kolhapur shivsena | Sarkarnama

शिवसेनेच्या कोल्हापूर जिल्हाप्रमुखांना 4 लाखाची ऑफर ! 

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 24 मे 2017

तालुका कृषी अधिकाऱ्यांनी दिलेली पैशाची ऑफर ऐकून सगळेच अवाक झाले. काल 3 लाख दिल्याचा उल्लेख आल्यानंतर पवार यांनी ज्याला दिले त्याच्यावर गुन्हा दाखल कर, असे सांगून आव्हान देण्याचा प्रयत्न केला. 
 

कोल्हापूर : "काल एकाकडे तीन लाख दिलेत, आता एक लाख देतो पण आंदोलन करू नका,' अशी खुली "ऑफर' जलयुक्त शिवारातील गैरव्यवहाराचा पर्दाफाश करणाऱ्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांना तालुका कृषी अधिकारी नामदेव परीट यांनी दिली. मोबाईलवर बोलताना श्री. परीट यांची ही "ऑफर' ऐकून श्री. पवार यांच्यासह त्यांच्यासोबत असलेले पत्रकारही अवाक्‌ झाले. 

साखरी-म्हाळुंगे (ता. गगनबावडा) येथे जलयुक्त शिवार योजनेतील अपहाराचा भंडाफोड शिवसेनेने बुधवारी प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी जाऊन पत्रकारांसमक्ष केला. शिवसेना जिल्हा प्रमुख संजय पवार, युवा सेना जिल्हाध्यक्ष हर्षल सुर्वे व शहाजी देसाई यांनी साखरी येथील कामाची मापे घेऊन व चुकीच्या पद्धतीने झालेल्या कामे प्रसार माध्यमांसमोर आणली. त्यावेळी पवार यांनी नामदेव परीट या अधिकाऱ्यांना याचा जाब विचारला असता त्यांनी योग्य समिती नियुक्त करू, पहिले एका व्यक्तीकडे तीन दिले आहेत, आता एक देतो, पण आंदोलन करू नका असा प्रस्ताव ठेवल्यानंतर श्री. पवार यांनी त्यांना त्यांना चांगलेच धारेवर धरले. 

साखरी-म्हाळुंगे येथे जलयुक्त शिवारमधून सुमारे 27 लाखांची कामे झाली आहेत. ही कामे भैरेवाडी (ता. पन्हाळा) येथील विनय कोरे मजूर सहकारी संस्था व घुडेवाडी (ता. राधानगरी) येथील सुशांत पोवार यांच्या नावे आहेत. तालुक्‍यात 18 माती बंधारे केली आहेत. 65 मीटर लांबीऐवजी 55 मीटर लांबी आहे. दगडी पिचिंगमध्ये अर्धे दगड आणि अर्धा जांबा दगड वापरून शासनाची फसवणूक केली आहे. बंधारा मजबूत होण्यासाठी काळ्या मातीचा वापर करावा लागतो. पण, काळ्या मातीची एक पाटीही त्यामध्ये दिसत नाही. काळी माती टाकल्यानंतर त्यावर रोलर फिरवावा लागतो. त्यात पाणी मारून घट्ट करावे लागते. घट्ट झाल्यानंतर पुन्हा मातीचा धर घेऊन रोलिंग करावे लागते. मात्र यापैकी कोणतेही काम नियमानुसार झालेले नसल्याचे दिसून आले. ज्या ठिकाणी मातीचे ढीग उभे केले आहेत. त्या ठिकाणची सर्व माती पहिल्याच पावसात वाहून जाऊ शकते. बंधाऱ्याची अपेक्षित खोली केलेली नाही. त्यामुळे बंधाऱ्यात पाणी साठणार नाही आणि मूरणारही नाही. दोन बंधाऱ्यातील अंतर हे 250 मीटर असली पाहिजे. पण हे अंतर 100 ते 150 मीटरवरच आहे. बंधाऱ्यातील 22 टीसीएमची एका बंधाऱ्याची पाणी क्षमता दिली आहे. मात्र निम्मेच पाणी साठेल, असे संजय पवार, हर्षल सुर्वे व शहाजी देसाई यांनी यावेळी सांगितले. 

 

संबंधित लेख