कोल्हापुरातल्या सत्तेसाठी मंत्र्यांकडून फोन

 कोल्हापुरातल्या सत्तेसाठी मंत्र्यांकडून फोन

कोल्हापूर ः कोल्हापूर जिल्हा परिषदेत कुणालाही स्पष्ट बहुमत न मिळाल्यामुळे अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा निकाल हा एक-दोन मतांच्या फरकानेच लागण्याची शक्‍यता आहे. प्रत्यक्ष सभागृहात जाऊन कोण सदस्य कोणासाठी हात वर करणार याची उत्कंठा शेवटच्या क्षणापर्यंत राहणार हे मात्र नक्की. या निवडणुकीतील प्रचंड चुरस पाहता थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मंत्रिमंडळातील अन्य वजनदार मंत्र्यांकडून सदस्यांच्या नेत्यांना थेट फोन करून पाठिंबा मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. 

जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष निवडीसाठी नव्या सभागृहाची पहिली बैठक मंगळवारी (ता. 21) होत आहे. दुपारी तीन वाजता ही बैठक होईल. तत्पूर्वी 11 ते 1 या वेळेत या पदासाठी अर्ज भरण्याची मुदत आहे. सहलीवर गेलेल्या सदस्यांना उद्या (ता. 20) कोल्हापुरात आणण्यात येईल. दोन्ही कॉंग्रेससह या आघाडीस पाठिंबा दिलेल्या सदस्यांना उद्याच पक्षाचा आदेश (व्हीप) बजावण्यात येणार आहे. 
नव्या सभागृहात शिवसेनेचे दहा सदस्य आहेत, त्यांची भूमिका या निवडीमध्ये निर्णायक असणार आहे. सद्यःस्थितीत यातील शिवसेनेचे पाच सदस्य कॉंग्रेस आघाडीसोबत असल्याचा दावा केला जातो. दोन्ही आघाड्यांकडून जरी दावे-प्रतिदावे करण्यात येत असले, तरी शिवसेनेच्या सदस्यांची भूमिका मात्र अद्याप गुलदस्त्यातच आहे. 

दुसरीकडे भाजपकडून पाठिंब्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. सदस्यांच्या नेत्यांना थेट मुख्यंमत्री कार्यालयातून फोन येत आहेत. पद, पैशाबरोबरच विकासकामांसाठी निधी देण्याचे आश्‍वासन दिले जात असल्याची चर्चा आहे. 

आजच्या घडीला दोन्ही आघाडींकडील संख्याबळ पाहता अध्यक्ष निवडीचा निकाल एक-दोन मतांतच लागणार आहे. कॉंग्रेस आघाडीकडे 35 सदस्य असल्याचा, तर भाजप आघाडीकडून 35 सदस्य असल्याचा दावा करण्यात येत आहे. प्रत्यक्षात सभागृहात कोण कोणासाठी हात वर करणार त्या वेळीच कोण कोणासोबत राहिले व कोणाचा अध्यक्ष झाला हे स्पष्ट होईल. त्यामुळे शेवटच्या क्षणापर्यंत ही उत्कंठा कायम राहणार आहे. 

संख्याबळाचा आजचा दावा 

कॉंग्रेस आघाडी 
कॉंग्रेस 14, राष्ट्रवादी 11, आबिटकर गट 3, सत्यजित पाटील गट 2, आमदार उल्हास पाटील व ताराराणी आघाडीचा प्रत्येकी एक व स्वाभिमानीचे दोन, अपक्ष एक. 
एकूण ः 35 

भाजप आघाडी 
भाजप 14, जनसुराज्य 6, चंदगड आघाडी 2, ताराराणी आघाडी 3, आवाडे गट 2, नरके गट 3, मिणचेकर गट 1, आमदार उल्हास पाटील 1, स्वाभिमानी 1, संजय घाटगे गट 1 व अपक्ष 1 
ेएकूण ः 35 
दोन्ही गटांचा या सदस्यांबाबत दावा 
एक अपक्ष, स्वाभिमानी व आवाडे गटाचे प्रत्येकी दोन व ताराराणीचे तिन्हीही सदस्य आपल्याकडेच असल्याचा दावा भाजपने केला आहे. तर कॉंग्रेसकडून स्वाभिमानीचे दोन, एक अपक्ष व ताराराणीचा एक सदस्य आपल्यासोबत राहील असे सांगितले जात आहे. त्यामुळे दोन्ही आघाड्यांनी केलेला दावा गृहीत धरल्यास प्रत्येकाकडे 35 सदस्य होतात; पण सभागृहात 67 सदस्य असल्यामुळे प्रत्यक्षात कोण कोणासोबत राहील हे मंगळवारीच स्पष्ट होईल. 

आज व्हीप बजावणार 
कॉंग्रेस आघाडीच्या सर्व सदस्यांना आज (ता. 20) पक्षाचा व्हीप बजावण्यात येणार आहे. कॉंग्रेस सदस्यांना जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील यांच्या वतीने तर राष्ट्रवादीच्या सदस्यांना जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांच्याकडून व्हीप बजावण्यात येणार आहे. या आघाडीला पाठिंबा दिलेल्या सदस्यांची एकत्रित आघाडी करून त्यांनाही गटनेत्याद्वारे व्हीप बजावला जाण्याची शक्‍यता आहे. 
महाडिकांच्या जोरदार हालचाली 
नागाव : अध्यक्षपदासाठी भाजपच्या सौ. शौमिका अमल महाडिक प्रबळ दावेदार आहेत. भारतीय जनता पक्षाकडून सौ. महाडिक दुसऱ्यांदा निवडून आलेल्या आहेत. सभागृहात जरी त्रिशंकू स्थिती असली तरी शौमिका महाडिक अध्यक्ष होणार असतील तर भारतीय जनता पक्षासोबत येण्यासाठी काही सदस्य तयार आहेत. त्यामुळे माजी आमदार महादेवराव महाडिक बेरजेच्या राजकारणात 37 पर्यंत आकडा गाठण्याचा दावा त्या आघाडीकडून केला जात आहे. 

अधिवेशनाला दोन दिवस सुटी असल्यामुळे मंत्री चंद्रकांत पाटील आणि आमदार अमल महाडिक यांनी आज दिवसभर हालचाली गतिमान केल्या. अध्यक्षपदासाठी 34 चा आकडा गाठणे आवश्‍यक आहे. सौ. शौमिका महाडिक यांना अध्यक्ष करण्यासाठी माजी आमदार महादेवराव महाडिक यांनीही जोमाने प्रयत्न सुरू केले आहेत. भाजप चौदा, जनसुराज्य सहा आणि ताराराणी आघाडी तीन या तीन पक्षांचे 23 सदस्य आहेत.

सद्यःस्थितीत शिवसेनेचे सात सदस्य भाजपच्या संपर्कात आहेत. माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी समझोता करून अपक्ष आणि स्थानिक आघाडीच्या माध्यमातून हा आकडा 37 पर्यंत नेल्याचे खात्रिलायक वृत्त आहे. शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख संजय मंडलिक यांना वगळता उर्वरित सर्व लोकप्रतिनिधी भारतीय जनता पक्षाला आपला नैसर्गिक मित्र मानून भाजपला सहकार्य करण्याच्या भूमिकेत आहेत; मात्र सर्वच नेते सावध भूमिकेत आहेत. पालकमंत्री चंद्रकांत पाटील ऐन वेळी राजकीय धक्का देत भाजपचाच अध्यक्ष करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com