kolhapur sanjay ghatge may be entre bjp | Sarkarnama

संजयबाबा 'कमळ' घेणार; कागलचे 'दोन्ही घाटगे' एक होणार? 

निवास चौगले 
मंगळवार, 6 मार्च 2018

महाडीकांची तयारी वेगळीच 
या प्रक्रियेत आघाडी घेतलेल्या महादेवराव महाडीक यांना दोन्ही पातळीवर राजकारण करायचे आहे. कोल्हापूर दक्षिणमधील बहुंताशी भाग हा "शाहू-कागल' च्या कार्यक्षेत्रात येतो. 2014 च्या निवडणुकीत हा गट माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्यासोबत होता, आता तो आपल्याकडे असणार हे श्री. महाडीक यांनाही माहित आहे. त्याचबरोबर "गोकुळ' च्या निवडणुकीत राजे गटांबरोबरच संजयबाबा यांनाही आपल्या बाजूला घेण्यात त्यांना रस अधिक आहे. संजयबाबा यांचे पुत्र अमरिश हे "गोकुळ' च्या निवडणुकीत विरोधी गटाकडून विजयी झाले पण सत्ताधाऱ्यांच्या मांडीवर ते कधी बसले हे समजलेही नाही. त्यामुळे "गोकुळ' च्या पुढील निवडणुकीत ते सत्तारूढ गटाचे उमेदवार असतील. 

कोल्हापूर : आगामी विधानसभा निवडणुकीत कागल मतदारसंघातून माजी आमदार संजय घाटगे हे भाजपाचे "कमळ' हातात घेण्याची शक्‍यता आहे. सद्या भाजपासोबत असलेले कॉंग्रेसचे माजी आमदार महादेवराव महाडीक व "म्हाडा' चे अध्यक्ष समरजतसिंह घाटगे यांची झालेली भेट, या भेटीत दोन्ही घाटगे गटांनी एकत्र येण्याची श्री. महाडीक यांची सुचना, त्यामागे असलेले "गोकुळ' व कोल्हापूर दक्षिणचे राजकारण पाहता कागलमध्ये दोन्ही घाटगे गट एकत्र येण्याचे संकेतही मिळत आहेत. 

संजयबाबा यांनी सहावेळा विधानसभेची निवडणूक लढवली, त्यापैकी एकाच निवडणुकीत ते विजयी झाले, तोही कालावधी त्यांना अवघ्या 18 महिन्यांचाच मिळाला. उर्वरित चार निवडणुकीत ते विद्यमान आमदार हसन मुश्रीफ यांच्याकडून पराभूत झाले. चारवेळा जरी ते पराभूत झाले असले तरी 2009 चा अपवाद वगळता इतर तीन निवडणुकीत ते अतिशय कमी मतांनी पराभूत झाले. आमदारकीची एक टर्म पूर्ण करण्याची त्यांची महत्त्वकांक्षी आहे आणि ती लपूनही राहीलेली नाही. आताच्या त्यांच्या वयाचा विचार करता तेही भाजपाकडून संधी मिळाली तरी ते सोडणार नाहीत, अशी स्थिती आहे. 

श्री. मुश्रीफ यांच्याविरोधात प्रबळ उमेदवार द्यायचा झाल्यास दोन्ही घाटगे गट एकत्र आले पाहीजेत असे भाजपालाही वाटते, त्यातून त्यांनी "शाहू-कागल' चे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांना पक्षात घेऊन त्यांना राज्यमंत्री पदाचा दर्जा असलेले "म्हाडा' चे अध्यक्ष पद दिले. समरजित व संजयबाबा यांच्यात श्री. मुश्रीफ यांना लढत देईल असा उमेदवार म्हणजे संजयबाबा हेच आहेत, हे भाजपा नेतृत्त्वालाही माहित आहे. तालुक्‍यातील प्रत्येक गावांत असलेल संजयबाबा यांचा गट, या ना त्या कारणामुळे त्यांचा सुरू असलेला संपर्क, "गोकुळ' च्या राजकारणात त्यांची महाडीक यांच्याबरोबर असलेली उठबस हे सर्व पाहता भाजपाचीही पहिली पसंती तेच असतील. 
तथापि आजपर्यंतचा संजय घाटगे यांचा अनुभव पाहता ते लवकर कोणताही निर्णय घेत नाहीत. त्यातूनच पाच विधानसभा निवडणुका त्यांनी चार पक्षांकडून लढवल्या. 

1998 ला ते शिवसेनेचे आमदार असताना 1999 च्या निवडणुकीत कोणाचे तरी ऐकून त्यांनी कॉंग्रेसची उमेदवारी घेतली, त्यावेळी त्यांचा अवघ्या 2281 मतांनी पराभव झाला, 2004 मध्ये ते पुन्हा सेनेकडून रिंगणात उतरले, त्यावेळी त्यांचा 1125 मतांनी पराभव झाला. यावेळी सुध्दा त्यांनी लवकर निर्णय घेतला नाहीतर पक्षाबरोबरच त्यांच्यासमोरही अडचणीत वाढण्याची शक्‍यता आहे. 

श्री. मुश्रीफ हे 1999 पासून आमदार आहेत, 2000 ते 2014 पर्यंत ते मंत्री होते. मंत्रीपदाच्या एवढ्या प्रदीर्घ काळात त्यांनी मतदारसंघात विकास कामांचा धडाका लावला. विशेषतः शासनाच्या आरोग्य योजना घराघरांपर्यंत पोहचवण्यात ते यशस्वी झाले. आजही या कामात खंड नाही. त्यातून मतदार संघातील घराघराशी त्यांची नाळ जुळल्याचे चित्र आहे. संजय घाटगे यांचा संपर्क चांगला असला तरी विकासकामे घेऊन ते लोकांसमोर जाऊ शकत नाहीत. अर्थिक बाजू हीसुध्दा त्यांच्यासमोरची अडचण आहे. स्वतःचा प्रबळ गट आणि सत्तते असलेल्या भाजपाची अर्थिक रसद या जोरावर ते मतदार संघात आव्हान उभे करू शकतात पण त्यांच्याकडून निर्णय केव्हा होणार यावर हे अवलंबून आहे. 

विधासभेला दोघांपैकी एक 
"म्हाडा' चे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनाही विधानसभेचे वेध लागले आहेत. त्यातूतनच त्यांनी भाजपात प्रवेश केला, त्यानंतर झालेल्या नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत त्यांनी झोकून देऊन पक्षाचे काम केले. या निवडणुका जिंकायचे म्हणून ते रिंगणात उतरले असते तर कदाचित चित्र वेगळे दिसले असते पण त्यांनी पक्ष घराघरात पोहचवला. आता त्यांना डावलून संजयबाबा यांना उमेदवारी भाजपा नेतृत्त्व देईल का ? आणि ही उमेदवारी समरजितसिंह यांना मान्य असेल का ? हा प्रश्‍न आहे. श्री. मुश्रीफ यांना लढत देणारा उमेदवार संजयबाबा हेच असल्याने भाजपाकडून समरजितसिंह यांना विधानपरिषद देऊन विधानसभेची उमेदवारी संजयबाबा यांना दिली जाण्याची शक्‍यता नाकारका येत नाही. 

 

संबंधित लेख