कोल्हापुरात कालचे शत्रू बनले आजचे मित्र 

जिल्हा बॅंकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत श्री. कोरे यांनी ठाम भूमिका घेतल्याने राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ यांचा मार्ग सुकर झाला. या निवडणुकीत पी. एन.यांना अध्यक्ष करण्याची पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची खेळी यशस्वी होण्याची शक्‍यता असतानाच श्री. कोरे हे श्री. मुश्रीफांच्या मदतीला धावले. महापालिका,जिल्हा परिषदेतही या दोघांतील दोस्ताना घट्ट होता, पण त्यातही अंतर आल्याचे या घडामोडींवरून स्पष्ट होते.
 कोल्हापुरात कालचे शत्रू बनले आजचे मित्र
कोल्हापुरात कालचे शत्रू बनले आजचे मित्र

कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीच्या निमित्ताने कालचे शत्रू आज मित्र बनले. विधानपरिषदेच्या निवडणुकीत महाडीक गटाचे राजकारण संपविण्याची वल्गना केलेले "जनसुराज्य' चे विनय कोरे हेच त्यांच्या मांडीला मांडी लावून बसले. अशीच स्थिती सरूडकर-कोरे, आवाडे-हाळवणकर, आवाडे-शेट्टी यांची झाली आहे. यावरून राजकारणात कोणीही कुणाचा कायमचा मित्र किंवा शत्रू असू शकत नाही हेच स्पष्ट झाले आहे. 

जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत माजी आमदार महादेवराव महाडीक यांच्या स्नुषा सौ.शौमिका महाडीक विजयी झाल्या. त्यांच्या विजयात "जनसुराज्य' सह माजी मंत्री प्रकाश आवाडे, आमदार सत्यजित पाटील-सरूडकर, चंद्रदीप नरके यांच्या भूमिका महत्त्वाच्या ठरल्या. दीड वर्षापूर्वीच झालेल्या विधानपरिषदेच्या निवडणुकीत श्री. कोरे यांनी कॉंग्रेस आघाडीचे उमेदवार आमदार सतेज पाटील यांना पाठिंबा दिला होता.

या निवडणुकीच्या मतदानाच्या आदल्यादिवशी पुणे येथे झालेल्या आघाडीच्या मतदारांच्या बैठकीत महाडीकांना जिल्ह्यातून हद्दपार करण्याची घोषणा श्री. कोरे यांनी केली होती. पण अवघ्या दीड वर्षात ते भाजपासोबत व या निवडणुकीत महाडीकांच्या मांडीला मांडी लावून बसले. 

इचलकरंजीतील प्रकाश आवाडे-आमदार सुरेश हाळवणकर वाद तर गेल्या दहा वर्षापासून जिल्हा बघत आहे. इचलकरंजी नगरपालिकेतील कॉंग्रेसची सत्ता उलथवून टाकण्यात श्री. हाळवणकर किंगमेकर ठरले. राष्ट्रवादीचेच सात नगरसेवक फोडून त्यांनी कॉंग्रेसला सत्तेपासून दूर ठेवले. पण या निवडणुकीत या दोघांनीही एकमेकांच्या गळ्यात गळे घातले. हेच चित्र स्वाभिमानी' चे खासदार राजू शेट्टी व आवाडे यांच्यात पहायला मिळाले. लोकसभेच्या दोन्हीही निवडणुकीत आवाडे गटाला श्री. शेट्टींनी धूळ चारली. पण अध्यक्ष निवडीतच नव्हे तर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत त्यांनी आवाडेंशी आघाडी केली. जिल्हा परिषदेत पाच वर्षे कॉंग्रेससोबत राहिलेले श्री. शेट्टी सत्तास्थापनेत मात्र आवाडे यांच्याबरोबर भाजपच्या मदतीला धावले. 

शाहुवाडीतील आमदार सत्यजित पाटील सरूडकर व श्री. कोरे यांच्यातील संघर्षही दहा वर्षापासूनचाच. दोनवेळा श्री. सरूडकर यांनी पराभूत करून श्री. कोरे यांच्यासोबत ते या निवडणुकीत एकत्र आले. "गोकूळ' च्या व जिल्ह्याच्या राजकारणात माजी आमदार संजय घाटगे यांचे "गॉडफादर' अशीच पी.एन. यांची ओळख होती, पण तेही
त्यांना सोडून महाडीकांकडे गेले. कॉंग्रेसचे आमदार सतेज पाटील व पी. एन. यांच्यातही फारसे सख्य नव्हते. "गोकूळ', विधानपरिषद निवडणुकीत या दोघांतही खटके उडाले होते, पण महाडीकांना शह देण्यासाठी सतेज यांनी पी. एन. यांचा आश्रय घेतला. त्यात त्यांना यश आले नसले तरी या घडामोडीत ते अग्रेसर राहिले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com