अमल वचपा काढणार की सतेज 'दक्षिण' जिंकणार? 

आगामी विधानसभा निवडणुकीत "कोल्हापूर दक्षिण' या राजकीयदृष्ट्या अतिशय संवेदनशील बनलेल्या मतदारसंघात पुन्हा एकदा आमदार अमल महाडीक व कॉंग्रेसचे आमदार सतेज पाटील यांच्यातच लढत होण्याची शक्‍यता आहे. या दोघांतच लढत झाली तर पराभवाचा वचपा कोण काढणार? याविषयी उत्सुकता असेल.
अमल वचपा काढणार की सतेज 'दक्षिण' जिंकणार? 

कोल्हापूर : आगामी विधानसभा निवडणुकीत "कोल्हापूर दक्षिण' या राजकीयदृष्ट्या अतिशय संवेदनशील बनलेल्या मतदारसंघात पुन्हा एकदा आमदार अमल महाडीक व कॉंग्रेसचे आमदार सतेज पाटील यांच्यातच लढत होण्याची शक्‍यता आहे. या दोघांतच लढत झाली तर पराभवाचा वचपा कोण काढणार? याविषयी उत्सुकता असेल. 

2014 च्या विधानसभा निवडणुकीत अवघ्या पंधरा दिवसांत श्री. महाडीक यांनी भाजपाच्या तिकिटावर "दक्षिण' चे मैदान मारताना सलग दोनवेळा मोठ्या फरकाने विधानसभा निवडणूक जिंकलेल्या तत्कालिन गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांना आस्मान दाखवले. विधानसभेनंतर वर्षभरंनी झालेल्या विधानपरिषद निवडणुकीत श्री. पाटील यांनी श्री. महाडीक यांचे वडील व जिल्ह्यातील एक वजनदार राजकीय नेतृत्त्व माजी आमदार महादेवराव महाडीक यांचा एकतर्फी पराभव करून विधानसभा निवडणुकीतील पराभवाचा वचपा काढला. 

आता 2019 च्या निवडणुकीत श्री. महाडीक हे वडीलांच्या पराभवाचा वचपा काढणार की गेल्या विधानसभा निवडणुकीत झालेला पराभव जिव्हारी लागलेले सतेज पाटील हे पुन्हा "दक्षिण' स्वारी जिंकून गेल्या निवडणुकीतील पराभवाचा वचपा काढणार याविषयी नक्कीच उत्सुकता असेल. श्री. पाटील हे सद्या विधानपरिषद सदस्य आहेत, पण आपल्याला विधानसभेतच अधिक रस असल्याचे सांगत पुन्हा "दक्षिण' लढवण्याची घोषणा त्यांनी अलिकडेच एका मुलाखतीत केली आहे. यामुळे "दक्षिण' मध्ये पुन्हा हेच दोन पारंपारिक राजकीय विरोधक एकमेकांसमोर असणार असे सद्यातरी दिसते. 

2007 ला महाडीक-सतेज यांच्यात वाद सुरू झाला, त्यानंतर 2009 मध्ये मतदार संघांची पुनर्रचना झाली आणि कोल्हापूर दक्षिण हा नवा मतदार संघ तयार झाला. या मतदार संघातूनच श्री. पाटील यांनी लढण्याचा निर्णय घेतला. त्या निवडणुकीत श्री. महाडीक यांनी आपले पुतणे व विद्यमान खासदार धनंजय महाडीक यांनाच श्री. पाटील यांच्या विरोधात मैदानात उतरले. या दोघांत काटाजोड लढत झाली, ऐनवेळी उमेदवारी जाहीर करूनही श्री. महाडीक यांनी श्री. पाटील यांना घाम फोडला. श्री. महाडीक अपक्ष म्हणून रिंगणात होते, पण त्याचवेळी राज्यात उदयास आलेल्या "रिडालोस' चा त्यांना पाठिंबा मिळाला. त्यांनी मोठे आव्हान उभे केले पण पाच हजार मतांनी पुन्हा श्री. पाटील हेच विजयी झाले. 

2014 मध्ये पुन्हा पाटील विरूध्द महाडीक अशीच लढत होणार हे 2009 मध्येच स्पष्ट झाले होते. फक्त उमेदवार कोण असणार याविषयीची स्पष्टता नव्हती. लोकसभेची निवडणूक दोन्ही कॉंग्रेसने एकत्रित लढवली, कोल्हापुरची जागा राष्ट्रवादीच्या वाट्याला आली आणि राष्ट्रवादीचे उमेदवार म्हणून धनंजय महाडीक रिंगणात उतरले. राज्यात मंत्री असल्याने व आघाडी झाल्याने श्री. पाटील यांनी सर्व मतभेद बाजूला ठेवून श्री. महाडीक यांना पाठिंबा दिल व ते विजयी झाले. पण 2014 मध्ये याच महाडीक आणि त्यांच्या गटाने श्री. पाटील यांचा विधानसभेत पराभव केला. 

2014 मध्ये श्री. पाटील यांना या मतदार संघातील "शाहू-कागल' चा पाठिंबा होता. त्यामुळेच मतदार संघातील इतर गावांत ते पिछाडीवर असूनही "शाहू-कागल' च्या कार्यक्षेत्रातील गावांत मात्र त्यांना श्री. महाडीक यांच्यापेक्षा जास्त मताधिक्‍य होते, पण हे मताधिक्‍य त्यांचा पराभव वाचवू शकले नाही. यावेळी मात्र "शाहू-कागल' चे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे हेच भाजपात आहेत, त्यामुळे त्यांचा पाठिंबा श्री. पाटील यांना मिळणार नाही, याची एक झलक जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत पहायला मिळाली आहे. जिल्हा परिषदेच्या कॉंग्रेसच्या दोन जागा राजे गटाचा पाठिंबा नसल्याने पराभूत झाल्या, त्या दोन्ही जागांवर भाजपाचे सदस्य विजयी झाले. 

विधानसभेतील पराभवानंतर काही काळ अज्ञातवासात गेलेल्या श्री. पाटील यांनी पुन्हा "दक्षिण' मधूच शड्डू ठोकण्याचा निर्णय घेतला आहे. एका बाजूला श्री. महाडीक यांनी विकास कामाच्या माध्यमातून मतदार संघात आपले अस्तित्त्व कायम ठेवले आहे. राज्यात भाजपाचे सरकार असल्याचा फायदा त्यांना होत आहे, तर दुसरीकडे श्री. पाटील यांनी मतदार संघात संपर्क दौरे, विकास कामाच्या माध्यमातून रान उठवले आहे. प्रत्यक्ष मैदान कोण मारणार यासाठी मात्र वर्षभर प्रतिक्षा करावी लागणार आहे. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com