Kishore Tiwari Criticises Maharashtra Ministers | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

नगरमध्ये डॉ. सुजय विखे जिंकले
रायगडात सुनील तटकरे जिंकले

मंत्र्यांचे शेतकऱ्यांवर पुतना मावशीसारखे प्रेम : किशोर तिवारी यांचे राज्य सरकारवर टीकास्त्र 

सरकारनामा ब्युरो 
गुरुवार, 27 डिसेंबर 2018

भारतीय जनता पक्ष व शिवसेनेच्या मंत्र्यांचे शहरी मतदारांवर जास्त प्रेम असून शेतकऱ्यांवर मात्र पुतना मावशीसारखे प्रेम करतात, अशी टीका वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी केली आहे. 

नागपूर : भारतीय जनता पक्ष व शिवसेनेच्या मंत्र्यांचे शहरी मतदारांवर जास्त प्रेम असून शेतकऱ्यांवर मात्र पुतना मावशीसारखे प्रेम करतात, अशी टीका वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी केली आहे. 

काही दिवसांपूर्वीच त्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे भाजपची सूत्रे सोपवावी, अशी मागणी करून खळबळ उडवून दिली होती. हा वाद संपत नाही तोच तिवारी यांनी पुन्हा पत्रक काढून राज्य सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. राज्य सरकारचे सारे लक्ष शहरातील विकासाकडे असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. सरकारचा फोकस समृद्धी मार्ग, मेट्रो रेल्वे, सिमेंटचे रस्त्यांवर असून पोटभरू नेत्यांनी सरळ टक्केवारी देणारा विकास अत्यंत प्रिय आहे मात्र ग्रामीण उपाशी जनतेचा राग शहरी मतदारांवरही होतो, हे आपण पाच राज्याच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या निकालाने स्पष्ट झाले आहे. राज्यात शहरातील 144 शहरी जागांवर लक्ष केंद्रित न करता अन्नदाता वाचवा व सत्ता मिळवा, अशी विनंती तिवारी यांनी केली आहे. 

राज्यात पूर्णवेळ कृषी मंत्री नसल्याबद्दलही तिवारी यांनी टीका केली आहे. पांडुरंग फुंडकर यांचे निधन झाल्यानंतर कृषी खात्याचा प्रभार महसूल मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्याकडे आहे. शेतीची जाण असणारे पूर्णवेळ कृषीमंत्री असावा तसेच कृषी, कृषी पतपुरवठा, ग्रामीण अर्थ व्यवस्था समजणारे कृषी सचिवाची नियुक्ती करावी, अशी सूचनाही तिवारी यांनी केली आहे. मध्यप्रदेश सरकारने नुकतीच शेतकऱ्यांसाठी पेन्शन योजना सुरू आहे. या योजनेप्रमाणे शेतकऱ्यांना पेन्शन योजना तात्काळ सुरू करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे. कृषी कर्जमाफी योजनेचे तीनतेरा बॅंक व सनदी अधिकाऱ्यांनी वाजविल्याचा आरोपही तिवारी यांनी केला आहे.

संबंधित लेख