.प.ने प्राथमिक शाळेला शाहीद सावन माने यांचे नाव देण्याचा निर्णय घेतला आणि 11 जुलै 2017 च्या जि.प.च्या सर्वसाधारण सभेत तसा सर्वांनुमते ठरावही झाला. 

ग्रामपंचयातीकडून ठरावाद्वारे शाळेला शाळेला शहीद सावन माने यांचे नावे द्यावे, अशा ठरावाद्वारे मागणी केली; मात्र शाळेला नाव देण्यास शासकीय नियमांचा अडथळा ठरत असल्याचे समोर आले. 5 मे 2004 च्या शासकीय निर्णयानुसार जिल्हा परिषदेच्या अखत्यारीतील मालमत्तांना कोणत्याही मान्यवरांचे नाव देण्यास मनाई केल्याने शाळेला नाव देणे प्रलंबित राहिले आहे. 

विशेष म्हणजे, याबाबत जिल्हा परिषदेने शासनाच्या ग्रामविकास व जलसंधारण विभागाकडे मार्गदर्शनाबाबत पत्रव्यवहार केला; मात्र पत्रव्यवहाराच्या विषयामध्येच चूक केली. जिल्हा परिषदेच्या अखत्यारीतील मालमत्तेस भविष्यात कोणत्याही मान्यवरांचे नाव देण्यास मनाई करण्याबाबत चक्क असा उल्लेख करून मार्गदर्शन मागविले आहे. ही चूक माजी सैनिक संघटनेने लक्षात आणून दिल्यानंतर जिल्हा परिषदेने शिक्षण विभागाने 6 फेब्रुवारीला मार्गदर्शन मागविणारे दुसरे पत्र पाठविले. या पत्रामध्येही शहीद जवान सावन यांच्या नावाऐवजी वडिलांना शहीद करण्याचा प्रकार जि. प.च्या शिक्षण विभागाने केला. या पत्राच्या विषयात शहीद बाळकू माने यांचे नाव प्राथमिक शाळेस देण्यासाठी मान्यता देण्याबाबत मार्गदर्शन मागविले आहे. शिक्षणाधिकाऱ्यांच्या सहीने हे पत्र पाठविले आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com