kolhapur politics | Sarkarnama

भुदरगडमधील कॉंग्रेसची तिसरी पिढी भाजपत ! 

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 3 मे 2017

राधानगरी विधानसभा मतदार संघात देसाई यांना मानणारा मोठा गट आहे. श्री. देसाई यांच्या भाजप प्रवेशामुळे पक्षाला तर बळ मिळालेच पण सत्तेसोबत गेल्याने देसाई गटालाही मोठा आधार मिळाला आहे. राज्यात सत्ता भाजपची असल्याने कार्यकर्त्यांची कामे, भागातील विकास कामाला निधी मिळवून स्वतःचा गट मजबूत करण्यासाठी हा पक्षप्रवेश देसाई यांच्यादृष्टीने लाभाचा ठरणार आहे. 

कोल्हापूर :  आजोबा व वडील कॉंग्रेसचे माजी आमदार, पत्नी कॉंग्रेसच्या जिल्हा परिषद सदस्या, भाऊ कॉंग्रेस नेत्यांची सत्ता असलेल्या "गोकूळ' मध्ये संचालक, अशी राजकीय पार्श्‍वभूमी असलेले कॉंग्रेसचे माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल देसाई यांनी केलेल्या भाजप प्रवेशामुळे राधानगरी-भुदरगड विधानसभा मतदार संघातील राजकीय समीकरणे बदलणार आहेत. श्री. देसाई हे या मतदार संघाचे भाजपचे संभाव्य उमेदवार असण्याची शक्‍यता आहे. 

श्री. देसाई यांचे आजोबा कै. आनंदराव देसाई हे कॉंग्रेसच्या चिन्हावर दोनवेळा आमदार झाले, त्यानंतर वडील बजरंग देसाई यांनीही या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. 2014 च्या विधानसभा निवडणुकीतही बजरंग देसाई यांना कॉंग्रेसने उमेदवारी जाहीर करून पक्षाचे ए, बी. फॉर्म पाठवले होते, पण त्यांनी अर्जच भरला नाही. त्यातून शिवसेनेचे आमदार प्रकाश अबीटकर यांचा विजय सोपा झाला. 2019 च्या निवडणुकीत माजी आमदार के. पी. पाटील, सेनेचे आ. प्रकाश अबीटकर व भाजपकडून देसाई अशी लढत होण्याची शक्‍यता आहे. 

दोन पिढ्या कॉंग्रेसमध्ये गेल्यानंतर तिसऱ्या पिढीचे नेतृत्व करणारे राहुल यांनीही पाच वर्षापूर्वी कॉंग्रेसच्या चिन्हावरच जिल्हा परिषद निवडणूक लढवून ती जिंकली होती. फेब्रुवारी 2017 मध्ये झालेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत त्यांच्या पत्नी सौ. रेश्‍मा यासुद्धा कॉंग्रेसच्या चिन्हावरच विजयी झाल्या. त्यांचे मोठे बंधू कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील यांचे नेतृत्व असलेल्या "गोकूळ' चे संचालक आहेत. 

जिल्ह्याच्या राजकारणात कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील यांचे नेतृत्व मानणारे कुटुंब अशीही देसाई घराण्याची ओळख होती. पक्षाच्या जिल्हाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत आवाडे विरुद्ध पी. एन. असा संघर्ष सुरू असताना देसाई यांनी मात्र पी. एन. यांनाच साथ दिली.

संबंधित लेख