kolhapur bjp | Sarkarnama

राहूल देसाई भाजपमध्ये; विधानसभेची समीकरणे बदलणार ! 

सरकारनामा ब्युरो
रविवार, 28 मे 2017

राहूल देसाई यांचे बंधू धैर्यशील हे "गोकुळ' चे संचालक आहेत. "गोकुळ' वर माजी आमदार महादेवराव महाडीक यांची सत्ता आहे. या सत्तेच्या माध्यमातूनच श्री. देसाई यांचा भाजप प्रवेश होत आहे. राहूल यांचे आजोबा कै. आनंदराव देसाई, वडील बजरंग देसाई यांनी कॉंग्रेसचे आमदार म्हणून या भागाचे प्रतिनिधीत्व केले. राहूल हेही कॉंग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य होते, सद्या त्यांच्या पत्नीही कॉंग्रेसच्या सदस्या आहेत. 

कोल्हापूर : पंधरा-वीस वर्षापुर्वी शहराच्या एका चिंचोळ्या गल्लीपुरता मर्यादित असलेल्या भारतीय जनता पक्षाचा विस्तार आता ग्रामीण भागापर्यंत पोचला आहे. पक्षाच्या विस्ताराला बळ देण्यासाठी सोमवारी (ता. 29) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गारगोटी (ता. भुदरगड) येथे आहेत. मुख्यमंत्री पहिल्यांदाच गारगोटीत येत असल्याने स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली आहे. 

दुपारी चार वाजता गारगोटीतील पोलीस मैदानावर होणाऱ्या शेतकरी मेळाव्यात श्री. फडणवीस मार्गदर्शन करणार आहेत. या मेळाव्यातच कॉंग्रेसचे माजी आमदार बजरंग देसाई यांचे पुत्र व माजी जिल्हा सदस्य राहूल देसाई हे भाजपत कार्यकर्त्यांसह प्रवेश करणार आहेत. भुदरगड, राधानगरी तालुक्‍यात देसाई गटाचा मोठा प्रभाव आहे, राहूल यांच्या पक्षप्रवेशाने भाजपाला मोठी ताकद मिळेल असा अंदाज आहे. 

यापुर्वी राष्ट्रवादीचे हातकणंगलेचे नेते व जिल्हा परिषद सदस्य अरूण इंगवले, गगनबावड्याचे नेते पी. जी. शिंदे, कॉंग्रेसचे शिरोळ तालुका अध्यक्ष अनिल यादव, हातकणंगले तालुका अध्यक्ष प्रसाद खोबरे आदिंनी भाजपात प्रवेश केला. पुढील आठवड्यात आजरा कारखान्याचे अध्यक्ष अशोक चराटी हेही भाजपावासीय होणार आहेत. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील हेही भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. तालुका पातळीवर आपापले स्थान बळकट असलेल्या नेत्यांना पक्षात प्रवेश देऊन भाजपकडून ग्रामीण भागात विस्ताराचा प्रयत्न सुरू आहे. या पक्षाला ग्रामीण चेहरा नाही अशी होत असलेल्या टीकेला या नेत्यांचा पक्षप्रवेश हे उत्तर असेल. 

 

 

संबंधित लेख