kolhapur mp election | Sarkarnama

लोकसभेसाठी कोल्हापुरातून कॉंग्रेसचे पी. एन. पाटील, संजय मंडलिक यांच्याबद्दलही चर्चा

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 16 नोव्हेंबर 2018

कोल्हापूर : पक्षाने आदेश दिल्यास लोकसभेच्या कोल्हापूर मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची तयारी असल्याचे माजी आमदार व जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील यांनी आज स्पष्ट केले. आमदार सतेज पाटील यांचेही नाव होते; मात्र त्यांनी नकार दिला आहे. मुंबईत टिळक भवनमध्ये आज कॉग्रेसच्या प्रमुख नेत्यांची बैठक झाली. त्यात कोल्हापूर मतदारसंघ कॉंग्रेसकडे घ्यावा, असाही आग्रह जिल्ह्यातील सर्वच नेत्यांनी धरला. 

कोल्हापूर : पक्षाने आदेश दिल्यास लोकसभेच्या कोल्हापूर मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची तयारी असल्याचे माजी आमदार व जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील यांनी आज स्पष्ट केले. आमदार सतेज पाटील यांचेही नाव होते; मात्र त्यांनी नकार दिला आहे. मुंबईत टिळक भवनमध्ये आज कॉग्रेसच्या प्रमुख नेत्यांची बैठक झाली. त्यात कोल्हापूर मतदारसंघ कॉंग्रेसकडे घ्यावा, असाही आग्रह जिल्ह्यातील सर्वच नेत्यांनी धरला. 

लोकसभेला आघाडी करताना कोणती जागा आपल्याकडे घ्यायची, यासाठी सायंकाळी बैठक झाली. बैठकीत कोल्हापूरसह पुणे, सांगली आणि साताऱ्यातील कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांशी स्वतंत्र चर्चा करण्यात आली. त्यासाठी जिल्ह्यातील कॉंग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते. सव्वाचारच्या सुमारास बैठकीस सुरुवात झाली. खासदार अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, ऑल इंडिया कॉंग्रेसचे आशिष बुवा, बी. एन. सनदी यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक झाली. 

बैठकीत सध्या राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे असलेली कोल्हापूर लोकसभेची जागा कॉंग्रेसकडे घ्यावी, पक्ष देईल तो उमेदवार निवडून आणण्याची जबाबदारी घेऊ, अशी भूमिका सर्वच पदाधिकाऱ्यांनी घेतली. तेव्हा उमेदवार कोण असेल, अशी विचारणा खासदार चव्हाण यांनी केली तेव्हा सध्या शिवसेनेत असलेले प्रा. संजय मंडलिक यांना आपल्याकडे घेऊन त्यांना उमेदवारी देऊ असे सांगण्यात आले. याच वेळी त्यांना आपल्या पक्षात आणण्याची जबाबदारी काही नेत्यांनी घेतली. खासदार चव्हाण यांनी ते आले नाही तर उमेदवार कोण असणार, अशी विचारणा केल्यावर आमदार सतेज पाटील आणि पी. एन. पाटील यांचे नाव पुढे आले. तेव्हा सतेज पाटील यांनी नकार दिला. पी. एन. पाटील यांचे नाव पुढे आले. पक्षाने आदेश दिल्यास मी निवडणूक लढवेन, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

तेव्हा पी. एन. पाटील लोकसभेवर गेल्यास त्यांच्या करवीर विधानसभा मतदारसंघातून राहुल पाटील यांचे नाव पुढे चर्चेत आले. गेली वीस वर्षे हा मतदारसंघ आपल्याकडे नाही. तो आपल्या हक्काचा आहे. सध्या तो राष्ट्रवादीकडे आहे. मात्र त्यांच्याच पक्षातून खासदारांना विरोध आहे. त्यामुळे आघाडी झाल्यास त्या जागेचा फायदा होईल, असे वाटत नसल्याचेही प्रमुखांनी स्पष्ट केले. एकंदरीत सर्वांनीच कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ कॉंग्रेसकडे घ्यावा, अशी जोरदार मागणी केली. 

दरम्यान पी. एन. पाटील यांच्याशी संपर्क साधल्यावर त्यांनी पक्षाने आदेश दिल्यास लोकसभा लढविणार असल्याचे "सकाळ'शी बोलताना सांगितले. आमदार सतेज पाटील यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. बैठकीस शहराध्यक्ष प्रल्हाद चव्हाण, माजी मंत्री प्रकाश आवाडे, महिला जिल्हाध्यक्ष सुप्रिया साळोखे, माजी खासदार जयवंतराव आवळे, दिनकरराव जाधव, प्रदेश सचिव नगरसेवक तौफिक मुल्लाणी आणि प्रकाश सातपुते, राजू आवळे, सत्यजित जाधव, संजय पाटील, पार्थ मुंडे, दीपक थोरात, दुर्वास कदम यांच्यासह कॉंग्रेसचे इतर प्रमुख उपस्थित होते. 

संजय मंडलिक यांच्यासाठीही आग्रह 
प्रा. संजय मंडलिक यांना कॉंग्रेसमध्ये घेऊन त्यांना कोल्हापूरची उमेदवारी देण्याबाबत या बैठकीत चर्चा झाली. दिवंगत माजी खासदार सदाशिवराव मंडलिक राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसमध्ये होते. त्यामुळे त्यांच्या चिरंजीवाला पुन्हा कॉंग्रेसमध्ये आणून निवडून आणण्याची जबाबदारी जिल्ह्यातील सर्वच नेत्यांनी या बैठकीत घेतल्याचे सांगण्यात आले. ते कॉंग्रेसमध्ये आलेच नाहीत तर पी. एन. पाटील यांना उमेदवारी देण्याबाबत चर्चा झाली. 
 

संबंधित लेख