Kolhapur-Kagal news - Samarjitsingh-Ghatage-Suresh-Halvankar | Sarkarnama

कागल राजकारण : समरजितसिंहांच्या वाटेत आमदार हाळवणकरांचा खोडा 

निवास चौगले 
बुधवार, 16 ऑगस्ट 2017

विधानसभेची प्रत्येक निवडणूक माजी आमदार संजय घाटगे यांनी वेगवेगळ्या पक्षातून लढवली. आता हेच घाटगे पुन्हा आमदार व्हावेत, ही कागलची लोकभावना असल्याचे सांगत भाजपाचे इचलकरंजीतील आमदार सुरेश हाळवणकर यांनी याच तालुक्‍यातील भाजपात प्रवेश केलेले व विधानसभा डोळ्यासमोर ठेवून काम सुरू केलेल्या "म्हाडा'चे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांच्या वाटेतच खोडा घातल्याचे बोलले जाते. 

कोल्हापूर : विधानसभेची प्रत्येक निवडणूक माजी आमदार संजय घाटगे यांनी वेगवेगळ्या पक्षातून लढवली. आता हेच घाटगे पुन्हा आमदार व्हावेत, ही कागलची लोकभावना असल्याचे सांगत भाजपाचे इचलकरंजीतील आमदार सुरेश हाळवणकर यांनी याच तालुक्‍यातील भाजपात प्रवेश केलेले व विधानसभा डोळ्यासमोर ठेवून काम सुरू केलेल्या "म्हाडा'चे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांच्या वाटेतच खोडा घातल्याचे बोलले जाते. 

कागल तालुक्‍यात संजयबाबा यांनी "अन्नपूर्णा' नावाने नवा खाजगी साखर कारखाना काढला आहे. या कारखान्याचे भुमीपूजन मंगळवारी (ता.13) आमदार हाळवणकर यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमात श्री. हाळवणकर यांनी संजयबाबा हे पुन्हा आमदार व्हावेत ही लोकभावना असल्याचे सांगितले. पक्षापेक्षा गटातटाच्या राजकारणाला या तालुक्‍यात महत्त्व आहे. सध्या राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ हे या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करतात. तालुक्‍यातील चार गट चार दिशेला असल्याने त्यांचा विजयरथ रोखण्यात अजून कोणाला यश आलेले नाही. सलग चारवेळा ते आमदार झाले ते गटातटातील राजकीय बेरीज-वजाबाकीमुळेच. 
श्री. मुश्रीफ यांच्या प्रत्येक निवडणुकीत "शाहू-कागल'चे संस्थापक कै. विक्रमसिंहराजे घाटगे यांची भुमिका महत्त्वाची ठरली आहे. संजयबाबा व कै. विक्रमसिंहराजे गटांत विळ्याभोपळ्याचे वैर आहे. त्यातून प्रत्येक निवडणुकीत राजे गटाची ताकद श्री. मुश्रीफ यांच्याच मागे राहीली. मंडलिक, मुश्रीफ, राजे व संजयबाबा असे चार गट या तालुक्‍यात कार्यरत आहेत. 

आगामी विधानसभेची रणनिती थोडी बदलणार आहे. कारण, कै. विक्रमसिंहराजे यांचे पुत्र व "शाहू-कागल' चे अध्यक्ष समरजितसिंह यांनी भाजपात प्रवेश केला आहे. पक्षाने ते छत्रपती घराण्यातील असल्याचा मान राखत त्यांना पुणे म्हाडाच्या अध्यक्षपदी निवड केली आहे. या पदापेक्षा आता समरजितसिंह यांनाही विधानसभेचेच वेध लागले आहेत. आपल्या गटाच्या ताकदीवर श्री. मुश्रीफ चारवेळा आमदार होत असतील तर ही ताकद घेऊन आपण का लढू नये ? असा प्रश्‍न त्यांच्यासमोर आहे. त्यादृष्टीनेच त्यांनी तयारी सुरू केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भव्य शेतकरी मेळावा घेऊन त्यांनी एक झलक दाखवलीच आहे. कारखान्यासह त्यांच्या नेतृत्त्वाखाली कार्यरत संस्थांचा पारदर्शी आणि भ्रष्टाचारमुक्त कारभार ही त्यांची जमेची बाजू आहे. 

कागलमध्ये भाजपाचे विधानसभेचे संभाव्य उमेदवार हे समरजितसिंहच असतील असे वाटत असतानाच ज्यांची राजकीय कारकिर्दच भाजपात सुरू झाली अशा श्री. हाळवणकर यांनी संजयबाबा हे आमदार व्हावेत ही लोकभावना असल्याचे सांगून एकच खळबळ उडवून दिली आहे. श्री. हाळवणकर यांच्या या वक्तव्यामागे दोन शक्‍यता आहेत. या तालुक्‍यात कोणतेही दोन गट एकत्र आल्याशिवाय श्री. मुश्रीफ यांचा पराभव अटळ आहे. मंडलिक-मुश्रीफ गट सध्या एकत्र आहेत, पण त्यांच्यात विधानसभा, लोकसभेची वाटणी झाली आहे. संजयबाबा यांना भाजपात घेऊन अडकवून ठेवायचे ही एक शक्‍यता असावी. यानिमित्ताने दोन गट एकत्र करून मुश्रीफ यांना अडचणीत आणणे ही दुसरी शक्‍यता आहे. संजयबाबा यांनी विधानसभेच्या उमेदवारीची अट घातली तर फक्त "शब्द' द्यायचा पण उमेदवारी समरजितसिंह यांना द्यायची. नंतर संजयबाबा यांना विधान परिषदेत संधी द्यायची अशीही राजकीय खेळी यामागे असू शकते. 

संजयबाबांचा राजकीय प्रवास 
1990-जनता दल, 1998-शिवसेना (त्यावेळी आमदार), 1999-कॉंग्रेस, 2004-पुन्हा शिवसेना, 2009-स्वाभिमानी शेतकरी संघटना, 2014-शिवसेना, 2019- कमळ, कि धनुष्यबाण ? 
 

संबंधित लेख