kolhapur youth ncp | Sarkarnama

महापौरांच्या पुत्राचा राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षांना "डोस'! 

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 24 जुलै 2017

राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या अध्यक्ष निवडीवरून राष्ट्रवादीतील वातावरण चांगलेच तापले आहे. नवा अध्यक्ष बदला नाही तर मी पक्षच सोडतो असा सज्जड दम युवकचे माजी अध्यक्ष व महापौर हसीना फरास यांचे पुत्र आदिल फरास यांनी जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांना दिल्याने पक्षात एकच खळबळ उडाली आहे. 

कोल्हापूर : राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या अध्यक्ष निवडीवरून राष्ट्रवादीतील वातावरण चांगलेच तापले आहे. नवा अध्यक्ष बदला नाही तर मी पक्षच सोडतो असा सज्जड दम युवकचे माजी अध्यक्ष व महापौर हसीना फरास यांचे पुत्र आदिल फरास यांनी जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांना दिल्याने पक्षात एकच खळबळ उडाली आहे. 

युवक राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदी संग्राम कोते-पाटील यांची नियुक्ती झाल्यानंतर सर्वच जिल्ह्यातील युवकचे अध्यक्ष बदलण्याची प्रक्रिया सुरू आहे. कोल्हापुरात या पदावरून माजी नगरसेवक अमोल माने यांना हटवून अवधूत अपराध यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही निवड करताना आपल्याला विश्‍वासात घेतले नसल्याचा आरोप श्री. फरास यांचा आहे. या निवडीमागे शहराध्यक्ष राजू लाटकर आहेत, हा रागही श्री. फरास यांना आहे. याचा उद्रेक झाला. 

पक्ष कार्यालयात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रम होता. कार्यक्रम संपल्यानंतर "राजू लाटकर हटाओ' अशा घोषणा देतच श्री. फरास यांच्यासह त्यांचे कार्यकर्ते कार्यालयात आले. यावेळी महापौर हसीना फरास याही उपस्थित होत्या. यामुळे कार्यालयात एकच गोंधळ उडाला. फक्त सात वर्षेच पक्षात असलेल्यांचे ऐकून आमच्या कार्यकर्त्यांवर अन्याय का करता ? असा जाब त्यांनी ए. वाय. यांना विचारला. यावेळी श्री. फरास यांनी श्री. लाटकर यांच्या विरोधातील पाढाच ए. वाय. यांच्यासमोर वाचून दाखवला. आम्हाला बेदखल कराल तर पक्षातून बाहेर पडू, असा दमही त्यांनी यावेळी दिला. 

ज्यांनी शहराध्यक्ष पदाच्या तीन वर्षाच्या काळात साधी कार्यकारिणीही करता आली नाही, केवळ नेत्यांच्या गाडीत बसून फिरणाऱ्या लाटकर यांनी "युवक' च्या पदाधिकारी निवडीत नाक खुपसु नये या शब्दात श्री. फरास यांच्या कार्यकर्त्यांनी श्री. लाटकर यांचा समाचार घेतला. ए. वाय. यांनी श्री. फरास यांची समजूत काढताना लवकरच हा निर्णय वरिष्ठांना कळवून योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्‍वासन दिले. 

संबंधित लेख