Kolhapur Ganeshotstav Chandrakant Patil Dolby | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

विनोद तावडे कृष्णकुंजवर . राज ठाकरे आणि विनोद तावडे यांच्यात चर्चा .

कोल्हापूरातील डॉल्बीमुक्त मिरवणूक महाराष्ट्रात इतिहास घडवेल पालकमंत्री चंद्रकांत पाटील

सुनील पाटील
मंगळवार, 5 सप्टेंबर 2017

डॉल्बीला फाटा देवून पारंपारित वाद्याचा मनमुराद आनंद घेतल्याबद्दल समस्त कोल्हापुरकरांचे विशेषत: मंडळांचे आणि गणेश भक्तांचे त्यांनी आभार मानावे तेवढे थोडे आहेत. गेल्या बारा दिवसांपासून संपूर्ण जिल्ह्यात गणेशोत्सव शांततेत आणि उत्साहात तसेच डॉल्बीमुक्त साजरा केला हिच परंपरा विसर्जन मिरवणुकीतही जोपासून डॉल्बीमुक्त विसर्जन मिरवणुकीतून कोल्हापूर महाराष्ट्रात इतिहास घडवेल - चंद्रकांत पाटील

पारंपारिक वाद्यांसह मिरवणूक सुरू

कोल्हापूर : कोल्हापूरातील डॉल्बीमुक्त गणेश विसर्जन मिरवणूक ही महाराष्ट्रात इतिहास घडवेल, असा विश्‍वास महसूल व कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज व्यक्त केला. कोल्हापूरच्या प्रथम मानाचा गणपती श्री तुकाराम माळी तालीम मंडळाच्या श्रींच्या पालखीचे पुजन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. श्री. पाटील यांनी ढोल-ताशा वाजवून मिरवणुकीला प्रारंभ केला.

दरम्यान दुपारी 2 पर्यंत 150 मुर्तींचे विसर्जन करण्यात आले. यावेळी पत्रकारांशी बोलताना पालकमंत्री पाटील म्हणाले, ''कोल्हापूरातील डॉल्बीमुक्त मिरवणुक महाराष्ट्रात इतिहास घडवेल. यंदाचा गणेशोत्सव पर्यावरण पुरक आणि डॉल्बीमुक्त गणेशोत्सव साजरा करण्यात गणेश मंडळानी घेतलेल्या पुढाकाराबद्दल समाधान आहे. डॉल्बीला फाटा देवून पारंपारित वाद्याचा मनमुराद आनंद घेतल्याबद्दल समस्त कोल्हापुरकरांचे विशेषत: मंडळांचे आणि गणेश भक्तांचे त्यांनी आभार मानावे तेवढे थोडे आहेत. गेल्या बारा दिवसांपासून संपूर्ण जिल्ह्यात गणेशोत्सव शांततेत आणि उत्साहात तसेच डॉल्बीमुक्त साजरा केला हिच परंपरा विसर्जन मिरवणुकीतही जोपासून डॉल्बीमुक्त विसर्जन मिरवणुकीतून कोल्हापूर महाराष्ट्रात इतिहास घडवेल.''

गणेशमंडळांनी आणि नागरिकांनी गणेशोत्सव उत्साहात आणि शांततेत पार पाडून प्रशासनास केलेल्या सहकार्यबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. कोल्हापूर कोकण रेल्वेबाबत ते म्हणाले, हा रेल्वे मार्ग जोडण्याच्या कामास गती आली असून या कामाचा सर्व्हे पूर्ण झाला आहे. आवश्‍यक निधी उपलब्ध झाला असून येत्या एक दोन महिन्यात काम सुरु होईल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. पर्यावरणपूरक आणि डॉल्बीमुक्त गणेशोत्सव साजरा करण्यात पुढाकार घेतल्याबदल पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापुरच्या प्रथम मानाचा गणपती श्री तुकाराम माळी तालीम मंडळाचे तसेच शहर आणि जिल्ह्यातील सर्व मंडळांचे आभार मानले.

यावेळी महापौर हसिना फरास, आमदार सतेज पाटील, जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार, पोलीस अधिक्षक संजय मोहिते, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमणार, महापालिका आयुक्त डॉ. अभिजित चौधरी, अतिरिक्त पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा, निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे, प्रांताधिकारी सचिन इथापे, पोलीस उपअधिक्षक डॉ. प्रशांत अमृतकर, सुरज गुरव, तहसिलदार उत्तम दिघे, संदिप चौगुले, स्वप्नील पाटील, ऍड. धनजंय पठाडे, आर. के. पोवार, विजय देवणे, उदय गायकवाड, दिलीप देसाई उपस्थित होते.

 

 

संबंधित लेख