kishorraje nimabalkar | Sarkarnama

शिरुरच्या निंबाळकरांचा जळगावमध्ये दोन पदांच्या माध्यमातून डंका !

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 28 ऑगस्ट 2017

जळगाव : सनदी अधिकाऱ्याने ठरवले तर लोकहिताची किती कामे होऊ शकतात आणि काय घडू शकते याचे उदाहरणच जळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या कामातून घालून दिलं आहे. केवळ आदेश देणारा सेनापती असे त्यांचे वर्तन नसून सगळ्यांच्या पुढे जाऊन लढणाऱ्या या अधिकाऱ्याने सेनापती म्हणून आपल्या कामाची छाप पाडली आहे. शहरात स्वच्छतेसाठी केवळ शासकीय आदेश न देता जिल्हाधिकारी स्वत: रस्त्यावर येवून लोकसहभागातून स्वच्छता करतात, रत्यावरच्या खड्‌याची पाहणी करण्यासाठी स्वत: स्कुटरवर शहरात फेरफटका मारतात.

जळगाव : सनदी अधिकाऱ्याने ठरवले तर लोकहिताची किती कामे होऊ शकतात आणि काय घडू शकते याचे उदाहरणच जळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या कामातून घालून दिलं आहे. केवळ आदेश देणारा सेनापती असे त्यांचे वर्तन नसून सगळ्यांच्या पुढे जाऊन लढणाऱ्या या अधिकाऱ्याने सेनापती म्हणून आपल्या कामाची छाप पाडली आहे. शहरात स्वच्छतेसाठी केवळ शासकीय आदेश न देता जिल्हाधिकारी स्वत: रस्त्यावर येवून लोकसहभागातून स्वच्छता करतात, रत्यावरच्या खड्‌याची पाहणी करण्यासाठी स्वत: स्कुटरवर शहरात फेरफटका मारतात. कामाच्या याच वेगळ्या शैलीमुळे जळगावचे जिल्हाधिकारी तथा महापालिकेचे प्रभारी आयुक्त किशोरराजे निंबाळकर यांनी जनतेवर आपली छाप निर्माण केली आहे. 

पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्‍यातील न्हावरा येथील रहिवासी असलेले जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर यांनी जळगावच्या जिल्हाधिकारीपदाची सूत्रे 15 मार्चला हाती घेतली. सूत्रे स्वीकारल्यावर प्रथम आपल्या कार्यालयाला वेळेची शिस्त लावली, त्यामुळे कार्यालयात कामासाठीं आलेल्या नागरिकांची कामे वेळेवर होवू लागल्याने नागरिक समाधानाने घरी जावू लागले. लोकशाही दिन हा अनेक ठिकाणी केवळ औपचारिकता म्हणून पाळला जातो. अधिकारी बसलेले नागरिक येतात त्यांची गाऱ्हाणी सांगतात पुढच्या लोकशाही दिनात तोच कित्ता. परंतु निंबाळकरांनी या उपक्रमाचे स्वरूपच बदलून टाकले आहे. अधिकाऱ्यांकडे लोक येत नाहीत, लोक एकाच ठिकाणी बसतात जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधिक्षक तसेच इतर खात्याचे अधिकारी नागरिकांच्या जागेवर जावून त्यांच्या तक्रारी ऐकून ताबडतोब आदेश देतात, त्यामुळे यात एकही प्रकरण पेंडीग राहत नाही. नागरिकांना हा लोकशाही दिन खऱ्या अर्थाने आपला वाटू लागला आहे. 

