Kolhapur Politics : will supporters join BJP with Narayan Rane ? | Sarkarnama

पवारांच्या सूचक वक्तव्याने कोल्हापुरातील नारायण  राणेंचे ' स्नेही ' चर्चेत !

निवास चौगले-सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 22 ऑगस्ट 2017

राणे जातील तिकडे मी-साळोखे
राणेंच्या संभाव्य भाजपा प्रवेशानंतर शिवसेनेचे माजी आमदार सुरेश साळोखे यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता ते म्हणाले,"राणे जिकडे जातील तिकडे त्यांच्यासोबत आपण असू.'

कोल्हापूर :  माजी मुख्यमंत्री व कॉंग्रेस नेते नारायण राणे यांच्या भारतीय जनता पार्टीतील प्रवेशाला शुभेच्छा देतानाच त्यांचे भरपूर "स्नेही' कोल्हापुरात असल्याचा गौप्यस्फोट राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल केला. त्यामुळे जिल्ह्यातील कोणते स्नेही राणेंबरोबर  भाजपमध्ये जाणार याविषयी चर्चेला उधाण आले आहे . 

कॉंग्रेसमध्ये बेदखल झालेले व नेतृत्त्वावर नाराज असलेले श्री. राणे भाजपात जाण्याच्या तयारीत आहेत. 27 ऑगस्ट रोजी त्यांचा पक्ष प्रवेश निश्‍चित समजला जातो. त्यांचे एक पुत्र कॉंग्रेसचे आमदार आहेत तर दुसरे पुत्र कॉंग्रेसचेच माजी खासदार आहेत. त्यामुळेच श्री. राणे यांच्या भाजपा प्रवेशाला महत्त्व तर आले आहेच पण त्यांनी निर्णय घेतलाच तर कोकणात कॉंग्रेसला मोठे खिंडार शक्‍य आहे. 

एका खाजगी कामासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष पवार काल (ता. 20) कोल्हापुरात आले होते. पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी एका प्रश्‍नाला उत्तर देताना राणेंच्या भाजपा प्रवेशाला शुभेच्छा दिल्या. एवढ्यावरच ते थांबले नाहीत तर त्यांनी ' कोल्हापुरातही राणेंचे स्नेही आहेत ', असा टोला लगावला होता. आता हे स्नेही कोण या चर्चेने राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.

 कोकण हा राणेंचा बालेकिल्ला पण शिवसनेने त्यांच्या या बालेकिल्ल्याला सुरूंग लावत त्यांचाच पराभव केला. त्यांचे पुत्रही लोकसभेच्या निवडणुकीत पराभूत झाले. पण तरीही राणेंचे कोकणातील ताकद दुर्लक्ष करून चालणार नाही. शिवसेनेला कोकणात रोखायचे तर श्री. राणे यांच्यासारखा जबरदस्त नेता भाजपात हवा यासाठी भाजपाच्या नेत्यांनी त्यांच्यासाठी पायघड्या घातल्या आहेत. महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी तर आपल्याकडील सार्वजनिक बांधकाम खाते त्यांना देण्याची तयारी दर्शवली आहे. 

श्री. राणे हे युतीच्या काळात 1995 ते 1995 या काळात शेवटच्या टप्प्यात मुख्यमंत्री होते. 1 फेब्रुवारी 1999 ते 11 ऑक्‍टोबर 1999 या मुख्यमंत्री पदाच्या काळात त्यांनी पक्ष व राजकारणावर चांगले वर्चस्व मिळवले. त्या काळात त्यांच्यासोबत कोल्हापुरातील माजी आमदार सुरेश साळोखे, वारणेचे अशोक पाटील (तात्या) अशी काही मोजकीच मंडळी होती. श्री. राणे कॉंग्रेसमध्ये आले आणि त्यांच्या समर्थकांचा कोल्हापुरातील व्याप वाढला.

त्यांचे पुत्र निलेश राणे यांनी स्थापन केलेल्या "स्वाभिमान' संघटनेचे मोठे जाळे जिल्ह्यात आहे. ग्रामीण भागात उघडपणे नसले तरी राणे म्हणून त्यांना पाठिंबा असलेल्यांचीही मोठी यादी आहे. पण आता श्री. राणे जर भाजपात गेले तर त्यांच्यासोबत शिवसेना, कॉंग्रेस किंवा "स्वाभिमान' संघटनेचे कोण कोण जाणार यासाठी त्यांच्या भाजप प्रवेशाचीच वाट पहावी लागेल. मात्र श्री. पवार यांच्या विधानामुळे हे समर्थक चर्चेत मात्र नक्की आले. 

 

संबंधित लेख