नरके- पी. एन. यांच्यातच लढाई; हॅटट्रीक होणार की हुकणार? 

करवीर विधानसभा मतदार संघात सलग दोनवेळा शिवसेनेचे आमदार चंद्रदीप नरके यांनी विजय मिळवला. या दोन्हीही निवडणुकीत त्यांनी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील यांना पराभूत केले. 2014 मध्ये तर श्री. पाटील अवघ्या 679 मतांनी पराभूत झाले. आता 2019 मध्ये श्री. नरके विजयाची हॅटट्रीक करणार की पी. एन. त्यांची ही हॅटट्रीक हुकविणार, याविषयी उत्सुकता आहे.
नरके- पी. एन. यांच्यातच लढाई; हॅटट्रीक होणार की हुकणार? 

कोल्हापूर : करवीर विधानसभा मतदार संघात सलग दोनवेळा शिवसेनेचे आमदार चंद्रदीप नरके यांनी विजय मिळवला. या दोन्हीही निवडणुकीत त्यांनी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील यांना पराभूत केले. 2014 मध्ये तर श्री. पाटील अवघ्या 679 मतांनी पराभूत झाले. आता 2019 मध्ये श्री. नरके विजयाची हॅटट्रीक करणार की पी. एन. त्यांची ही हॅटट्रीक हुकविणार, याविषयी उत्सुकता आहे. 

2014 ची लोकसभा दोन्ही कॉंग्रेसने एकत्रित लढवली पण विधानसभेला दोन्ही कॉंग्रेससह भाजपा, सेना हे पक्षही स्वबळावर लढले. कॉंग्रेसची उमेदवारी अपेक्षेप्रमाणे पी. एन. यांना मिळाली, किंबहुना तेच या उमेदवारीचे प्रमुख दावेदार होते. सेनेकडून पुन्हा विद्यमान आमदार नरके, माजी आमदार संपतबापू पवार हे शेकापकडून व पिंटू सुर्यवंशी यांनी "जनुसुराज्य' कडून रिंगणात उडी घेतली. दोन माजी आमदार व एक विद्यमान यांच्यात खरी लढत झाली ती पी. एन. विरूध्द नरके यांच्यातच. या मतदार संघात राष्ट्रवादीकडे प्रबळ उमेदवार त्यावेळी नव्हता, आजही तो नाही. पण ऐनवेळी राष्ट्रवादीच्या लोकांनी पी. एन. यांच्याऐवजी नरके यांना मदत केल्याचा आरोप त्यावेळी झाला. 

गेल्या निवडणुकीत पी. एन. अवघ्या 679 मतांनी पराभूत झाले. या पराभवात कॉंग्रेसच्या गटबाजीचा परिणाम आहे. गगनबावडा या कॉंग्रेसच्या बालेकिल्ला असलेल्या तालुक्‍यातच पी. एन. पिछाडीवर राहीले. जुन्या करवीरमध्ये त्यांच्यावर असलेले सुमारे 20 हजाराचे मताधिक्क त्यांनी जुन्या सांगरूळ मतदार संघातील स्वतःच्या बालेकिल्ल्यात तोडले पण त्यांचा पराभव हा गगनबावडा तालुक्‍याने केला. विधानसभेपुर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत पी. एन. यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार खासदार धनंजय महाडीक यांना प्रामाणिकपणे मदत केली, त्यामुळेच या मतदार संघात श्री. महाडीक यांना तब्बल 40 हजारापेक्षा जास्त मताधिक्‍य मिळाले, पण त्याच राष्ट्रवादीने विधानसभेत मात्र पी. एन. यांना साथ न दिल्याचे निकालावरून स्पष्ट झाले. 

2019 ला पुन्हा नरके-पी. एन. यांच्यातच लढाई निश्‍चित आहे. शेकापचे म्हणून संपतबापू रिंगणात असणारच. गेल्या निवडणुकीत "जनसुराज्य' चे सुर्यवंशी यांनी नंतर कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला, सद्या ते पी. एन. यांचे खंदे कार्यकर्ते म्हणून काम करतात. आता सुर्यवंशी यांच्याऐवजी अजून तरी राष्ट्रवादीतच असलेले प्रदीप पाटील-भुयेकर हे "जनसुराज्य' चा "नारळ' हातात घेण्याची चिन्हे आहेत. "गोकुळ' मधील महाडीक-पी. एन. यांची जिवलग मैत्री व त्याचवेळी आमदार नरके यांचे चुलते व "गोकुळ' चे संचालक अरूण नरके यांचे महाडीक यांच्याशी निर्माण झालेले मतभेद याचे पडसाद यावेळी उमटणार आहेत. तसेही "गोकुळ' मध्ये पी. एन. यांचे नेतृत्त्व मानणारे अरूण नरके हे दोन्ही निवडणुकीत त्यांच्या उघडपणे उलटेच होते. राष्ट्रवादीच्या नेत्यांसह श्री. महाडीक यांच्याकडूनही अलिकडे पी. एन. यांच्याविषयी सहानुभुतीची चर्चा ऐकायला मिळते, त्यातून त्यांची प्रत्यक्ष मदत पी. एन. यांना झाली तर ते श्री. नरके यांची विजयाची हॅटट्रीक थोपवू शकतात. दुसरीकडे सामान्य माणसांत राज्य सरकारविरोधात नाराजी आहे, श्री. नरके हे सत्ताधारी पक्षाचे आहेत, त्याचा फटका त्यांना बसू शकतो. पी. एन. यांनीही मतदार संघात जुळवाजुळव करण्यास सुरूवात केली आहे. एक मुलगा जिल्हा परिषद सदस्य असल्याने तरूणांची फळी सांभाळण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे. त्यामुळे या मतदार संघात "हॅटट्रीक' कोणाची हाच चर्चेचा विषय आहे. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com