kolhapur news - Shetty-khot crisis | Sarkarnama

सदाभाऊंवर नवीन संघटना काढण्याचा कार्यकर्त्यांचा दबाव

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 5 जुलै 2017

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सर्वेसर्वा खासदार राजू शेट्टी व कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या वाटा वेगळ्या होण्याची शक्‍यता आहे. आपल्या समर्थकांना घेऊन श्री. खोत नवी संघटना काढण्याचा विचार करत असून 21 जुलै रोजी "स्वाभिमानी' च्या चौकशीला सामोरे गेल्यानंतर त्यांचा हा निर्णय होण्याची शक्‍यता आहे. 

कोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सर्वेसर्वा खासदार राजू शेट्टी व कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या वाटा वेगळ्या होण्याची शक्‍यता आहे. आपल्या समर्थकांना घेऊन श्री. खोत नवी संघटना काढण्याचा विचार करत असून 21 जुलै रोजी "स्वाभिमानी' च्या चौकशीला सामोरे गेल्यानंतर त्यांचा हा निर्णय होण्याची शक्‍यता आहे. 

वर्षभरापूर्वी या दोघांत मतभेद सुरू झाले. शेतकरी कर्जमाफी, श्री. शेट्टी यांची आत्मक्‍लेश यात्रा या काळात या दोघांतील मतभेदाची दरी रूंदावत गेली. अलिकडे तर या दोघांत विस्तवही जाणार नाही एवढे तणावाचे वातावरण निर्माण झाले. कर्जमाफीसाठी एप्रिल महिन्यात कोल्हापुरात जिल्हाधिकारी कार्यालयावर काढलेल्या मोर्चाचा अपवाद सोडला तर हे दोघेही अलिकडे समोरासमोरही आलेले नाहीत. वृत्तपत्र, मिडीयाबरोबरच सोशल मिडीयाच्या माध्यमातूनच त्यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहेत. श्री. खोत यांची मंत्रीपदानंतर भाजपाशी वाढलेली जवळीक श्री. शेट्टी यांना खुपत आहे, त्यातूनच त्यांनी संघटनेत रहावे की नाही हे ठरवावे असे उघड आवाहन श्री. शेट्टी यांनी केले आहे. 

दुसरीकडे राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर, "महासंग्राम' चे विनायक मेटे यांनी भाजपासोबत राहून आमदारकी मिळवली. श्री. जानकर यांनी तर मंत्री पद मिळवले. हे दोघेही कुठे निवडून आलेले नाहीत. पण आमदारकी नंतरही आपल्या पक्ष, संघटनांचे अस्तित्त्व त्यांनी कायम ठेवले आहे. श्री. खोत यांची मात्र "स्वाभिमानी'त असल्यामुळे कोंडी होत असल्याचे जाणवत आहे. त्यातूनच आपल्या कार्यकर्त्यांना घेऊन नवी संघटना काढण्याचा विचार त्यांच्या पातळीवर सुरू आहे. श्री. खोत यांनी नवी संघटना काढावी यासाठी कार्यकर्त्यांचाही वाढता दबाव आहे. 

भाजपाला पाठिंबा देताना केंद्रात आपल्याला मंत्रीपद मिळेल असे श्री. शेट्टी यांना वाटत होते. पण "नाकापेक्षा मोती जड नको' या म्हणीप्रमाणे भाजपानेही राज्यातच मंत्री पद व दोन महामंडळे संघटनेला देण्याचे निश्‍चित केले. केंद्रात काही मिळत नाही हे लक्षात आल्यानंतर श्री. शेट्टी यांनीही ही तडजोड नाईलाजाने का होईना स्विकारावी लागली. याचा प्रचंड राग श्री. शेट्टी यांना आहे. त्यामुळे थेट भाजपावर निशाणा न साधता त्यांनी श्री. खोत यांना "लक्ष्य' केले आहे. यातून या दोन प्रमुख नेत्यांच्या वाटा वेगवेगळ्या होण्याची शक्‍यता आहे. 

शेट्टींच्या पुर्वइतिहासावरही आक्षेप 
आज श्री. शेट्टी हे खोत यांच्यावर भाजपाच्या जवळ गेल्याचा आरोप करत असले तरी कोल्हापूर जिल्हा परिषदेत ते भाजपासोबत आहेत. यापुर्वीची पाच वर्षे त्यांनी कॉंग्रेससोबत जिल्हा परिषदेत सत्ता भोगली, महत्त्वाचे पद घेतले. ज्या स्वामिनाथन आयोगाची श्री. शेट्टी मागणी करतात तो कॉंग्रेस आघाडीने स्विकारला नाही, त्यावेळीही श्री. शेट्टी कॉंग्रेसबरोबरच नांदत होते. श्री. शेट्टी यांच्या दुटप्पी भुमिकेवरही श्री. खोत यांच्या कार्यकर्त्यांचा आक्षेप आहे. त्यातूनच कार्यकर्त्यांनीही श्री. खोत यांच्यावर वेगळ्या संघटनेसाठी दबाव टाकल्याची चर्चा आहे. 

संबंधित लेख