kolhapur zp | Sarkarnama

सभापती निवडीसाठी हालचालींना वेग 

सरकारनामा ब्युरो 
गुरुवार, 30 मार्च 2017

सभापती निवडीसंदर्भात दोन्ही कॉंग्रेसच्या नेत्यांनी जिल्हा परिषद सदस्यांची ता.30 रोजी बैठक बोलाविली आहे. 31 तारखेला भाजप आघाडीच्या सर्व सदस्यांना एकत्र बोलाविण्यात आल्याचे समजते. त्यानंतर त्यांना सभापती निवड होईपर्यंत एकत्र ठेवण्याचे नियोजन करण्यात येण्याची शक्‍यता
आहे. 

कोल्हापूर : जिल्हा परिषद विविध विषय समिती सभापतिपदाच्या निवडीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीतील संख्याबळ कायम राहवे, त्यात फूट पडू नये यासाठी दोन्ही आघाडीच्या वतीने सावधानता बाळगण्यात येऊ लागली आहे. ता. 3 एप्रिल रोजी ही निवडणूक होत आहे. जिल्हा परिषदेच्या इतिहासात प्रथमच सभापतिपदासाठी निवडणूक होत आहे. 

जिल्हा परिषद विषय समिती सभापती निवडीसाठी पीठासन अधिकारी म्हणून करवीर प्रांत सचिन इथापे काम पाहणार आहेत. सकाळी अकरा वाजल्यापासून दुपारी तीन वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत आहे. निवडीची खास सभा 3 एप्रिलला दुपारी तीन वाजता राजर्षी शाहू सभागृहात बोलाविण्यात आली आहे. अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीत भारतीय जनता पक्षाने केलेल्या आघाडीला 37 तर कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीला 28 मते मिळाली आहेत. साधारणपणे असेच बलाबल पुढच्या सभापती निवडीतही राहते. पण सध्या तशी परिस्थिती नाही. यावेळी जिल्हा परिषदेत प्रथमच काटे की टक्‍कर असल्यामुळे आणि महापालिकेच्या राजकारणाचा पॅटर्न जिल्हा परिषदेत घुसल्यामुळे हे संख्याबळ टिकविण्याचे आव्हान दोन्ही आघाड्यांच्या नेत्यांसमोर आहे. 

महापालिकेच्या पदाधिकारी निवडीत एका गटाच्या गाडीतून आलेले सदस्य सभागृहात जाईपर्यंत फुटल्याचा प्रकार पहावयास मिळाला आहे. गाडीतून आलेल्या सदस्यांच्या संख्येपेक्षा कमी मते महापालिकेच्या पदाधिकारी निवडीत मिळाली आहेत. त्याच पद्धतीचे राजकारण सध्या जिल्हा परिषदेत सुरू आहे. त्यामुळे अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीतील संख्याबळ राखण्याचे आव्हान दोन्ही आघाडीच्या नेत्यांपुढे आहे. त्यामुळे पुन्हा एकदा नवनिर्वाचित सदस्यांना सहलीवर पाठविले जाण्याची शक्‍यता आहे. 

अध्यक्ष निवडीत शिवसेनेत फूट पडली. सात सदस्यांनी भाजपला पाठिंबा दिला तर तीन सदस्य कॉंग्रेस, राष्ट्रवादीकडे राहिले. मतदारसंघातील विकास कामांसाठी निधी मिळावा म्हणून सत्तेच्या बाजूने अपक्ष किंवा आघाड्यांचा कल असतो. त्यामुळे कॉंग्रेसला पाठिंबा दिलेल्या शिवसेनेच्या तीन सदस्यांनी देखील भाजपकडे जाण्याची तयारी दर्शविली असल्याचे समजते.

संबंधित लेख