`कोल्हापूर उत्तर'मधून ऋतुराज, की मधुरिमाराजे? 

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी कोल्हापूर उत्तरमधून शिवसेनेचे विद्यमान आमदार राजेश क्षीरसागर यांच्याविरोधात कॉंग्रेसचे आमदार सतेज पाटील यांचे पुतणे ऋतुराज पाटील रिंगणात उतरणार की माजी आमदार मालोजीराजे छत्रपती यांच्या पत्नी सौ. मुधरिमाराजे उतरणार याची चर्चा सुरू आहे. भाजपाकडून या दोघांसाठी प्रयत्न सुरू असल्याची चर्चा असली तरी त्यातही पहिली पसंदी ही सौ. मधुरिमाराजे यांच्यासाठीच असेल.
`कोल्हापूर उत्तर'मधून ऋतुराज, की मधुरिमाराजे? 

कोल्हापूर : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी कोल्हापूर उत्तरमधून शिवसेनेचे विद्यमान आमदार राजेश क्षीरसागर यांच्याविरोधात कॉंग्रेसचे आमदार सतेज पाटील यांचे पुतणे ऋतुराज पाटील रिंगणात उतरणार की माजी आमदार मालोजीराजे छत्रपती यांच्या पत्नी सौ. मुधरिमाराजे उतरणार याची चर्चा सुरू आहे. भाजपाकडून या दोघांसाठी प्रयत्न सुरू असल्याची चर्चा असली तरी त्यातही पहिली पसंदी ही सौ. मधुरिमाराजे यांच्यासाठीच असेल. 

सलग दोनवेळा शहराचे मैदान मारलेलेल्या श्री. क्षीरसागर यांचा दोन्ही वेळचा विजय हा कसबा बावडा या आमदार सतेज पाटील यांचे प्राबल्य असलेल्या गावामुळे झाला आहे. 2009 मध्ये त्यांनी कॉंग्रेसचे तत्कालिन आमदार मालोजीराजे छत्रपती यांचा अवघ्या 3687 मतांनी पराभव केला. या पराभवानंतर मालोजीराजे राजकारणापासूनच दूर झाले. त्याचवर्षी आमदार सतेज पाटील यांनी ही निवडणूक कोल्हापूर दक्षिणमधून लढवली. त्यावेळी त्यांच्याविरोधात होते आताचे खासदार धनंजय महाडीक. 2014 मध्ये या मतदारसंघात कॉंग्रेसची उमेदवारी नगरसेवक सत्यजित कदम यांना देण्यात आली. पण त्याचवेळी आमदार सतेज पाटील व माजी आमदार महादेवराव महाडीक यांच्यात तीव्र मतभेद सुरू झाले होते. श्री. कदम हे महाडीक यांचे जवळचे नातेवाईक तर सतेज पाटील यांच्याविरोधात 2009 मध्ये महाडीक यांचे पुतणे आताचे खासदार धनंजय महाडीक रिंगणात उतरले होते. त्यातून पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी पुन्हा क्षीरसागर यांनाच मदत केल्याने ते दुसऱ्यांदा आमदार झाले. 

2019 मध्ये पाटील यांचे पुतणे ऋतुराज पाटील यांनीच तयारी सुरू केल्याचे दिसून येते. अलीकडे शहरातील इतर भागात त्यांचा वाढता संपर्क, शिवजयंतीसह इतर कार्यक्रमांना मंडळांना त्यांच्याकडून पुरवली जाणारी अर्थिक रसद आणि कसबा बावड्यासारखा एक गठ्ठा मतदानाचा परिसर मागे असल्याने तेच "उत्तर' मधून शड्डू ठोकतील अशी शक्‍यता आहे. सतेज पाटील यांचे घराणे कॉंग्रेसला मानणारे, त्यात या मतदारसंघात कॉंग्रेसकडे प्रबळ असा उमेदवार नाही, त्यामुळे ऋतुराज यांची उमेदवारीसाठी पहिली पसंती ही कॉंग्रेसलाच असेल पण भाजपानेही त्यांच्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. समजलेल्या माहितीनुसार माजी आमदार महादेवराव महाडीक यांचा याला विरोध असल्याने ही घडामोड पुढे सरकलेली नाही. 

दुसरीकडे भाजपाची उमेदवारी माजी आमदार मालोजीराजे छत्रपती यांच्या पत्नी सौ. मधुरिमाराजे यांनी घ्यावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत. सौ. मधुरिमाराजे ह्या राज्यसभेचे खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या भावजय आहेत ही भाजपाच्यादृष्टीने जमेची बाजू आहे. त्यातूनच त्यांचे नांव भाजपाच्या यादीत आघाडीवर आहे. कॉंग्रेसकडूनही काहीजण त्यांच्या उमेदवारीसाठी प्रयत्नशील आहेत. 2014 मध्येही सौ. मधुरिमाराजे यांच्याविषयी अशीच चर्चा रंगली होती, पण घरातूनच त्यांच्या उमेदवारीला विरोध झाल्याने पुढे काही झाले नाही. 

लहानपणापासूनच घरातच राजकारणाचे बाळकडू मिळालेल्या सौ. मधुरिमाराजे ह्या माजी आरोग्यमंत्री कै. दिग्विजय खानविलकर यांच्या कन्या आहेत. कै. खानविलकर यांच्या निधनानंतर काही प्रमुख कार्यकर्त्यांनी आपल्या गटाचे अस्तित्त्व कायम ठेवले आहे. सौ. मधुरिमाराजे रिंगणात असतील तर हा गट त्यांच्या प्रचारात सक्रिय राहील. त्यांना घरातून लढण्याची परवानगी मिळणार का ? यावरच हे सर्व अवलंबून आहे. सद्यस्थितीत आमदार क्षीरसागर यांच्या विरोधात ऋतुराज की सौ. मधुरिमाराजे या चर्चेला मात्र सुरूवात झाली आहे. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com