kolhapur politics : agitation against Mahalaxmi priests | Sarkarnama

पुजारी हटाव, महालक्ष्मी बचाव 

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 19 जून 2017

श्री महालक्ष्मी मूर्तीची हेळसांड करणाऱ्या आणि राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा अवमान करणाऱ्या श्रीपूजकांना मंदिरातून हटवण्यावरून कोल्हापुरात वातावरण तापले आहे. शिवसेनेसह सर्वपक्षीय कृती समिती, मराठा महासंघ यांनी एकत्र येऊन श्रीपुजकांच्याविरोधात रस्त्यावर उतरण्याची तयारी सुरू केली आहे. परिणामी गेल्या अनेक वर्षापासून पुजाऱ्यांविरोधात असलेला असंतोष रस्त्यावर दिसण्याची चिन्हे आहेत. 

कोल्हापूर : श्री महालक्ष्मी मूर्तीची हेळसांड करणाऱ्या आणि राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा अवमान करणाऱ्या श्रीपूजकांना मंदिरातून हटवण्यावरून कोल्हापुरात वातावरण तापले आहे. शिवसेनेसह सर्वपक्षीय कृती समिती, मराठा महासंघ यांनी एकत्र येऊन श्रीपुजकांच्याविरोधात रस्त्यावर उतरण्याची तयारी सुरू केली आहे. परिणामी गेल्या अनेक वर्षापासून पुजाऱ्यांविरोधात असलेला असंतोष रस्त्यावर दिसण्याची चिन्हे आहेत. 

दरम्यान, आजच शिवसेनेसह विविध पक्ष व संघटनांच्या कार्यकर्त्यांनी घातले. "अंबाबाईच्या नावानं चांगभलं', "अंबा माता की जय', "आता एकच मागणी- हटाव पुजारी' अशा घोषणांनी सुमारे तासभर मंदिर परिसर दणाणून गेला. दरम्यान, आंदोलनाचा पुढील टप्पा म्हणून बुधवारी (ता.21) दुपारी बारा वाजता जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांना भेटून पुढील दिशा ठरवण्याचा निर्णय यावेळी झालेल्या बैठकीत झाला. यावेळी मंदिरात पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. 

श्री महालक्ष्मीस घागरा-चोली परिधान करून पूजा बांधल्याने भाविकांच्या भावना दुखावल्या असल्याच्या भूमिकेतून गेली अकरा दिवस विविध पक्ष, संघटनांनी आंदोलन सुरू केले आहे. त्याला श्री अंबाबाई (महालक्ष्मी) हक्कदार श्रीपूजकांनी प्रसिध्दीपत्रकाच्या माध्यमातून उत्तरेही दिली. मात्र, श्रीपूजकांनी गुन्हा नोंद झाल्याने आंदोलनकर्त्यांच्या समन्वय बैठकीच्या मागणीला नकार दिला. त्यामुळे आंदोलन तीव्र करण्याचा निर्णय काल झालेल्या संयुक्त बैठकीत झाला. त्याचा पहिला टप्पा म्हणून आज श्री महालक्ष्मीला साकडे आंदोलन झाले. जिल्हा प्रशासन आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी अद्यापही याबाबत कोणतीच ठोस भूमिका घेतली नसल्याबद्दल यावेळी तीव्र भावना व्यक्त झाल्या. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय देवणे म्हणाले, ""भाविकांच्या भावनांचा अनादर झाला असला तरी श्रीपूजकांची समन्वयाची भूमिका नाही. जिल्हा प्रशासनाने याची गांभीर्याने दखल घेतलेली नाही. त्यामुळे आता थेट त्यांनाच भेटून आंदोलनाची पुढील दिशा ठरवली जाईल.'' 

प्रजासत्ताक संस्थेचे दिलीप देसाई यांनी गेली अकरा दिवस आंदोलन सुरू केले असले तरी जिल्हा प्रशासन कोणतीच भूमिका घेत नाही. पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि काही नेत्यांनी त्यासाठी प्रशासनाला आदेश दिले आहेत का, असा सवाल उपस्थित केला. मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव मुळीक यांनी प्रशासनाचा निषेध नोंदवला. माजी आमदार सुरेश साळोखे यांनी पंढरपूरच्या धर्तीवर श्रीपूजकांना हटवावे, असे मत मांडले. माजी नगरसेवक राजू लाटकर यांनी राजर्षी शाहूंचा अवमान कोल्हापूरने कदापिही खपवून घेतलेला नाही. त्यामुळे श्रीपूजकांना हटवा, अशी मागणी केली. रितसर पावती करूनही पोलिसांनी श्री महालक्ष्मीचे दर्शन सोवळ्यात घेवू दिले नाही. 
 

संबंधित लेख