kolhapur corporation | Sarkarnama

"महालक्ष्मीची शपथ... सांगा दारु दुकानांसाठी कुणी किती घेतले ?' 

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 20 जून 2017

राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसने काल रस्ते हस्तांतरणाचा ठराव मंजूर करू नये असे निवेदन दिले होते. शिवसेनेच्या दुर्गेश लिंग्रस यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांनी अशीच भुमिका घेतली होती. आज राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या सदस्यांनी ठरावाच्या बाजूने मतदान केले. 
 

कोल्हापूर :  दारू दुकानांच्या ठरावावरून महापालिका सभेत अक्षरशः मंगळवारी रणकंदन माजले. ठरावासाठी दोन कोटींची सुुपारी फुटल्याचा गंभीर आरोप सुनील कदम यांनी केला. तर ज्यांची दारू दुकाने सुरू आहेत त्यांची सुपारी विरोधी आघाडीने घेतल्याचा आरोप कॉंग्रेस गटनेता शारंगधर देशमुख यांनी केला. मानदंड पळविण्याचा प्रकार, प्रचंड गदारोळ, गोंधळ, कानठळ्या बसविणारा आवाजात रस्ते हस्तांतरणाचा ठराव 47 विरोधी 32 मतांनी मंजूर झाला. 

कुणी सुपारी घेतली आणि कुणी नाही याची शहानिशा करण्यासाठी थेट महालक्ष्मीची शपथ घेण्याचे आव्हान विरोधी आघाडीच्या सदस्यांनी दिले. केवळ लाख रूपयात बाटली उभी राहिली. लाख नव्हे पन्नास हजारात अरेरे काही ही स्थिती, अशा मस्करीही विरोधी आघाडीने सत्तारूढ सदस्यांची केली. राष्ट्रीय महामार्ग आणि राज्य महामार्गाचा हस्तातंरणाचा विषय न्यायप्रविष्ट बाब आहे. आयआरबीचा गुंता अद्याप सुटलेला नाही. त्यामुळे ठराव मतदानासाठी घेताच कसा, अशी विचारणा करत भाजप ताराराणी आघाडीच्या सदस्यांनी सभागृह डोक्‍यावर घेतले. 

सत्तारूढ कॉंग्रेस राष्ट्रवादीचे सदस्य आणि विरोधी आघाडीत हातघाई झाली. सभाध्यक्षा महापौर हसीना फरास यांच्या समोरील राजदंड पळविण्याचा प्रयत्न विलास वास्कर यांच्यासह अन्य सदस्यांनी केला. यावेळी सभागृहात इतका गोंधळ झाला की महापौर या प्रकाराने भांबावून गेल्या. जोर जबरदस्तीने मानदंडाला हात घातल्याने कॉंग्रेस राष्ट्रवादीच्या सदस्यांसह महिला सदस्याही चांगल्याच संतापल्या, दोन्ही आघाड्याचे सदस्यांच्या महापौरांच्या टेबलभोवती जमा झाले. महापौरांनी हा ठराव बहुमतांनी मंजूर झाल्याचे सांगताच विरोधी आघाडीच्या सदस्यांना पुन्हा संताप अनावर झाला. अखेर एकमत होत नसल्याने मतदानासाठी हा ठराव टाकण्याचा आदेश महापौरांनी दिला. 

न्यायप्रविष्ट बाब असताना ठराव मतदानाला टाकताच कसा, असा जाब विरोधी आघाडीने नगरसचिवांना विचारला. महापौर आपल्या म्हणण्यावर ठाम राहिल्या. त्यांनी मतदानाचे आदेश दिले. कॉंग्रेस राष्ट्रवादीच्या सदस्यांनी हात उंचावून सहमती दिली. विरोधी आघाडीचे सर्वच सदस्य जागेवर उभे राहिले. दारूबंदी झालीच पाहिजे, ठरावाच्या बाजूने मतदान करणाऱ्यांचा निषेध असा सूर लावला. या गदारोळातच सत्यजित कदम यांनी ठरावासाठी सुपारी फुटली आहे. ज्यांच्यात धमक आहे त्यांनी महालक्ष्मीला या क्षणीच जाऊन खऱ्याचे खोटे आणि खोट्याचे खरे करायचे, असे आव्हान दिले. त्यावर शारंगधर देशमुख यांनी विरोधी आघाडीने लिकर लॉबीची सुपारी घेतल्याचा आरोप केला दोन्ही बाजूंनी आरोप प्रत्यारोपाच्या फैरी सुरू झाल्या. ठरावाच्या बाजूने 47 आणि विरोधात 32 मतदान झाले. ठराव नामंजूर आणि उपसुचनेच्या बाजूने विरोधी आघाडीने मतदान केले. 

 

संबंधित लेख