kolhapur politics | Sarkarnama

कॉंग्रेसची सत्ता येणार की महाडीक भाजपमध्ये जाणार ? 

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 5 मे 2017

महापालिकेत पत्रकारांशी बोलताना श्री. मुश्रीफ यांनी आपण पक्षाने आदेश दिल्यास राष्ट्रवादीकडून लोकसभा निवडणूक लढविण्यास तयार असल्याचे सांगितले. पण तत्पूर्वी विद्यमान खासदार धनंजय महाडीक यांनी आपली भूमिका जाहीर करण्याची गरज असल्याची पुष्टीही त्यांनी यावेळी जोडली. 

कोल्हापूर : राष्ट्रवादीचे खासदार धनंजय महाडीक हे 2019 नंतर केंद्रीय मंत्री असतील, या पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या वक्‍तव्याचा अर्थबोध होईना. देशात कॉंग्रेस आघाडीची पुन्हा सत्ता येणार की श्री. महाडीक लोकसभेला भाजपचे उमेदवार असणार हे श्री. पाटील यांच्या वक्‍तव्यावरून समजून येत नाही, असा टोला राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ यांनी आज लगावला. 

गेल्या सोमवारी महालक्ष्मी मंदिरात देवीला सुवर्ण पालखी अर्पण करण्याचा कार्यक्रम झाला. या सुवर्ण पालखीसाठी खासदार महाडीक यांनी प्रयत्न केले होते. पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते हा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमात श्री. पाटील यांनी 2019 नंतर श्री. महाडीक हे केंद्रीय मंत्री असतील असे वक्तव्य केले होते. 

या पार्श्‍वभूमीवर आज श्री. मुश्रीफ यांच्याशी संपर्क साधला. ते म्हणाले,"राज्य घटनेप्रमाणे देशात किंवा राज्यात एखाद्या पक्षाची सत्ता आली तर त्या पक्षाचा पंतप्रधान व मुख्यमंत्री कोण हे ठरवण्याचे अधिकार त्यांना आहेत. या पदासाठीची व्यक्ती निवडून आली पाहिजे असे नाही पण निवडीनंतर त्यांना सहा महिन्यात कोणत्याही एका सभागृहाचे सदस्यत्व स्वीकारावे लागते. श्री. महाडीक हे राष्ट्रवादीचे अजून तरी खासदार आहेत. त्यामुळे पालकमंत्री पाटील यांनी त्यांना मंत्री करण्याची भाषा केली असेल तर 2019 ला देशात कॉंग्रेस आघाडीचे सरकार येणार की श्री. महाडीक हे भाजपचे उमेदवार असणार, याचा काही अर्थबोध त्यांच्या वक्तव्यातून होत नाही.' 

याबाबत अधिक प्रतिक्रिया विचारली असता श्री. मुश्रीफ म्हणाले,"पालकमंत्री पाटील यांच्या वक्तव्यानंतर खासदार महाडीक यांनीही आपली भूमिका जाहीर केलेली नाही. त्यामुळे यावर अधिक बोलणे योग्य ठरणार नाही. श्री. महाडीक यांनीच सविस्तर खुलासा केला तर यावर अधिक प्रतिक्रिया मी देईन.' 

 

संबंधित लेख