Kolhapur - NCP-Congress-KMC-by-election | Sarkarnama

कोल्हापुरात दोन्ही कॉंग्रेसला "दुभत्या गायीच्या लाथा गोड' 

सरकारनामा ब्युरो
रविवार, 24 सप्टेंबर 2017

"दुभत्या गायीच्या लाथा गोड' अशीच काहीशी अवस्था महापालिकेचे राजकारण करणाऱ्या दोन्ही कॉंग्रेसच्या नेत्यांची झाली आहे. ताराबाई पार्क प्रभागाच्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष राजेश लाटकर यांना दिलेली उमेदवारी हे त्याचे उदाहरण आहे. महापालिका असो किंवा जिल्हा बॅंक, तिथे काही ठराविक जणांना संधी दिल्याशिवाय या नेत्यांचे राजकारणच चालत नाही, असा एक संदेशच या निमित्ताने जात आहे. 

कोल्हापूर : "दुभत्या गायीच्या लाथा गोड' अशीच काहीशी अवस्था महापालिकेचे राजकारण करणाऱ्या दोन्ही कॉंग्रेसच्या नेत्यांची झाली आहे. ताराबाई पार्क प्रभागाच्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष राजेश लाटकर यांना दिलेली उमेदवारी हे त्याचे उदाहरण आहे. महापालिका असो किंवा जिल्हा बॅंक, तिथे काही ठराविक जणांना संधी दिल्याशिवाय या नेत्यांचे राजकारणच चालत नाही, असा एक संदेशच या निमित्ताने जात आहे. 

सध्या महापालिकेच्या एका जागेची पोटनिवडणूक सुरू आहे. ताराबाई पार्क प्रभागाचे भारतीय जनता पक्ष-ताराराणी आघाडीचे तत्कालीन नगरसेवक नीलेश देसाई यांचा जातीचा दाखला अवैध ठरल्याने ही पोटनिवडणूक सुरू आहे. या प्रभागात 2015 च्या निवडणुकीत कॉंग्रेस उमेदवाराला दुसऱ्या क्रमांकाची मते पडली आहेत. या मुद्यावर दोन्ही कॉंग्रेसने आघाडी करून श्री. लाटकर यांची उमेदवारी जाहीर केली आहे. 

श्री. लाटकर यांचे घर शाहू महाविद्यालय परिसरात आहे. 2015 ची निवडणूक त्यांनी शिवाजी पार्क प्रभागातून लढवली आहे. त्यांच्या मूळ सदर बाजार प्रभागातून त्यांच्या पत्नी सूरमंजिरी विजयी झाल्या आहेत. पण, तरीही श्री. लाटकर यांना या प्रभागात त्यांचा काहीही संबंध नसताना उमेदवारी दिली आहे. महापालिकेच्या राजकारणात श्री. लाटकर हवेतच, असाच संदेश यातून नेत्यांनी दिला आहे. 

अशीच परिस्थिती महापालिकेचे स्वीकृत नगरसेवक प्रा. जयंत पाटील यांच्या बाबतीत आहे. जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत त्यांचा चार मतांनी पराभव होऊनही त्यांना बॅंकेत स्वीकृत म्हणून घेण्यात आले. यावर जोरदार टीका झाल्यानंतर त्यांचा राजीनामा घेण्यात आला. पण, महापालिकेतील त्यांचे स्थान आजही भक्कम आहे. महापालिकेत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कोट्यातून त्यांना स्वीकृत म्हणून घेण्यात आले, त्या वेळी निष्ठावंत अनेक जण यासाठी प्रयत्नशील होते. पण, नेत्यांच्या निर्णयासमोर त्यांचे काही चालले नाही. कॉंग्रेस नेतृत्वानेही चांगल्या कार्यकर्त्याला डावलून आपल्या जवळच्या व्यक्तीला महापालिकेत घेण्याचा प्रयत्न केला; पण पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांपुढे त्यांना जाता आले नाही. त्यामुळे तौफीक मुल्लाणीसारख्या कार्यकर्त्याला महापालिकेत जाण्याची संधी मिळाली. 

फायदा मिळवून देणारी व्यक्तिमत्त्वे 
ही दोन प्रातिनिधिक उदाहरणे आहेत. पण, ज्यावेळी मोक्‍याच्या ठिकाणावर नियुक्तीची वेळ येते, त्यावेळी निष्ठावंत बाजूला आणि जवळच्या कार्यकर्त्याला संधी असे चित्र पाहायला मिळते. प्रा. पाटील किंवा श्री. लाटकर म्हणजे नेत्यांच्या दृष्टीने फायदा मिळवून देणारी व्यक्तिमत्त्वे असतील. मग तो फायदा राजकीय असेल किंवा अन्य असेल. म्हणूनच ते सांगतील त्याप्रमाणे नेत्यांनाही ऐकून घ्यावे लागते, हे या पोटनिवडणुकीतील उमेदवारीवरून स्पष्ट झाले आहे. 

संबंधित लेख