उद्धवसाहेब असं का करताय? खरं सांगा अंबाबाईशपथ...!

श्री. ठाकरे यांच्या मनात कोल्हापुरविषयी असलेली हिच आत्मियता म्हणायची का?
उद्धवसाहेब असं का करताय? खरं सांगा अंबाबाईशपथ...!

'सर्वार्थाने समृध्द, पुरोगामी विचारांचा वारसा चालवणारा जिल्हा' अशी ओळख असलेल्या कोल्हापुरवर राजकीय क्षेत्रातून मात्र नेहमी अन्यायच होत आला आहे. कॉंग्रेस, राष्ट्रवादीच्या राजवटीत कमी महत्त्वाची खाती देऊन बोळवण करण्यात आली. आता तोच कित्ता युती शासनाच्या काळात गिरवला जात आहे. किंबहुना कॉंग्रेस आघाडीपेक्षा जास्त अन्याय युती शासनाने त्यातही विशेषतः शिवसेनेने केल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. लोकसभेच्या दोन्हीही आणि विधानसभेच्या दहापैकी सहा जागा निवडून दिलेल्या या जिल्ह्याला पाच वर्षात एकही मंत्रीपद पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांना द्यावे असे वाटले नाही. श्री. ठाकरे यांच्या मनात कोल्हापुरविषयी असलेली हिच आत्मियता म्हणायची का? 

लोकसभेच्या प्रचाराचा शुभारंभ श्री. ठाकरे यांनी कोल्हापुरातून केला, दोन्हीही खासदार विजयी होऊ देत असे साकडे त्यांनी अंबाबाईला घातले. त्याप्रमाणे दोन्हीही जागा सेनेने जिंकल्या, बोलल्याप्रमाणे नवस फेडण्यासाठी श्री. ठाकरे कोल्हापुरात आले. पण त्यानंतर अवघ्या काही दिवसांतच झालेल्या मंत्रीमंडळ विस्तारात मात्र त्यांना कोल्हापुरचा विसर पडला. कोल्हापुरकरांसाठी ही दुर्दैवाची गोष्ट आहे. 

जिल्ह्यातील आमदार राजेश क्षीरसागर हे मंत्रीपदाचे प्रमुख दावेदार आहेत. इतर पाच आमदार हे पर्याय नाही म्हणून शिवसेनेत आले, तसे श्री. क्षीरसागर यांचे नाही. एक लढवय्या कार्यकर्ता, आक्रमक आमदार अशी त्यांची ओळख आहे. पश्‍चिम महाराष्ट्र त्यातही संमिश्र मतदार असलेला कोल्हापुरसारखा जिल्हा सेनेच्या मागे असताना मंत्रीपद नाकारणे ही धोक्‍याची घंटा आहे. याउलट तीन वर्षापुर्वी सेनेत आलेल्या आणि विधानपरिषद आमदार असलेल्या तानाजी सावंतांना मंत्रीपद देऊन सेनेने काय साधले? श्री. सावंत रहातात कोठे, त्यांचा कारखाना कोठे, त्यांची शिक्षण संस्था कोठे आणि ते कोणत्या विधानपरिषद मतदार संघातून निवडून आले हे सर्व पाहता सेनेची स्पष्ट दिशा लक्षात येते.  

महिनाभरापुर्वी सेनेत आलेल्या बीडच्या जयदत्त क्षीरसागर यांना मंत्रीपद देऊन सेनेला फार फायदा होईल असे मानने धाडसाचे होईल. धनाढ्य लोकांना कुरवाळण्याचे काम सेनेकडून झाल्याचे बोलले जाते. सेनेचा हा इतिहास काही नवा नाही. यापुर्वी कॉंग्रेसमधून आलेल्या चंद्रिका केनिया असो नंदी, राम जेठमलानी यांना सेनेच्या कोट्यातून खासदारकी आणि मंत्रीपदे देण्यात आली. अशा ज्या लोकांना सेनेने संधी दिली त्यांनी केव्हाच पक्ष सोडला पण कट्टर शिवसैनिक अजूनही सेनेसोबतच आहे. त्यांनी फक्त 'जय भवानी, जय शिवाजी' चा नाराच द्यायचा, आंदोलनात डोकी फोडून घ्यायची आणि पदे देताना मात्र अशा कट्टर आणि निष्ठावंत शिवसैनिकांवर अन्याय करायचा हेच वारंवार घडताना दिसते आहे.

कोल्हापुरने सहा आमदार व दोन खासदार देऊन सेनेला बळ दिले, पण नेतृत्त्वाकडून मात्र जिल्ह्याची उपेक्षाच झाली आहे. विकास कामांच्या पातळीवरही हेच चित्र आहे. सहा आमदार असूनही जिल्ह्यात एकही मोठा प्रकल्प आलेला नाही. गेली चार वर्षे चिकोत्रा आणि धामणी प्रकल्पाच्या प्रलंबित कामांसाठी आमदार प्रकाश अबीटकर निधी मागत आहेत. हे प्रकल्प रखडल्याने त्या भागातील लोकांनी मतदानावर बहिष्कार टाकला पण त्याकडेही पक्ष म्हणून लक्ष द्यायला श्री. ठाकरे यांना वेळ नाही. कार्यकर्त्याची कामे करायची असतील तर मंत्रीपद हवे, ते नसल्याने कार्यकर्त्यांचीही गोची झाली आहे. दुसरीकडे युतीतील घटक पक्षाने जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकात पाटील यांच्याकडे महसूल, सार्वजनिक पाटबंधारे अशी महत्त्वाची खाती दिली. त्यातून भाजपाच्या कार्यकर्त्यांची आणि जनतेचीही कामे होत आहेत. श्री. पाटील यांनी या मंत्रीपदाच्या ताकदीवर जिल्ह्यात आणि शहरात अनेक चांगले उपक्रम राबवले, त्यातून भाजपाची ताकद वाढली. त्यातुलनेत ठाकरे कोल्हापूरसाठी काही करताना दिसत नाहीत. ते असं कां करताहेत, हे कळायला मार्ग नाही. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com