kolhapur meyor resigns on 23 nov | Sarkarnama

कोल्हापूरच्या महापौर राजीनामा देणार 

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 14 नोव्हेंबर 2018

नेते सांगतील त्यावेळी राजीनामा दिला जाईल, असे बोंद्रे यांनी स्पष्ट केले आहे.

कोल्हापूर : महापौर शोभा बोंद्रे यांचा राजीनामा निश्‍चित झाला असून, 23 नोव्हेंबरच्या विशेष सर्वसाधारण सभेत त्या आपला राजीनामा देण्याची देणार आहेत. 19 नोव्हेंबरला महिन्याची सर्वसाधारण सभा नियमितपणे होईल. 

नव्या वर्षातील महापौर पद राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वाट्याला आले आहे. वर्षासाठी पद असेल. इच्छुकांच्या यादीत मेघा पाटील यांची भर पडली असून, ऍड. सूरमंजिरी लाटकर, सरिता मोरे, अनुराधा खेडकर, माधवी गवंडी याही इच्छुक आहेत. कुणाचीच नाराजी ओढवून घेऊ नये, यासाठी राष्ट्रवादीचे नेते, आमदार हसन मुश्रीफ सहा महिन्यांचा फॉर्म्युला निश्‍चित करण्याची शक्‍यता आहे. मोरे आणि लाटकर यांच्या पदासाठी चुरस आहे. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांची सून मेघा पाटील यांचा स्थायी समिती सभापतीवेळी पराभव झाला होता. राष्ट्रवादीचे नगरसेवक अजिंक्‍य चव्हाण आणि अफजल पिरजादे यांनी भाजप उमेदवाराला मतदान केल्याने पाटील यांचा पराभव झाला होता. हा पराभव ए. वाय. पाटील यांच्या जिव्हारी लागला. लाटकर, मोरे आणि पाटील पैकी एक नाव निश्‍चित करताना मुश्रीफ यांची कसरत होणार आहे. 

प्रत्येक महापौर निवडीवेळी शिवसेना सदस्यांना बदनाम केले जात असल्याने हे सदस्य कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या पाठीशी राहतील, असे सध्याचे चित्र आहे. गेल्यावेळी महापौर निवडीवेळी चार जण तटस्थ राहिले होते. नेते सांगतील त्यावेळी राजीनामा दिला जाईल, असे बोंद्रे यांनी स्पष्ट केल्याने त्या राजीनामा देतील की नाही, याबाबतची उत्सुकता संपुष्टात आली आहे. महापौर तसेच उपमहापौर महेश सावंत यांचाही एकाचवेळी राजीनामा होईल.  

संबंधित लेख