शासकीय कामात सुसुत्रता आणत असतांनाच जळगाव महापालिकेचे आयुक्त जीवन सोनवणे निवृत्त झाल्यामुळे आयुक्तपदाचा प्रभारी कारभारही त्यांच्याकडेच आला. तोपर्यंत जळगाव महापालिकेची "प्रसिद्धी'च इतकी आहे की संपूर्ण राज्यात या महापालिकेबद्दल बरे बोलले जात नव्हते. पण निंबाळकरांनी सूत्रे हाती घेतली आणि महापालिकेच्या कामातही आमुलाग्र बदल केला. कर्जबाजारीपणामुळे शहरात स्वच्छतेची कामेही होवू शकत नव्हती, परंतु महापालिकेचा पदभार सांभाळताच त्यांनी शहरात स्वच्छतेची पाहणी मोहिम सुरू केली, सकाळी मॉर्निंग वॉकच्या वेळी ते स्वतः शहरातल्या विविध भागात भेटी देवून पाहणी करू लागले, नागरिकांशी संवाद करू लागले,ज्या ठिकाणी अस्वच्छता आहे ते तेथे स्वच्छता करण्याचे महापालिकेच्या आरोग्याधिकाऱ्यांना आदेशही देवू लागले. 

याच पाहणीत जळगाव शहरातील गोलाणी संकुलात अस्वच्छतेचे आगार असल्याचेच दिसून आले,त्या ठिकाणी चक्क रिकाम्या दुकानामध्ये कचरा साठविल्याचे दिसून आले. त्यांनी त्या ठिकाणी कारवाईचा बडगाच उगारला, थेट संकुल बंद करण्याचे आदेशच काढले. त्यामुळे व्यापारीही खडबडून जागे झाले आणि त्यांनीही स्वच्छतेसाठी पुढाकार घेतला अखेर याच संकुलात स्वच्छता करून एका दिवसात तब्बल 51 टन कचरा काढण्यात आला. त्यानंतर मात्र हेच संकुल चकाचक झाले. एवढ्यावरच ते थांबले नाहीत, त्यांनी महापालिकेच्या इतर संकुलातही हीच मोहिम राबविली त्यानंतर शहरातही लोकसहभागातून स्वच्छता मोहिम राबविली यात रोटरी क्‍लबच्या सदस्यासह महापौर, उपमहापौर नगरसेसवकांनीही सहभाग घेतला. त्यानंतर रस्त्यावर असलेल्या अतिक्रमणाला त्यांनी लगाम घातला, रस्त्त्यावर विक्रीस बसणाऱ्या विक्रेत्यांना महापालिकेच्या मोकळ्या जागेत हक्काची जागा देवून त्यांचे स्थलांतर केले. यामुळे रहदारीसाठी रस्ते मोकळे झाले. 

अतिक्रमण आणि स्वच्छतेचा प्रश्‍न मिटल्यानंतर किशोरराजे निंबाळकरांनी शहरातील रस्त्यावरील खड्डयांची दखल घेतली. गणपती उत्सवाचे दिवस असल्याने शहारातील मुख्य मिरवणूक मार्गावरील खड्डे बुजविण्याचे त्यांनी आदेश दिले होते. त्या मार्गावर खरंच खड्डे बुजविले गेले किंवा नाही यांची पाहणी करण्यासाठी त्यांनी स्कुटीवर बसून रस्त्यावर फेरफटका मारला. त्यामुळे जळगावकरांना निंबाळकर अधिकच भावले आहेत. 

निंबाळकर यांनी जळगावात आल्यानंतरच काम केले असे नाही, यापुर्वी पंढरपूर येथे प्रांताधिकारी असतांना विठ्ठलमंदिर व्यवस्थापनाचे काम त्यांनी उत्तम प्रकारे केले होते. त्याच्याच काळात मंदिरात लाडूच्या प्रसादाचे वाटप सुरू करण्यात आले होते. ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारीपदी कार्यरत असतांना त्यांनी हगणदारी मुक्तीचे काम केले होते. जिल्ह्यात 22 हजार शौचालय बांधली होती, या कार्याबद्दल त्यांना सरकारचा पुरस्कारही मिळाला आहे. निंबाळकरांनी जिथे जिथे काम केले तेथे आपल्या कामाची छाप पाडली आहे. जळगावकरही त्यांच्या कामावर खुष आहेत. त्यामुळेच की काय जळगावात अद्यापही महापालिकेसाठी स्वतंत्र आयुक्तांची मागणी होत नाही. 

संबंधित लेख